मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४०

४०. यशवंतराव, एक उत्कृष्ट प्रशासक  - डॉ.आर.डी  शिंगटे

वर्तमानपत्रातून आलेला यशवंतरावांचा फोटो दृष्टीस पडला की, जुन्या आठवणींच्या जळणीला आमच्या मातोश्रींना संधी मिळायची. यशवंतराव तिच्या मैत्रिणीचे सुपुत्र. साहजिकच तिलाही त्यात गौरव वाटायचा. यशवंतरावांचे वडील बेलिफ, माझेही वडील बेलिफ, दोघेही ट्यासारख्या लहानशा गावात, एकाच ठिकाणी, एकाच हुद्यावर काम करायचे. मैत्रीला यापेक्षा अधिक वळच्या कारणाची काय आवश्यकता? यशवंतराव लहान असतानाच त्यांचे वडिल निवर्तले व त्यांच्यासह त्यांच्या मातोश्री कराडात स्थायिक झाल्या. पुढे माझा मोठा भाऊ कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकू लागला. त्यावेळी विद्यार्थी वसतिगृहे नसल्याने कुणाच्यातरी घरी राहणे आवश्यक होते. जुन्या परिचयामुळे घरच्या लोकांनी यशवंतरावांचे घर पसंत केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर यशवंतराव राजकारणात पडले, माझा भाऊ नोकरी करू लागला. आमच्या दोन घरांचा परिचय इथेच थांबला.

१९५६ साली यशवंतराव द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९५७ ला मला जर्मनीत शिकण्याकरता भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. जर्मनीतील राहण्याचा व शिक्षणाचा खर्च भागवण्याइतकी शिष्यवृत्तीची रक्कम पुरेशी असल्याचे मला सांगण्यात आले. प्रश्न होता तो भारतात राहणा-या पत्नीचा व दोन मुलांचा. अभ्यास रजा मंजूर झाल्यास मिळणा-या पगारात त्यांच्या खर्चाची सोय झाली असती म्हणून शिक्षण संचालकाकडे तसा अर्ज केला. त्यावेळी मी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये व्याख्याता होतो. तुमच्या शिक्षण शिष्यवृत्तीचा आम्ही पुरस्कार केला नसल्याने आपण मागितलेली अभ्यास रजा आपणास देता येत नाही हे उत्तर मिळाल्यावर शिष्यवृत्ती नाकारण्याशिवाय मला अन्य पर्याय नव्हता. तसा निर्णयही घेतला, फक्त दिल्लीला कळवायचे शिल्लक होते. दरम्यान यशवंतराव सातारला भेट देणार होते. अशा वेळी आजूबाजूचे सर्व पुढारी तिथे जातात त्यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष, एम.डी.पवार, स्नेही या नात्याने सातारला गेले, त्यांना मी जर्मनीला जायचे रहीत करीत आहे याची कल्पना होती. बोलता बोलता ही गोष्ट त्यांनी त्यांच्या कानावर घातली, त्या वेळी ते म्हणाले, ‘‘अजब आहे म्हणायचे माझे सरकार? एखाद्याने स्वत:च्या गुणवत्तेवर कुणाच्या शिफारशीशिवाय शिष्यवृत्ती मिळविली हा काय गुन्हा झाला?’’

ह्या भेटीनंतर चौथ्या दिवशी अनपेक्षितपणे मला एक शिक्षण संचालकांकडून पत्र आले. त्यात त्यांनी पाठविलेले पहिले पत्र रद्द करून माझी नामंजूर केलेली अभ्यास रजा मंजूर केल्याचा मजकूर होता. या पत्राने माझा आनंद गगनात मावेना हे लिहायला नको. आता ही कृती यशवंतरावांनी आमचा जुना परिचय लक्षात घेऊन केली असे इतरांच्याप्रमाणे मीही समजलो. पण त्यांच्या कुशल शासनाचा अवमान होता हे कळायला काही काळ जावा लागला.

दुसरा प्रसंग मुंबईहून कोल्हापूरला एका प्राध्यापकाची बदली झाली. त्यांना अस्थम्याचा आजार होता. कोल्हापूरचे हवामान त्यांना अगदीच मानवेना. औषधोपचार करूनही ते प्रकृतीकडून बेजार झाले. परत बदलीचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने चांगले हताश झाले होते. माझ्याबाबतीत यशवंतरावांनी स्वत: लक्ष घालून मला न्याय दिल्याचे त्यांना माहीत होते. परिचय नसताना एका सरकारी कॉलेजच्या प्राध्यापकाने मुख्यमंर्त्याना भेटणे धाडसाचे होते. पण ते त्यांनी अगदी जिकिरीला आल्याने केले. तेही कुठल्यातरी समारंभात. यशवंतरावांनी त्या वेळी त्यांना कसलेही आश्वासन दिले नाही, पण त्यांचे नाव लक्षात ठेवून शिक्षणसंचालकांना अडचण योग्य वाटल्यास तिचा सहानुभूतीने विचार व्हावा ही सूचना केली. थोड्याच दिवसांत त्या प्राध्यापकाला हवी असणारी बदली मिळाली. जो शासनप्रमुख लहानमोठा असा भेद न करता सर्वांची सुखदु:खे सहानुभूतीने समजून त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतो, तो यशस्वी असे मी समजतो.