३९. साहेबांना माणुसकीची पारख होती – ग.नी. जोगळेकर
मला वाटतं चव्हाणसाहेबांना माणसाची पारख करण्याची विलक्षण हातोटी होती. एखाद्यावर ते इतके प्रेम करीत, इतका विश्वास टाकीत की तो माणूस त्या ओझ्याखाली राहण्यात धन्यता माने.
जनतेच्या हृदयात मानाने विराजमान झालेला, सुसंस्कृत मनाचा एक अखिल भारतीय स्तरावरील नेता आपल्यावर प्रेम करतो ही कल्पनाच मोठी सुखद असे. संघाचे गुरूजी गेले आणि माझे मनमंदिर सुनेसुने झाले. चव्हाणसाहेबांची ओळख झाली आणि त्याच क्षणी पुन्हा मानसमंदिर भरून गेले.
गेली बारा-तेरा वर्षे मी नियमितपणे वर्षातून एकदा चव्हाणसाहेबांकडे त्यांच्या कामासाठी दिल्लीला जाऊ लागलो. त्या प्रचंड चौकात सफदरजंग रोड, अकबर रोड, राजाजी रोड, त्रिमूर्ती रोड आणि रेसकोर्स रोड असे सारे रस्ते एकत्र येतात. त्यातील एक रेसकोर्स रोड चव्हाणसाब की कोठी- हे माझे उतरण्याचे ठिकाण. रस्त्यापासून चांगला फर्लांगभर आत जाणारा जरासा तिरका रस्ता, त्या कडेने प्रचंड वृक्ष, आता कार्यालयासाठी असलेली एक बैठी चार मोठ्या खोल्यांची इमारत, शेजारी राहण्यासाठीची इमारत. भोवती हिरवळीची विस्तृत मैदाने, त्यातच डवरलेल्या तुळशीचा संभार घेतलेले तुळशीवृंदावन, कंपौंडच्या कडेने सेवकवर्गासाठी असलेली बैठी घरे, अशाच एक घरात डोंगरे राहात असत. ते होते तोपर्यंत मी त्यांच्याच घरात राहात होतो. गेली सात वर्षे मी साहेबांच्या घरात त्यांचा पाहुणा म्हणून उतरत असे.
मला न्यायला विमानतळावर गाडी घेऊन माणूस यायचा. पाहुण्यांसाठी खोली नीटनेटकी केलेली असे. जाऊन पोचलो की, मग साहेब आणि वेणूताई दोघेही माझ्या खोलीत येत. चहा-कॉफीच्या वेळा विचारत. जेवणाच्या वेळा आणि पथ्य विचारत. मी असेपर्यंत स्वयंपाकघरातून कांदा-लसूण यांची हकालपट्टी असे.
घरच्या माणसांची विचारपूस करीत आणि मग सर्व मुक्कामात तिथली गडी-माणसे जागरूकतेने लक्ष ठेवीत, हवं- नको विचारत. मध्येच गंगा नावाचा सेवक येऊन विचारे, ‘‘साब विचारतात, मोकळे असताल तर गप्पा मारायला येऊ का ?’’
जेवताना गप्पांना मोठा रंग भरावयाचा. एकदा आम्ही तिघे असेच जेवत होतो. मी गोष्ट सांगू लागलो, ‘‘मी संघाचा विचारक म्हणून पंढरपूरच्या करकम गावी गेलो होतो. एका स्वयंसेवकाकडे जेवायला जात असे. सोलापूर बाजू म्हणजे भयंकर तिखट खाणारी. आमटीचा एक झुरका मारला आणि डोळ्यातून पाणी वाहू लागले. स्वयंपाक करण्या-या त्याच्या आईने ते पाहिले. ती मला समजुतीच्या स्वरात म्हणाली, ‘‘समाजाच्या कामासाठी बाहेर पडलं तरी अशी घरची आठवण केव्हां तरी यायचीच.’’ साहेब आणि मी हसलो. वेणूताई खाली मान घालून घास घेता घेता म्हणाल्या, ‘‘आज आमटी कशी काय आहे?’’ आणि त्यांच्या प्रश्नाचा रोख ओळखून आम्ही तिघेही हसू ओठात दाबत राहिलो. नंतरही केव्हा त्याची आठवण झाली तर साहेब जेवताना म्हणायचे, ‘‘वासू, आमटीला तिखट बेताचे आहे ना?’’ वासूही अनभिज्ञपणे म्हणे, ‘‘बाईसाहेबांनी सांगूनच ठेवलंय ना?’’
राजकारण-समाजकारण-अध्यात्म-साहित्य-संगीत या विविध विषयांवर गप्पा रंगत. साहेब अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत बोलत, पण शब्दांची निवड अचूक असे. त्यांची पत्रे येत ती सुद्धा मनाचा ठेव घेत. मला पत्राचे उत्तर द्यायचा फार कंटाळा. त्यांच्या पत्रात असे, ‘‘मी तुमच्या पत्राची वाट पाहत आहे’’ आणि मग मला उत्तर तातडीने लिहावेच लागे. जुलै १९८३ मध्ये म्हणजे वेणूताई गेल्यापासून महिना सव्वा महिन्यांनी त्यांनी स्वत:च्या अक्षरात मला पाठवलेले पत्रच वाचा म्हणजे वाचणा-याच्या मनाची उलघाल आपल्यालाही अनुभवण्यास मिळेल.