तुझे पत्र वाचल्यावर माझी खात्री झाली होती की, तू शिस्तप्रीय व कर्तव्य पालनांत कटाक्ष पाळत असतोस. म्हणूनच माझा आशिर्वाद पोहचवण्याचे कर्तव्य तू पार पाडूनच माझे पत्र पुढे वाचण्यांस सुरुवात केली असणार.
तुझे पत्र माझ्या हाती पडल्यावर इथल्या माझ्या अभ्यासिकेतील वातावरण व पार
पडणा-या घटनाक्रमाबद्दल तुझ्या मनांत आलेल्या कल्पनेबाबतची वस्तूस्थिती प्रथम तुला कळवण्याची इच्छा मी टाळू शकत नाही. कारण तू तशा पध्दतीनेच तुझी कल्पना सादर केली आहे.
विश्वविज्ञानाची गरुडझेप, विश्वशांतीची दिशा, समाजवादाची फलश्रुती, सर्वधर्मग्रंथाची शिकवण, कृषी-शिक्षण-सहकार व सांस्कृतिक मुल्ये, सामूहिक सहमतीचे फायदे या विषया वरिल प्रबंध, तसेच साहित्यांत नवनवीन भर पडलेले अनेक ग्रंथ इत्यादी विषयावरील विचारवंतांच्या, प्रतिभावंतांच्या अभिप्रायाच्या आजच्या टपालाच्या, टेबलावरील ढिगा-यांतून अस्तीत्वाने छोट्याशा असलेल्या व त्यामुळे मुख्य ढिगा-यापासून टेबलाच्या कोप-यावर हवेच्या धक्याने टेबलाखाली पडण्याच्या तयारीत असलेल्या लिफाफ्याकडे माझे लक्ष जाताच, या वयातला संपूर्ण उत्साह एकवटून केलेल्या चलाखीमुळेच तो लिफाफा टेबलावरुन खाली पडण्याऐवजी समोरच्या इतर ढिगा-यांतील कोणत्याही विषयाच्या फायलीकडे लक्ष जाण्यापूर्वीच हातात आला. वास्तविक विस्कटणा-या कागदपत्राला सावरण्यापुरतीच प्रस्तुत कृती मर्यादीत होती, तथापी हा छोटासा लिफाफा कोणी पाठविला व कशासाठी असावा या कुतूहलाने पाहू लागलो.
बाळ, तुझ्या पत्रांत सुरुवातीलाच नमुद केलेल्या, पत्र लिहीताना तुला वाटणा-या भावना व आज तुझे पत्र हाती घेवून वाचायला सुरुवात करेपर्यंतची तुला भावलेली कल्पना तंतोतंत बरोबर आहे. तुझ्या अपेक्षे प्रमाणे तुझ्या पत्रानंतरच्या माझ्या लगेचच्या या पत्रांत मी प्रांजळपणे कबूल करुन तुझी भविष्यवाणी खरी झाल्याचा तुझा आनंद मी इतक्या लांबूनही अनुभवण्याची संधी घेतो.
वास्तविक माझ्या आजच्या वास्तव्याबाबत मी माझा ठाव ठिकाणा ज्यांच्याशी साधणे गरजेचे आहे व ज्यांनी आपले काम उरकून आमच्या इथल्या आश्रमांत “कर्तव्य-मुल्यांकन, समीक्षा व मोजमाप-ताळेबंद” वर्गात दाखल होवूं इच्छीणा-या गरजवंतानाच कळवण्याचा कटाक्ष पाळला आहे. तथापी येणा-या टपालातून इतका लहान लिफाफा व “बरोबर” पत्ता पाहून पाठवणा-या प्रेषकाबद्दल कुतुहल निर्माण होणे स्वाभाविक होते. झालेही तसेच. धाकट्या बाळा, तुझे नांव व पत्ता वाचल्यावर प्रथम आनंद कशाचा वाटला असेल तर हा आपला अनुयायी आश्रम आजही कार्यरत आहे याचा. आपला अनुयायी आश्रम कार्यक्षम सातत्य राखून कार्यरत राहील याची तजविज करण्यांत तीथल्या वास्तव्यांत कटाक्षाने लक्ष देत होतो. इकडच्या मुक्कामात इथल्या प्रथा व कटाक्ष पाळतांना दिलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त कशांत सहभाग घेण्याचा प्रश्न येत नाही. तथापी प्रत्येकाच्या आवडी-निवडी पहाता येथील अनेक विषयावरील परिसंवाद, सांस्कृतीक कार्यक्रम इत्यादीचा आनंद लुटण्याची येथे व्यवस्था उत्तम आहे. इथल्या विचारवंताकडून, प्रतिभावंताकडून आपल्या प्रबंधावर आपसांत चर्चा करण्याची प्रथा असून गरज पडल्यांस एकमेकाचे अभिप्राय मागण्याची पध्दत आहे. यामुळे निर्माणकर्त्याला अमूल्य मार्गदर्शन लाभते असा येथील सिध्दान्त आहे. त्यामुळे रोज टेबलावर असा ढीग असतो. नवीन-नवीन परिवर्तन व दिशा वाचन करण्याची सवय अखंडपणे जोपासता आली असली तरी लिखाण करण्यांत खंडच पडला आहे. येथे जमणा-या सर्वच जणांच्या बाबतीत पुर्णत्वाची मर्यादा ओलांडलेले सर्वजण असल्याने त्यांना काही वाचनाकरिता लिहीले तर ते त्यांना त्याआधीच माहीत असल्याचे दिसते.