शब्दाचे सामर्थ्य २

कारावासात काढलेले आयुष्य, निरनिराळ्या राजकीय शास्त्रांचे मनन, चर्चा व चिंतन यांविषयी त्यांच्या शब्दांत म्हणावयाचे, तर‘१९४० पासूनची वैचारिक बैठक, राजकीय प्रवासातील माझी कायमची सोबत झाली आहे. ह्या विचारमंथनात, आर्यभूषण भवनाच्या शेजारच्या गुडलक रेस्टॉरंटचाही भाग आहे. १९३९ साली लॉ कॉलेजला असताना गुडलकमध्ये पिवळा हत्ती सिगारेटचा धूर सोडीत व तो पाहत मी तासन् तास काढी.’ या विचारमंथनातूनच, तसेच, १९४२ च्या स्वातंत्र्य-लढ्यात सातारा जिल्ह्यातील पत्री सरकारच्या कार्यात सहभागी होऊनही यशवंतरावांची लोकशाहीवरील निष्ठा व वैचारिक बैठक एकापरीने पक्की झाली. त्याचे उदाहरण म्हणजे १९५२ साली ते म्हणाले की,‘गरीब मनात नव्या आकांक्षा उत्पन्न करून, त्यांना कार्यप्रवण करण्यास प्रवृत्त करण्याऐवजी त्यांच्यांत असंतोषच पसरविण्याचा प्रयत्‍न झाला, तर रात्री त्यांचे लक्ष त्या श्रीमंतांच्या तिजोरीकडे जाईल, इतकेच. पण खरा प्रश्न कायमच राहील. पैसा हा पुंजीपतीच्या किंवा सरकारच्या तिजोरीत नसून, तो आकाशातील ढगांत आहे. त्या ढगांतून खाली पडणार्‍या जलधारांत आहे. त्या पाण्याच्या प्रवाहरूपी नदीत आहे. नदीच्या दुकाठांस मिळणार्‍या काळ्या जमिनीत आहे. त्याच जमिनीतील खनिज संपत्तीत आहे, त्याच खनिज संपत्तीद्वारा निर्माण होणार्‍या वैज्ञानिक यंत्रसामग्रीत आहे, इतकेच नव्हे, तर त्या सर्वांना एका सूत्रात बांधणार्‍या मानवाच्या मनगटात आहे. असे जर ह्या गरीब जनतेला पटवून देऊन, त्यांच्यांत सर्जन-शक्ती निर्माण करून कार्यप्रवण केले, तर आपले सर्व प्रश्न सुटतील व त्या सुटण्यातच भारतीय लोकशाहीचे भवितव्य सामावलेले आहे.’सहा-सात वाक्ये, पण त्यांत कितीतरी विचार सामावलेले आहेत. त्यांना हे विचार कुठून सुचले?

थोडक्यात, यशवंतरावांची आई, कराड येथील टिळक हायस्कूलमधील विद्यार्जन, तसेच, राजकीय प्रवासातील तुरुंगवास या संस्काराने यशवंतरावांच्या मनाची जडणघडण केली. हे संस्कार काय व कसे झाले, हे पहिल्या भागात सादर करण्यात आले आहे.

दुसरा भाग व्यक्तींविषयी आहे. यशवंतरावांची वृत्ती लोकसंग्रहाची होती. त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक व्यक्तींशी त्यांचे मैत्रीचे व घनिष्ठ संबंध होते. त्यांमध्ये जसे राजकारणी होते, तसेच, समाजसेवक, पत्रकार, उद्योगपती, नट-नट्या, निरनिराळ्या क्षेत्रांतील लेखक, साहित्यिक, कलाकार होते. त्याचबरोबर ज्या मातीतून यशवंतराव निर्माण झाले, ज्या कृष्णा-कोयना परिसरात स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी झेप घेतली, त्या भागात, प्रत्येक गावात अनेक व्यक्तींशी त्यांचे प्रेमाचे घनिष्ठ संबंध होते. आयुष्यभर यशवंतरावांनी ते संबंध जोपासून ठेवले.

वरील व्यक्तींपैकी काही निवडक व्यक्तींविषयी त्यांनी जे लिहिले आहे, त्याचे संकलन या ग्रंथात केले आहे. त्यांत प्रामुख्याने यशवंतरावांची दैवते महात्मा गांधी, राजर्षि शाहू छत्रपती, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक आहेत. तसेच, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात ज्यांनी त्यांची जडणघडण केली, असे कर्मवीर भाऊराव पाटील व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे आहेत. त्यांच्या परिसरातील, ज्यांचा राजकीय आयुष्यात घनिष्ठ संबंध आला, असे नाना पाटील, रत्‍नाप्पा कुंभार, किसन वीर, वसंतदादा पाटील, नरूभाऊ लिमये आहेत व नाटक आणि साहित्य क्षेत्रांत काकासाहेब खाडिलकर, वि.स. खांडेकर, कवी यशवंत वगैरे आहेत. कितीतरी अधिक व्यक्तींविषयी त्यांनी निरनिराळ्या प्रसंगी लिहिले आहे किंवा त्यांच्याविषयी ते बोलले आहेत. कित्येक साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिताना त्यांनी त्या साहित्यिकांशी असलेला संबंध, तसेच, त्यांच्या साहित्याचे विश्लेषण केलेले आहे. हा प्रस्तावना स्वरूपात असलेला मौलिक ठेवा श्री. विठ्ठलराव पाटील यांनी आपल्या पुस्तकात नुकताच प्रसिद्ध केला आहे.