पुण्याला काँग्रेसचे अधिवेशन झाले त्या वेळी त्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी असावे. यशवंतरावजी पुण्याला आले असताना स्त्री कार्यकर्त्याच्या भेटीला ते काँग्रेस हाऊसच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये बसलेले होते. मी त्या वेळी काँग्रेसची क्रियाशील सभासद झालेली होती आणि म्हणूनच कार्यकर्ती या स्वरूपात मी तेथे गेले होते. त्या वेळी मी त्यांना पेढे नेऊन दिले. त्यांनी विचारले, ‘‘हे कशाचे’ मी म्हटले, ‘‘हे, बाळ बी.ए.ची परीक्षा पास झाला त्याचे! त्यावर म्हणाले, ‘‘अरे वा! हो का?’’... मग आता पुढे काय करायचा बेत आहे?’’ मी म्हटले,‘‘आय.ए.एस. व्हावं अशी इच्छा आहे. पण त्याला एकवीस वर्षांची मर्यादा असल्याने व त्यासाठी दोन वर्षे थांबावे लागणार असल्या कारणाने त्याने एम् .ए. व्हावे अशी इच्छा आहे. आपले काय मत आहे?’’ ते म्हणाले ‘‘उत्तम! होऊ दे ना! आय.ए.एस. मुलं, आम्हांला हवीच आहेत!’’
त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य मंत्री म्हणूनही यशवंतरावांच्या कारकीर्दीत पुण्याला त्यांचे वारंवार येणे घडत असे. पानशेत धरणाची, पुण्यावर ओढवलेल्या संकटाची बातमी मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता श्री.बर्वे हे एकमेव अधिकारीच असा प्रसंग निभावून नेऊ शकतील या हेतूने त्यांना ताबडतोब पूरग्रस्त लोकांच्या मदतीला धावण्यासाठी सर्व सूत्रे त्यांच्या हाती सोपवून त्यांना विमानाने धाडले. ही एकच गोष्ट मनुष्याच्या कर्तृत्वाची योग्यता ओळखण्याची हातोटी व अशा प्रसंगात एक एक क्षणसुद्धा किती महत्त्वाचा आहे आणि त्या क्षणात काय काय करायला हवं त्याचा अंदाज घेऊन क्षणात त्याची अंमलबजावणीही करण्यासाठी ज्या पद्धतीने पाऊले उचलली, स्वत: ‘आंखो देखा हाल’ पाहण्यासाठी विमानातून सबंध नगराचे निरीक्षण केले व ज्या, ज्या, प्रकारची गरज व ज्या, ज्या मार्गांनी मदत देता येईल ते ते करण्यात पापणीची उघडझाप व्हावी इतक्या अवधीत हे सारे कार्यान्वित केले. हा सारा धावता आढावा म्हणजे डोळ्यांपुढून सरकणारा चलचित्रपटच माझ्या डोळ्यापुढे आजही उभा आहे. नंतर एकदा चि. बाळचा अमेरिकेला जाण्याचा त्याचा हट्ट त्यांचे कानांवर घालून त्यांचा सल्ला विचारला असता म्हणाले, ‘‘अहो जातो तर नाही काय म्हणता? तिकडे अॅडमिशन मिळणे इतके कठीण असताना आणि तीही त्याला घेण्यासाठी यु. एस्. आय. युसीसचे लोक आग्रह करताहेत आणि तुम्ही अष्टग्रहीची सबब काढताय? जाऊन येऊ दे त्याला.’’ असे म्हणून आशीर्वादासहित त्याच्या शिक्षणाची दिशा निश्चित केली व यशस्वी होऊन परत आल्यावर भेटायला येण्याचे आमंत्रण देऊन ठेवले. त्याचे लग्न ठरल्यावर सून दाखविण्यास नेली असता, सती वेणूतार्इंनीही कौतुकाने तिचा स्वीकार केला आणि लग्नानंतर दोघे पाया पडायला गेले, तर इतकी सुंदर चंदेरी साडी ओटी भरून दिली की, तितकी सुंदर साडी सबंध भरलेल्या कपाटात एकही नाही! अतिशय प्रेमाने, अगत्याने, जिव्हाळ्याने, आत्मीयतेने केलेल्या कौतुकाचे मोल का कधी करता येते? मधल्या काळात ही आत्मीयता वाढतच गेली...