थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (7)

हे चित्र पाहील्यावर आम्ही लोकशाही राज्यपध्दतीत अग्रगण्य मानल्या जाणा-या आमच्या देशांत प्रांतवाद, विभागवाद, जिल्हावाद, जातीवाद, धर्मवाद, राजकीय पक्षातील वाद जोपासण्यांत आघाडीवर आहोत हे पहाता वैज्ञानिक युगाच्या सुखसोयी उपभोगताना आम्ही चांगले धडे घेणार आहोत की नाही हा प्रश्न उभा राहतो. म्हणून समतेवर आधारीत समाजवादी समाजरचना अंमलात आणण्याकरीता एकच विचार-एकच ध्येय एकच मार्ग अवलंबण्याकरिता सर्वांचा एकत्रीत प्रवास सुरु करावयाचा आहे.

आज समाजातील सामान्य घटक ७/१२ च्या उता-याला नडतो, वीज मंडळाच्या बीलाबाबत अडखळतो, एस.टी. च्या प्रवासाला वंचीत होतो, रेशन कार्डाला रखडतो, बँकेच्या कर्जाला अनेकांना विनवणी करताना दिसतो, शेतीच्या सुविधा करिता अनेकांना विनवन्या करतो, आपला ऊस कारखान्याने वेळेवर तोडावा म्हणून मान्यवरांचे हुंबरे झिजवतो, आपले पैसे वेळेवर मिळावे म्हणून प्रतिक्षा करतो, गावच्या विकासाची गोड आश्वासने पुन्हा-पुन्हा ऐकून मूळ अवस्थेत पुढच्या आश्वासनाची वाट पाहतो, मुलाला-मुलीला शाळेत प्रवेश मिळावा म्हणून मनाविरूध्द पण पर्याय नसल्याने खिसा खाली करतो, शिक्षीत उमेदवारांसाठी नोकरी मिळवून पगार मिळण्याकरिता स्वतःजवळची संपत्ती गहाण ठेवतो, मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यासाठी झिजतो व स्वतःला धन्य समजतो. तरीही या अडचणीतल्या घटकाला दिलासा देणा-या शब्दाशिवाय त्याला काहीही मिळत नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळावे व आपला विकास आपण करावा व समाजवाद, सर्वसमभाव, सहिष्णुतता व शांतीमय समाज व्यवस्था निर्माण व्हावी या मूळ हेतूने अनेकांनी अनेक सायास करुन मिळवलेले स्वातंत्र्य आपण खरोखरच उपभोगतो आहोत का याचा विचार करण्या करिता बौधीक विचार वाढवून वैचारिक उठाव करण्याची वेळ येवून ठेपली आहे.

काल हा इतिहास आहे. उद्या हे कोडे आहे व आज ही देणगी आहे. आपल्या या नवक्रांतीच्या वैचारिक परिवर्तन मोहीमेत आजच सहभागी व्हा. कालांतराने मी याच विचारांचा होतो ही जाहीरांत आपली मूळ निष्क्रीयता झाकू शकणार नाही.

सुशिक्षीत व राष्ट्रप्रेमी तरुणांच्या समाजाभिमुख बंडाची हीच वेळ आहे. म्हणून तरुणांनो जागे व्हा, आज सामाजिक, आर्थिक दृष्ट्या अस्थीर समाजात आदर्शवाद जोपासताना त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागेल, आवाहनाला प्रतिसाद देताना, स्वतःच्या अस्तीत्वाचा त्याग करावा लागणार आहे. पण अशा परिस्थीतीत आपण या मोहीमेत सहभागी झालात तर ही मोहीम उच्च त्यागाची व अपेक्षेहून अधीक तीव्र होईल असा विश्वास वाटतो. आज सर्वात अधिक निकड कशाची असेल तर ती देशातील प्रत्येक व्यक्तीच्या वृत्तीत बदल घडवून आणण्यासंबंधीची आहे. आपल्या तरुण मंडळीना याची जाणीव नसेल तर ती करुन द्यावी लागेल. तरुण माणसे त्यांच्या कामांत व्यग्र असली तरी राष्ट्रकार्यासंबंधीच्या त्यांच्या भावना तीव्र असतात हा यशवंतरावजींनी आपला अनुभव सांगून ठेवला आहे. तरुणांच्या बाबतीत आपले कर्तव्य काय असेल हे स्पष्ट करताना त्यांनी सांगीतले, आपण तरुणांबरोबर बसले पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे, त्यांना निरनिराळ्या गोष्टी समजावून सांगीतल्या पाहिजेत. त्यांच्यातील उत्तमोत्तम माणसे हुडकून काढली पाहिजेत आणि त्यांची विधायक शक्ती विधायक कार्याला लागेल अशा प्रकारचे कार्यक्रम आपण त्यांना दिले पाहिजेत. असे झाले तरच राष्ट्राने आपल्यापुढे ठेवलेली ध्येये साध्य करण्यांस आपण त्यांना उद्युक्त करु शकू. वयच नव्हे तर आपल्यापुढील आव्हान स्विकारुन त्याला तोंड देण्याची कुवत हे तारुण्याचे गमक असल्याचे स्व. यशवंतरावजींनी मानले होते. तरुणांनो याकरिता प्रबोधन शिबीरांत सामील होवून ही मोहीम प्रभावी करण्याकरिता नेतृत्व करा. समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे धैर्य नव्या पिढीने यशवंतरावांच्या सहृदयतेने, अभ्यास वृत्तीने दाखवावे. यशवंतरावांच्या एकाग्रतेने प्रत्येक समस्येचे मनन, चिंतन करावे. यशवंतरावांच्या तर्कशुध्द विचारपध्दतीने स्वतःचे निष्कर्ष काढावेत. यशवंतरावांच्या ध्येयनिष्ठेने व सिद्दीने हे निष्कर्ष व्यवहारात आणावेत. यशवंतरावांच्या भक्तीभावाने समाजाची आणि मातृभूमीची सेवा करावी.