मी जेव्हा प्रत्यक्षात बाहेरच्या जगात पाय ठेवला, त्या वेळी मी अधिक दुबळा बनतो, की काय, असे मला वाटू लागले. बाहेरच्या समाजातल्या ज्या वातावरणाकडे मी पाहत होतो, ते मला शुद्ध, स्वच्छ वाटत नव्हते. हिमालयाच्या अंगावरून स्फटिकशुभ्र पाण्याचे झरे स्वच्छंद धावत असतात. श्रमिक पथिकांचे लक्ष ते झरे तेव्हाच वेधून घेतात. तहानलेला पथिक त्याचा मनमुराद आस्वादही घेतो; परंतु नंतर मात्र त्याच्या अंगाचा दाह होऊ लागतो. असे सांगतात की, तेथील अनेक झरे जे वाहत येतात, त्यांच्या मार्गात विषारी वृक्ष असतात. त्या वृक्षांच्या मुळांतील विष त्या पाण्याबरोबर नेहमीच वाहत असते आणि ते शुभ्र जीवन अनेक पथिकांचा जीवनप्रवाह गोठविण्यास कारणीभूत ठरते. त्या स्वच्छंदी झ-यासही त्याची कल्पना नसते, तो आपला वाहतच असतो.
आमच्याकडील समाजपुरुषाच्या मनातही विचारांचे जे झरे पाझरत होते, ते मला काहीसे असेच वाटत होते. परिस्थितीची कोंडी फोडण्यासाठी मी बाहेर पडत होतो खरा; परंतु दुसरी एक वैचारिक कोंडी माझ्याभोवती तयार होऊ पाहत होती. आमच्या भागात त्यावेळी ब्राह्मणेतर चळवळीची एक वावटळ उठली होती. घरात आणि घराबाहेरचे वातावरण या चळवळीने वेढलेले होते. आजूबाजूला मी जे पाहत होतो, ऐकत होतो, अनुभवीत होतो, ते काही प्रसन्न नव्हते. सत्यशोधकांचे मी जे वाचीत होतो, त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असे दुसरे मोठे पवित्र काही आहे; आणि ते समाजासमोर हिरिरीने का ठेवले जात नाही, असेही वाटत होते. त्या वेळचा काळ मोठा वैचारिक गोंधळाचा होता आणि त्या सर्वांमधून मी मोकळा कसा राहिलो, याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते. ब्राह्मणेतर चळवळीचे विशेष असे आकर्षण माझ्यावर फार काळ टिकले नाही. ते का टिकले नाही, याचे उत्तर देणे हे मला आजही बुचकळ्यात टाकते; परंतु माझ्या मनाने त्याचे जे एक कारण असू शकेल, ते म्हणजे अवतीभवती विचारांची वेटोळी पडलेली असतानाही मी त्याशिवाय वेगळे असे काही वाचीत होतो.
काँग्रेसच्या नेत्यांची शिकवण होती. समाजनेत्यांचा आदर्श होता. आणखी पुष्कळ होते. मी विचार करून वाचीत होतो आणि वाचून विचार करीत होतो आणि या दोन्हींची सांगड अनुभवाशी लावीत होतो. पुढे-पुढे तो एक माझा स्वभावच झाला. विचार करून, अनुभवातून प्रतिक्रिया व्यक्त करावयाची, हा माझ्या स्वभावाचा स्थायिभाव त्या वेळेपासूनचा आहे. गेल्या बेचाळीस वर्षांच्या माझ्या राजकीय जीवनात त्या वेळच्या त्या संयमी विचारांची सोबत मला अनेकदा उपयोगी पडत आली आहे.
वाचनाला आणि विचाराला अनुभवाचे कोंदण लाभावे, अशी त्या वेळी कराडची स्थिती होती. आमचा कराड भाग नेहमीच जागृत. सत्यशोधकांच्या चळवळीमुळे समाजाचे मन बदलत चालले होते, बदललेही होते; मी ते अनुभवीत होतो. माझे अंतःकरण मात्र दुसरेच काहीतरी धुंडाळीत होते, मोठमाठी माणसे तुरुंगात जातात, हालअपेष्टा भोगतात, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलाढ्य इंग्रजांना तरुण मने आव्हान देतात, जिवाची कुर्बानी करतात. हसत-हसत फासाची दोरी स्वतःच स्वतःच्या गळ्याभोवती आवळून घेतात आणि‘जय भारत’म्हणून पंचत्वात विलीन होतात, हेही माझ्या वाचनात होते. सत्यशोधक मंडळी यासंबंधी का बोलत नाहीत, असे मला नेहमी वाटे. स्वातंत्र्याचा शोध हाच खरा सत्याचा शोध असू शकतो, याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नव्हती. समाजात वावरताना मात्र मला जो अनुभव मिळत होता, तो खटकणारा होता. तथापि, अनुभव कोणता का असेना, तो कधी व्यर्थ जात नाही, अशी माझी धारणा असल्याने तसलाही अनुभव गाठी बांधून मी पुढे जात होतो.
तेव्हा माझे वय सोळा-सतरा वर्षांचे असेल. कराडला त्यावेळी प्लेग सुरू होता. अर्धेअधिक गाव फुटले होते. लांब कुठेतरी दोन-तीन मैलांवर रानांत वस्त्या उभ्या होत्या. प्लेगच्या भीतीने माणसे रानावनांत पसरली होती. अगोदरच विस्कळीत झालेल्या समाजातील ही फुटाफूट अधिकच भयाण वाटावी, अशी स्थिती होती. शाळा बंद होत्या, म्हणून अभ्यासही बंद होता; पण तेही एका दृष्टीने ठीकच होते. अभ्यासाकडे लक्ष देण्याला माझे मन तरी कुठे स्थिर होते?