संस्कार
१
संस्कारांचे सामर्थ्य
सिंहावलोकन करीत कर्तृत्वाची वाटचाल करणारा मी एक संस्कारक्षम माणूस आहे. सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते घेत मी आलो आणि पुढे चाललो आहे. काही करावयाचे, असे ठरवून, एखाद्या मुशीत बांधून घेण्याचा‘जाणता’प्रयत्न मी कधी केलेला नाही. माझ्यात काही वेगळीक आहे, असे मला विद्यार्थिदशेत असतानाही कधी वाटले नाही. एवढे मात्र खरे की, मी वयाने वाढत असताना, आपण एका सामान्य कुटुंबातील आहोत, याची जाणीव व्हावी, असे काही माझ्या अवतीभोवती सतत घडत होते. जाणिवेने मी ते न्याहाळत होतो; पण त्याची मला खंत वाटावी, असे वातावरणच माझ्याभोवती नव्हते.
कारण असे की, मी माझ्या आईच्या अवतीभोवती वाढलो. साक्षात प्रेम असे जिच्याकडे पाहून म्हणावे, अशी माझी आई आहे. तिची अन् शाळेची ओळख नसेलही; पण तिचे कर्तृत्व दांडगे आहे. खर्या अर्थाने ती सुमाता आहे. आईच्या प्रेमाने वाढविलेली फार मोठी झालेली माणसे मी आजही जेव्हा पाहतो, तेव्हा मला माझी आई अधिक समजते. माझ्या कुटुंबात हीच खरी श्रीमंती आहे. या श्रीमंतीने मला मनाचा राजा बनायला शिकविले.‘मन थोडे मोठे कर’असे कुंतीने धर्मराजाच्या एका प्रश्नाला, म्हणे, उत्तर दिले आहे. आईने आम्हां भावंडांची मने अशीच मोठी बनविली. मनाचा कोतेपणा हा अनेक दुःखांचे मूळ असू शकतो, याचे धडे आईने मला प्रत्यक्ष दिले नसतीलही; परंतु तिच्या कृतीतून मी ते सतत टिपले आहेत. परिस्थितीने गांगरून जायचे नाही, हा पहिला धडा आईने माझ्याकडून गिरविला, तो अगदी लहानपणी. त्या वेळी आम्ही कराडला होतो. घरची अतिशय गरिबी. वडील लहानपणीच वारलेले. घरात मिळवते कोणी नाही. हातातोंडाची गाठ पडावी, एवढेही साधन जवळ नाही आणि त्यातून आई आम्हांला वाढवीत होती. नकळत माझ्यात एक जिद्द निर्माण करीत होती. शाळेतील शिक्षण याच अवस्थेत संपले. मुले दुबळी आहेत, याची आईला नेहमी खंत वाटत असे. मुलांना कोणी पाठीराखा नाही, म्हणून तिचे मन तुटत होते, पण तिने कधी भासू दिले नाही. तथापि, आम्ही मुले परावलंबी होणार नाही, याचीही काळजी होती. त्या लहान वयात मला ते थोडे-फार समजत होते; पण त्यावरचा उपाय मात्र उमजत नव्हता, आणि तेही खरेच आहे. थोरांचे उलगडे लहानांना होऊ लागले, तर जगातले बाल्यच नाहीसे होईल, नियतीची तशी योजना नाही. नियतीला हे जग केवळ सुखीही ठेवायचे नाही आणि दुःखीही बनवायचे नाही. श्रीखंडाच्या जेवणातही हिरव्या मिरचीची चटणी लागतेच, तरच त्या जेवणाला रुची येते आणि सुखाचे श्रीखंड पोटभर खाता येते; पण त्या वेळी माझ्या पानात काहीच नव्हते. मोकळ्या ताटावर बसून भूक भागविण्याची आईची कला मला अवगत नव्हती.
मनाच्या कोंडवाड्यातून बाहेर पडावे, धडपड करावी, शिकावे, आईचे ओझे हलके करावे, असे नेहमी वाटे, परंतु जागच्या जागी पंख फडफडविण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नव्हतो. परिस्थितीचे कुंपण चारी बाजूंनी उभे होते. एरवी कुंपणात शिरणार्याना काटे बोचतात, ते बोचावेत, अशीच ती व्यवस्था असते. कुंपणाच्या आत जे असेल, ते स्थिर राहावे, अशासाठी ती योजना असते; परंतु मला कुंपणात स्थिर व्हावयाचे नव्हते. तशी स्थितीच नव्हती, हीच खरी अडचण होती. परिस्थितीच्या कुंपणातून बाहेर पडताना अंगाला काटे बोचतात, अंग फाटून निघते, याचाही अनुभव माझ्या गाठी नव्हता. आहे त्या कोंडीतून बाहेर निसटायचे, एवढेच माझ्यासमोर होते.