थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (6)

स्व. यशवंतरावजीनी प्रगतीच्या प्रवासांत सामाजीक, आर्थीक व औद्योगीक प्रश्न सोडवताना शिक्षण आणि शेतीला प्राधान्य दिले. याच बरोबर दोन वेळची चुल पेटली नाही तर झोपताना येणारी भूकेची कळ अनुभवल्याचा दाखला देवून दारीद्र्य नष्ट करण्याचा कार्यक्रम प्राधान्याने राबवला. सर्वांना शिक्षण योजना राबवताना शाळा-कॉलेजबरोबर वसतीगृहांची सोय केली आहे. शिक्षणाची खैरात पाहून काही बुध्दीवंतानी शैक्षणिक दर्जा खालावण्याची भीती व्यक्त करुन कडक पेपर तपासणीचा आग्रह धरल्यावर यशवंतरावजीनी त्यांस विरोध करताना सांगीतले, आता कोठे ज्यांना शाळेत जाता येत आहे त्यांना नाउमेद करु नका. तरीही शिक्षणामुळे तरुण बंडखोरीकडे वळेल या विद्वानांच्या भाकीताला यशवंतरावजींनी सांगीतले, भविष्यांतील तरुणांचे बंड हे देशाच्या प्रगतीला उपकारकच ठरेल, त्याची काळजी करणे म्हणजे समाज सुधारणेला खीळ घातल्यासारखे होईल.

स्व. यशवंतराव भारताचे गृहमंत्री असताना लोकसभेत देशांतर्गत झालेल्या दंगलीची चर्चा चालली होती. या चर्चेत एका सदस्याने आपल्या भाषणांत स्वातंत्र्य संग्रामातील चळवळीत तत्कालीन शासनाच्या विरोधात काम केलेल्या व आरोपी होऊन तुरुंगवास भोगलेली व्यक्ती आज देशाची गृहमंत्री आहे असे उद्गार यशवंतरावजींच्या रोखाने काढले. या संबंधी यशवंतरावजींनी दिलेल्या उत्तरात स्वातंत्र्य संग्रामातील चळवळीत भोगलेल्या तुरुंगवासाची तत्कालीन परीस्थिती निर्माण झाल्यास देशवासीयांच्या हक्काच्या आड येणा-या घटकांशी तेच वर्तन करुन पुन्हा तुरुंगवास भोगण्यास मी कटीबध्द आहे असे उद्गार काढले होते. आजच्या तरुणाला आज स्वतंत्र भारतातील सामान्य जर पारतंत्र्यासारखी समाज शोषनाची परीस्थिती अनुभवत असेल तर त्याने आजच्या समाजविरोधी कार्यप्रणालीच्या विरोधात आंदोलन करुन प्रसंगी स्वातंत्र्य संग्रामातील तुरुंगवासाप्रमाणे आजही तसाच प्रसंग आला तर तो आनंदाने स्विकारला पाहिजे हा बोध घेणे गरजेचे आहे. मित्रहो उद्याचा सुशिक्षित तरुण बंडखोर होईल या विद्वानांच्या भाकिताला स्व. यशवंतरावजींनी दिलेले उत्तर कालांतरानी लोकशाहीतील समाजविरोधी शासनाच्या विरोधातील गरज असलेले तरुणांचे बंड व्हावे हा दुरगामी संदेश आज प्रत्यक्षात आणण्याची वेळ आलेली आहे.

वाईटाचा त्याग करुन चांगल्याचे जतन करत विकासाच्या नव्या संकल्पना करण्याची आमची संस्कृती आहे. २१व्या शतकातील संपलेल्या १० वर्षाचा काळ हा पुर्व प्रभावाचा मानू व २१व्या शतकातील नव्या संकल्पणाचा शुभारंभ करुया. स्वातंत्र्य संग्रामांत ज्यांनी योगदान दिले त्यांची नांवे अभिमानाने सांगताना एक गोष्ट लक्षांत घेणे गरजेचे आहे. ते म्हणजे हे सर्वजण तरुण होते. स्वातंत्र्य असो अथवा स्वातंत्र्यातील रास्त मागण्या असो तरुणांनी मनांत आणले तर कर्त्यासवरत्या शक्तीला रास्त मार्गावर आणने अशक्य नाही. हे स्वातंत्र्यसंग्रामाने सिध्द केले आहे.

आजच्या वैज्ञानीक युगांत जगातील प्रत्येक देश आपल्या विकासाच्या दिशा ठरवून प्रभावीपणे कार्यरत झाल्याचे आपण ऐकत आहोत. युरोपमधील देश एकत्र येवून सामुहिक आराखड्याप्रमाणे आपला सामुहिक विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचा देश विकासाची निश्चीत दिशा ठरवून कठोर अंमलबजावणीच्या माध्यमातून आज जागतीक पातळीवर आपले स्थान वरच्या क्रमांकावर आणत असल्याचे आम्ही ऐकत आहोत. लोकसंख्येच्या पातळीवर चीन सर्वात आघाडीवर होता तो आपली लोकसंख्या कमी होत असल्याचे अनुभवत आहे. निश्चित आराखड्यातून कठोर अंमलबजावणीद्वारे विकास साधता येतो हे इतिहासावरुन व आजच्या जागतिक परिस्थीतीवरुन आपण पहात आहोत.