थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (5)

स्वातंत्र्य संग्रामात तरुणाने पारतंत्र्याविरुध्द आहुती दिली. आजच्या तरुणाला स्वातंत्र्यात अभिप्रेत असलेली फळे मिळणे दुरापास्त झाले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील तरुण स्वातंत्र्यासाठी बेभान झाला होता. त्यावेळचा तरुण व आजचा तरुण हा याच भारतमातेचा भुमीपुत्र. मग आजच्या तरुणाला समाजविरोधी कृत्यांना प्रखर विरोध करण्याची उर्मी का दिसत नाही ?

सरकारी व इतर उपक्रमातील रास्त महसूल रास्त ठिकाणच्या तीजोरीत जात नाही ही शोकांतीका आहे. म्हणून आजच्या संघटीत तरुणांच टोळकं प्रत्येक कार्यालयाच्या आवारांत रास्त महसूलाच्या आड येणा-या अधिका-यांस समाजापुढे आणण्यास सज्ज होणे गरजेचे आहे.

नवमहाराष्ट्राच्या उज्वलतेसाठी स्व. यशवंतरावजीनी दाखवलेल्या आराखड्याप्रमाणे आपण आपल्या विकासाच्या दिशा ठरवल्या आणि कार्यरत झालो. सामान्य माणूस सुध्दा कारखान्याचा, दुध संघाचा, बँकेचा, सोसायटीचा, खरेदीविक्री संघाचा मालक होवू शकतो हे वास्तव साकार केले आहे. शिक्षणाचा प्रसार करुन शिक्षण घेवून नोकरी करणे व निवृत्तीकाळ व्यतीत करणे ही परकीय राजवटीतील मानसिकता बदलू शकलो. शैक्षणीक प्रसार तळागाळापर्यंत पोहचवून नवनवीन उद्योगाला व प्रशासनाला सक्षम स्थानिक तंत्रज्ञ व प्रशासक निर्माण करु शकलो. शैक्षणीक प्रसारामुळे आज आपले तरुण जगाच्या पाठीवर आपले योगदान देवून कर्तृत्व दाखवत आहेत. सार्वजनीक उपक्रमातून सामान्यापर्यंत सेवा देणारे समाजवादावर आधारीत, आपण निवडलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्याला शासन देवू शकलो. सत्तेचे विकेंद्रीकरण राबवून ग्रामपंचायत, नगर पालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषदा, सहकारी संस्था इत्यादीच्या माध्यमातून आमचा प्रतिनिधी सर्वांच्या विकासाचा निर्णय घेवू लागला. यातूनच समाजासाठी विधायक काम करणा-या समाजसेवकांची आपण फौज निर्माण करु शकलो या प्रक्रियेतून घडलेले नेते आज राज्यात व केंद्र शासनांत आपले प्रतिनिधीत्व करत आहेत. आपण लोकशाही प्रणालीतून हे सर्व साध्य केले पण अशा लोकाभीमुख कारभाराला दृष्ट लागून, आज स्वार्थ, भ्रष्टाचार, जातीय, धार्मीक वैर वाढून समाजांत संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.

नवमहाराष्ट्र निर्माण करताना महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याचे स्वरुप नीट समजावून घेतले पाहिजे. प्रगतीसाठी जे करायचे आहे त्याचा आराखडा समोर ठेवला नाही तर आंधळ्यासारखा प्रवास करण्याचा आमच्यावर प्रसंग येईल. हा प्रवास योग्य दिशेने व निश्चीत गतीने पुरा करायचा आहे. प्रगतीच्या या प्रवासांत आमची राष्ट्रनिष्ठा आणि महाराष्ट्र निष्ठा या एकमेकांच्या हातात हात घेवूनच आपल्याला विजय मिळवायचा आहे हे सांगतानाच कर्तृत्ववान परंपरा असणा-या, शिवाजी महाराजांच्या परंपरेने शोभायमान झालेल्या महाराष्ट्राचा इतिहास अडून बसणार नाही. जीवनाची जी मुल्ये आम्हाला आमच्या परंपरेतून मिळालेली आहेत त्यांच्या बळावर मानवी जीवनाची सेवा करण्यातही तो मागे हटणार नाही असे एक स्वप्न स्व. यशवंतरावजींनी महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत सांगीतले.

आज सबंध देश विध्वंसाच्या आगीत सापडला आहे. महाराष्ट्रातही ती आग भडकली आहे. ही आग विझवण्यासाठी पाणी आणावे लागेल महात्मा जोतीबा फुल्यांच्या हौदातील, शाहुमहाराजांच्या पंचगंगेतून, आंबेडकरांच्या स्पर्षाने पुनीत झालेल्या महाडच्या चवदार तळ्यातून आणि या तिन्ही ठिकाणाहून आणलेल्या पाण्यांत सोडावी लागेल साने गुरुजींनीं प्रेमासाठी आयुष्यभर ढाळलेल्या अश्रुंची धार, असे हे पाणी ही आजची आग निश्चित विझवू शकेल. याला आमच्या निश्चयाची गरज आहे.