शब्दाचे सामर्थ्य १०

मला असे नेहमी वाटते की, माणसाचे जीवन फुलायचे असेल, तर त्याला अशा काहीतरी सोबतीची सांगड पाहिजे. माझा तरी तो अनुभव आहे. माझ्या आयुष्यात जर काही घडल्याचे दिसत असेल, तर ते माझ्या सोबत्यांनी घडविले, असे माझे प्रांजळ मत आहे. प्रत्येक मनुष्य स्वतःचे जीवन स्वतःच घडवितो, असे मी तरी मानीत नाही. जीवनाची मी जी वाटचाल केली, त्यात योगायोगाचा काही भाग जरूर आहे. योगायोग याचा अर्थ, तेथे कर्तृत्व निष्प्रभ होते, असा नव्हे. मनुष्य हा स्वयंप्रकाशित आहे, ही अध्यात्माची भाषा खरी असली, तरी व्यवहारात मनुष्याची शक्ती मर्यादित आहे, असा अनुभव येतो. अदृश्यातील अनेकानेक शक्ती मानवी जीवन मागे-पुढे खेचू शकतात. ही वस्तुस्थिती निर्विवाद मानावी लागते. माणसाची इच्छाशक्ती असीम खरी; पण तिची पूर्तता सर्वस्वी मानवाची आहेच, असे नव्हे. तसे जर असते, तर‘योगायोग’या शब्दाचा जन्म होऊ शकला नसता. मानवमात्राच्या ठिकाणी विचारांची शक्ती मोठी असली, तरी त्याच्याही पलीकडे नियती शिल्लक उरतेच. एखाद्या गोष्टीचे ज्ञान पूर्णांशाने होऊच शकत नाही. ही नियतीची अबाधित व्यवस्था आहे. नियतीचा हा क्रम बदलण्याची शक्ती अजून उपलब्ध व्हावयाची आहे. जगाच्या अर्ध्यावर अंधार आणि अर्ध्यावर उजेड, हा नियतीचा नियम मानवी जीवनातही आढळतो. गावात शिरून मोठमोठया हवेल्या पाहिल्या, तरी त्या गावची वेस विसरावयाची नाही, ही कृतज्ञता मला परिस्थितीने शिकविली आहे.

भारतीय लोकशाहीची मृत्युघंटा वाजते आहे, अशा घोषणांनी मी सचिंत होत नाही. मला स्वतःला भारतीय लोकशाहीचे रोपटे रसरसलेले आहे, असे वाटते आणि लहानशा वादळाने ते उन्मळून पडेल, अशी भीती मला वाटत नाही. शासनाचा दर्जा आणि उंची  दिवसेंदिवस वाढवायला हवी. राज्यकारभार हाकण्यासाठी दिवसेंदिवस नवी तडफदार तरुण मंडळी पुढे येत असून, त्यांच्या आशाआकांक्षा-महत्त्वाकांक्षा ध्यानी घेतल्या जाणे जरूर आहे. हे तरुण नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत, ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत जागरूक आहेत. सरकारातील किंवा कायदेमंडळातील लोकप्रतिनिधी त्यांच्यांशी कसे वागतात व त्यांना वागवून कसे घेतात, याला फार महत्त्व आहे.

सरकारी यंत्रणेची पोलादी चौकट अद्याप फारशी बदललेली नसली, जुने सनदी नोकर आणि त्यांच्या काम करण्याच्या विशिष्ट पध्दतीत फारसा बदल झालेला नसला, तरी जुन्या-नव्यांना बरोबर घेऊन आपल्याला चांगली कामे करवून घ्यावयाची आहेत, त्यांना पटवून देऊन जनतेच्या गरजा पुर्‍या करावयाच्या आहेत, हे सरकारात किंवा उच्च पदांवर बसलेल्यांनी विसरता कामा नये. सुदैवाने सर्वच राजकीय पक्षांतील जुनी अनुभवी व नवी तरुण शिकलेली मंडळी आजकाल कायदेमंडळात व सरकारात दिसू लागली आहेत. या मंडळींवर नव्या बदललेल्या परिस्थितीत फार मोठी जबाबदारी आहे. सार्वजनिक जीवनातील कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपल्यावर काही बंधने घालून घेऊन, आपल्या जबाबदार्‍या पार पाडायला हव्यात. नैतिक चारित्र्य, कर्तृत्व, अभ्यासूपणा, गुणग्राहकता, लोकसंग्रह यांना विशेष महत्त्व असून, ज्याच्याजवळ किमान ही पुंजी नसेल, तर तो फारशी प्रगती करू शकणार नाही.‘स्वार्थापेक्षा सेवा मोठी, भोगापेक्षा त्याग  मोठा’याची किंमत कमी झालेली नाही. लोक या गोष्टीकडे अजूनही मोठ्या कटाक्षाने बघत असतात. त्याचबरोबर जुन्या अनुभवी मंडळींकडून आपण काही शिकले पाहिजे, उमेदवारी केली पाहिजे, असा दृष्टिकोन ठेवून आपापली वाढ केली पाहिजे.

कोणाला जर वाटत असेल की, आपण स्वयंसिद्ध आहोत किंवा परिपूर्ण आहोत, तर ते चुकीचे आहे. सरकारबाहेर फार मोठी मंडळी काम करीत असतात व सरकारचे व सरकारातील घटकांचे काम ते बारकाईने पाहत असतात. या मंडळींकडून केवळ वाहवाच नव्हे, तर वेळोवेळी सल्लामसलत, विचारविनिमयाचा लाभही मिळविता आला पाहिजे, महाराष्ट्र किंवा मुंबई राज्याचा कारभार हाकताना मी या गोष्टींकडे विशेष लक्ष देत होतो. राज्यात काम करताना त्याची विशेष आवश्यकता असते. राज्यकर्त्यांनी दुहेरी दळणवळण व दुसर्‍याचा दृष्टिकोन समजावून घेण्याची गरज विसरता कामा नये. सूडबुद्धी न बाळगता दृष्टिकोन समतोल व वृत्ती शांत ठेवायला हवी. या भूमिकेचा मला वादळी स्थितीतही फार उपयोग झाला.

राज्य कोणत्या पक्षाचे आहे, हे कोण चालवितो, यापेक्षा ते कसे चालविले जाते, याला फार महत्त्व आहे. चालू काळ संक्रमणाचा आहे. त्याचबरोबर वेगवेगळी आव्हाने दिली जात आहेत. या आव्हानांना सार्थपूर्ण तोंड देऊन भारतीय लोकशाही टिकेल व वाढेल, अशी माझी श्रद्धा आहे.