शब्दाचे सामर्थ्य २३८

सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने ललित साहित्याची सामाजिकताही अत्यंत महत्वाची आहे. कलाबाह्य निकष लावून, हेतुवादी साहित्य श्रेष्ठ ठरवावे, अशा मताचा मी नाही. पण समाजाच्या प्रबोधनासाठी, त्याचा भावपिंड घडविण्यासाठी ललित साहित्याचा निश्चित उपयोग होतो. समाजक्रांतीविषयी अनुकूल मनोभूमी तयार करावयाची असेल, तर प्रस्थापित समाजातील विसंगती, अंतविरोध आणि त्यामुळे निर्माण होणारी कोंडी यांच्या कलात्मक आविष्कारातून समाजावर संस्कार करता येतात. उपहास किंवा विनोद ही शस्त्रे साहित्यिक शस्त्रक्रियेत समाज-परिवर्तनासाठी वापरली गेली आहेत, हे जगातील सर्व साहित्याच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. मला वाटते, आता जे आपले सामाजिक प्रश्न आहेत, ते सर्व पुनर्रचनेचे प्रश्न आहेत. त्यांचे संशोधन करून प्रकट चर्चा व चिंतन करणारे समाजचिंतक आणि त्यांतील तत्त्वांचा व समाजक्रांतीचा ध्यास घेतलेले समर्थ ललित लेखक या दोघांचेही कार्य एकमेकांस पूरक आहे. या प्रयत्‍नांची गरज आहे. मला वाटते, ही अपेक्षा मराठी साहित्यिकांकडून करणे गैर होणार नाही.

या वैचारिक प्रबोधनाचे स्वरूप काय असावे, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. याबाबत मतैक्य अशक्य आहे. पण प्रकट चिंतन करणे शक्य आहे; नव्हे, आवश्यक आहे. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील वैचारिक जागृतीचे श्रेय बरेचसे पाश्चात्त्य विचारांना आहे. इंग्रजी हा त्याचा आधार होता. यापुढे प्रादेशिक लोकभाषा याच ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत. त्यांच्यांतच चिंतनशील साहित्य निर्माण झाले पाहिजे. ही आजची महत्त्वाची गरज आहे. दुसरे कारण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे. आतापर्यंत आपल्या बौद्धिक जीवनावर पश्चिमेचा ठसा उमटला आहे. एक तर आशिया, आफ्रिका यांतील साम्राज्यशाही बव्हंशी गेलेली आहे; आणि त्यांच्या सामाजिक प्रश्नांचा, सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे. आता हे कार्य भारतीय साहित्यिकांना करता येईल.

सर्वांना एका धाग्याने बांधणारी एक नवी जाणीव विज्ञानयुगाने निर्माण केली आहे. आजकाल याचा प्रत्यय अनेक स्वरूपांत येतो. हजारो मैल दूर चाललेल्या घटना तुमच्या-माझ्या दैनिक जीवनावर मूलग्राही स्वरूपाचे परिणाम करू शकतात, याची जाणीव आता वाढू लागली आहे. या अनुभूतीचे कलापूर्ण चित्रण श्री. सत्यजित रे यांच्या 'अशनि संकेत' (डिस्टंट थंडर) चित्रपटात परिणामकारक रीतीने चित्रित केले आहे. दुस-या महायुद्धाच्या काळात युरोपमध्ये व दूर पॅसिफिकमध्ये चाललेल्या युद्धाच्या कथा ऐकताना रम्य वाटल्या. परंतु हळूहळू त्याचा परिणाम ब्रह्मदेशापर्यंत पोहोचल्यानंतर, सकाळ-संध्याकाळ जेवताना मिळणारा तांदूळ कमी पडू लागल्यानंतर, लक्षावधींना मृत्यूच्या, भयानक दुष्काळाच्या खाईत जाण्याचा प्रसंग जेव्हा बंगालमध्ये १९४३ साली आला, त्यातून मानवतेची नियती एकाच धाग्यात गोवलेली आहे, याची जाणीव झाली. या जाणिवेचा एक स्पष्ट अर्थ असा, की सामाजिक, राजकीय व साहित्यिक मूल्यांची एकमेकांपासून फारकत करता येत नाही. आजही भारतांतर्गत समस्यांचा विचार करीत असताना हा संदर्भ तुम्हां-आम्हांला विसरता येणार नाही. राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यक्तींना स्वातंत्र्यावर आधारलेले अनेक अधिकार जसे प्राप्त झाले आहेत. तशाच काही जबाबदा-याही आहेत. हे स्वातंत्र्य आणि जबाबदा-या यांना एकमेकांपासून अलग करून चालणार नाही. या दोहोंचा पिळदार गोफ गुंफण्याचा निर्धारपूर्वक प्रयत्‍न आपल्या देशात झालेला नाही. हे घडले नाही, तर राष्ट्रीय स्वातंत्र्य कदाचित धोक्यात येण्याचा संभव आहे. हा एक विचार आपल्या चिंतनासाठी या निमित्ताने मी आपल्यापुढे मांडू इच्छितो. मुक्त विचाराचा सिद्धांत हा एक आकर्षक विचार आहे आणि मूलतः समर्थनीयही आहे. पण आजच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्रांत उभे असलेले इतर राष्ट्रीय प्रश्न यांचा संदर्भ विसरून हा सिद्धांत यशस्वी होऊ शकेल काय, याचेही चिंतन होण्याची गरज आहे.