मराठी नाटककारांच्या समाजाभिमुखतेबरोबरच त्यांच्या प्रयोगशीलतेचाही निर्देश करणे अगत्याचे आहे. कै. विष्णु अमृत भाव्यांनी कर्नाटक प्रांतातील नाटकांचे अनुकरण करून आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया घातला; किर्लोस्करांनी त्याला संस्कृत नाट्यतंत्राची जोड दिली; कोल्हटकरांनी पार्शी रागदारीचे नव्या चालीवरचे संगीत, अद्भुतरम्य कथानके व विनोदी उपकथानके यांची जोड देऊन मराठी रंगभूमीचे स्वरूपच बदलून टाकले; खाडिलकरांनी राजकीय प्रश्नांची चर्चा करण्यासाठी पौराणिक कथानकांचा उपयोग केला व प्रेक्षकांची संगीताची अभिरुची लक्षात घेऊन संगीताचा मुक्त हाताने उपयोग करून घेतला. बाळाकोबा नाटेकर, भाऊराव कोल्हटकर, मुजुमदार, गणपतराव भागवत, बालगंधर्व, केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर, इत्यादी ख्यातनाम नटांनी अभिनयाचा व संगीताचा दर्जा विकसित करण्याला फार मोठे साहाय्य केले. मराठी रंगभूमीची दुरवस्था लक्षात घेऊन इब्सेनच्या धर्तीचे एक प्रवेशी अंक, बॉक्स सीन्स् आणि अद्ययावत नाट्यतंत्र यांच्या साहाय्याने श्री. वर्तक, श्री. अत्रे, श्री. रांगणेकर, इत्यादी नाटककारांनी रंगभूमीचे नव्या थाटात पुनरुज्जीवन केले. कै. कोल्हटकर, कै. आळतेकर, श्री. केशवराव दाते. श्री. के. नारायण काळे, यांसारख्या नटांनी नाट्यनिर्मितीला नवी दिशा दाखविली. आजही मराठी रंगभूमीवर नव्या नव्या तांत्रिक साधनांच्या साहाय्याने अभिनव प्रयोग करण्याची स्वागतार्ह प्रवृत्ती स्पष्ट दिसत आहे. यात अनुकरणाचा थोडासा भाग असल्याने, त्यातील परकेपणा जरी काहीसा जाणवत असला, तरी तो हळूहळू कमी होत जाऊन मराठी रंगभूमी अद्ययावत, कलासंपन्न, अभिरुचिसंपन्न बनेल, अशी सुचिन्हे दिसत आहेत.
दुरिताचे तिमिर जाओ। विश्व स्वधर्मसूर्यो पाहो।
जो जे वांछिल ते ते लाहो । प्राणिजात ॥
ही महाराष्ट्र राज्याची प्रेरणा आहे. राज्यातील कलात्मक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या या धोरणानुसार महाराष्ट्र सरकार मराठी रंगभूमीच्या विकासाकरिता प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणूनच दर वर्षी नाट्यस्पर्धा घेऊन, यशस्वी नाट्यप्रयोगांना व नटांना राज्य सरकारतर्फे पारितोषिके देण्यात येतात. या नाट्य-स्पर्धांत गुजराती, हिंदी आणि संस्कृत नाट्यप्रयोगांनाही स्थान दिले जाते. प्रारंभी या नाट्यस्पर्धा प्रमुख शहरांपुरत्याच मर्यादित होत्या, परंतु आता त्या व त्यांच्या अनुषंगाने होणारे नाट्यमहोत्सव लहान लहान गावांमधूनही करण्यात येतात; ग्रामीण विभागातील जनतेच्या सोयीसाठी नाममात्र दर आकारून त्यांना हे प्रयोग दाखविण्याची व्यवस्था केली जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी महोत्सव झाल्याने स्थानिक कलावंतांनाही संधी व उत्तेजन मिळू शकते. ख्यातनाम कलाकारांबरोबरच होतकरू कलावंतांना नाट्य-महोत्सवात भाग घेण्यासाठी मुद्दाम पाचारण करण्यात येते.
नाट्य-प्रयोगाबरोबर नाट्य वाङ्मयाचाही विकास व्हावा, या हेतूने उत्कृष्ट नाटकांच्या लेखकांना प्रतिवर्षी पारितोषिके देण्यात येतात. यांत प्रौढांकरिता लिहिलेल्या नाटकांबरोबरच मुद्दाम बालकांसाठी लिहिलेल्या नाटकांचाही स्वतंत्रपणे परामर्श घेतला जातो.