मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४२

४२. द्रोपदीचा बंधू – मृणालिनी चितळे

यशवंतराव मराठी माणसाला मिळालेले एक वरदान, त्यांचे ते चांदणे फुलल्यागत सामोरे येणारे हास्य, ती स्नेहशील दृष्टी, प्रसंगाला धावून येतील असा विश्वास उत्पन्न करणारे व्यक्तिमत्त्व, काय काय, आणि कित्ती कित्ती सांगावे?

माझ्या जन्मानंतर भाऊ झाला, तो गेला. वडिलांनी संन्यास घेतला. घरच नाही मग माहेर कुठले? पण, मी भाग्यवान, रक्ताचे नसूनही भावापलीकडे धीर देणारे भाऊ भेटले. ५०,५१ साली अचानक दुस-या एका भावाबरोबर यशवंतराव आमच्या घरी पहिल्या प्रथम आले. आमच्या शेजारी एक कट्टे हिंदुमहासभेचे अभिमानी राहात असत. यशवंतरावांना पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यशवंतराव पत्री सरकारचे अध्वर्यू. त्यांनी अनंत लोकांना पैशासाठी छळले, त्यांच्या पायाला पर्ता ठोकल्या इत्यादी. अशा व्यक्तीचे आम्ही आमच्या घरी स्वागत केल्याने आम्ही असल्या कृत्याला आमची मान्यताच दिल्यासारखे. पण आमच्यावर त्यानंतर काँग्रेसचा छाप जो उठला तो न पुसला जाणा-या शाईचा.

अर्थात माझे झालेले शिक्षण, संस्कार, सारेच राष्ट्रीय वातावरणात झाल्याने मला त्याचा अभिमानच वाटतो. मतदानाची खूण जशी शाईच्या ठिपक्याने सिद्ध होते तसेच. अर्थात याच्याही आधी म्हणजे मंत्री, मुख्यमंत्री होण्याचेही आधी त्यांचे टॉन्सिलायटिसचे ऑपरेशन झाल्याचे कळल्याने त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या समाचाराला मी जाऊन आलेली होते. त्यावेळचे ते तरूण जोडपे, ते सस्नेह स्वागत, आजही डोळ्यांपुढे येते. त्या वेळच्या घरातील वातावरणात विशेष डामडौल, ‘(अर्थात तो पुढेही कधी दिसला नाही)’ फार मोठा इतमाम जरी नसला, तरी एका अगत्यशील घरात आपण आलो आहो याची जाणीव होण्याला पुरेसा होता. त्यानंतर मान, सन्मान चढत्या भाजणीच्या रूपाने त्या कुटुंबात आलेले पाहण्याचे भाग्यही मला लाभले. पण हे आजूबाजूचे झालेले फेरबदल त्यांच्या असलेल्या व्यक्तिगत नात्याचे आड कधीही आलेले नाहीत.

एका राखी पौर्णिमेला यशवंतरावजींचा मुक्काम पुणे येथे सर्किट हाऊसवर होता. अचानक दुपारी मनात आले की, यशवंतरावांचे हातात जाऊन राखी बांधावी. नारळी पौर्णिमा असल्याने, आमच्या येथे ओल्या नारळाच्या करंज्यांचा बेत होता. त्या करता करता हे मनात आल्याबरोबर माझ्या मुलीचा शाळेत नेण्याचा छोटासा डबा होता, त्यात दोन करंज्या घातल्या, राखी घेतली व तडक रिक्षा करून सर्किट हाऊस गाठले. खाली त्यांच्या भेटीसाठी पंढरी फुलली होती.त्यांचे भ्रातृतुल्य वैयक्तिक चिटणीस श्री.डोंगरे यांनी मला पाहताच त्या गर्दीतून पुढे येऊन सांगितले की, ‘‘तुम्ही वर जाऊन बसा, थोड्या वेळानी यशवंतराव येतील’’ त्या प्रमाणे मी वर गेले. तेथे एका खोलीत श्री. बाळासाहेब देसाई हे बसलेले होते, त्यांच्याशी माझा परिचय असल्याने मला एकदम संकोचल्यासारखे झाले. कारण मी एकच राखी आणि दोनच करंज्या घेऊन गेलेली. अर्थात त्यावेळी या विचारांचा काहीच उपयोग नव्हता. म्हणून, थोडा वेळ त्यांच्याशी बोलून मी बाहेरच्या व्हरांड्यात खुर्चीवर बसून राहिले. थोड्या वेळाने यशवंतरावही वर आले. जिन्या समोरच त्यांना मी बसलेली दिसताच हसून माझ्या येण्याबद्दल विचारणा केली. मी म्हटले,  ‘‘आज काय आहे ते विसरलात का?’’ ते म्हणाले ‘‘काय आहे बुवा?’’ तेव्हा मी म्हणाले ‘‘आज राखी पौर्णिमा नाही का? भावाच्या हातात राखी बांधावयाची असते आज.’’ नेहमीच्या पद्धतीने मनमोकळेपणाने हसून म्हणाले, ‘‘अरे खरचं की? माझ्या लक्षातच नाही.’’ असे म्हणून राखी बांधून घेण्यासाठी त्यांनी हात पुढे केला. मी म्हटले, ‘‘आधी तोंड  गोड केल्याशिवाय का राखी बांधावयाची असते?’’ आणि असे म्हणत करंजीचा डबा त्यांचे पुढे केला व त्यांनीही मोठ्या प्रेमाने त्यातील करंजी उचलून तोंडात घालणार इतक्यात श्री.बाळासाहेब देसाई आतल्या खोलीतून बाहेर आले. यशवंतरावजींनी क्षणभर माझ्याकडे पाह्यले याचा अर्थ मीही उमजले व दुसरी करंजी बाळासाहेबांचे पुढे केली तेव्हा त्यांनी विचारले हे काय? तेव्हा मी म्हणाले, ‘‘काही नाही, आज राखी पौर्णिमा आहे तेव्हा भावाचे तोंड गोड करावे.’’ पण श्री.बाळासाहेबांना कदाचित हा प्रकार अपरिचित वाटल्याने ते थोडा वेळ थबकले, पण मग यशवंतरावांनी त्यांना सांगितले ‘‘घ्या हो,’’ आणि मग साहजिकच दोघांनी आपआपले तोंड गोड केले. अशा रीतीने या मानीव नात्यावर शिक्कामोर्तब झाला. तो पुढे दिल्लीला गेल्यानंतरही टिकला. दर वर्षी राखी पौर्णिमेला  त्यांच्याकडे राखी व पेढ्यांचे पार्सल बरीच वर्षे श्री.घोडके पेढेवाले, केव्हा केव्हा चितळे मिठाईवाले यांचेतर्फे न चुकता रवाना होत असे.