शब्दाचे सामर्थ्य २३३

'कांचनगडच्या मोहने' सारखे मातृभूमीकरिता सर्वस्वाचा त्याग करण्याचा संदेश देणारे प्रभावी नाटक घ्या, जुलमी इंग्रजी सत्तेमुळे मातृभूमीची होणारी विटंबना रूपकात्मक रीतीने दाखविणारे 'कीचकवध' पाहा किंवा दुफळीचे दुष्परिणाम रंगविणारे 'भाऊबंदकी' हे नाटक घ्या, सर्व नाटकांची प्रेरणा उत्कट देशभक्तीची होती, हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. सत्ताधा-यांच्या दडपशाहीवरील प्रखर टीकेमुळे 'कीचकवधा'ला सरकारच्या रोषाला बळी पडावे लागले. गडकरी हे खाडिलकरांनंतरचे लोकप्रिय नाटककार. गडकरी म्हणजे मराठी रंगभूमीवरील सर्वांत तेजस्वी तारा. 'एकच प्याला'तील सुधाकराच्या पश्चात्तापाचा प्रवेश किंवा 'भावबंधना'तील सूडाने पेटलेल्या घनश्यामाचे पाय लतिकेला धरावे लागतात, तो प्रवेश, एकदा पाहिल्यावर विसरणे शक्यच नाही. गडक-यांच्या भडक पण भावपूर्ण नाटकाने लोक वेडावून गेले. मराठी रंगभूमीचा एक वैभवशाली कालखंड म्हणून याचा निर्देश करावा लागेल. गडक-यांची परंपरा माधवराव जोशी, शं. प. जोशी, टिपणीस, औंधकर, इत्यादी नाटककारांनी सामाजिक आणि ऐतिहासिक नाटके लिहून पुढे चालू ठेवली. माधवराव जोश्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले, तर आचार्य अत्रे यंनी गंभीर व प्रहसनवजा अशी दोन्ही प्रकारची नाटके लिहून एक प्रकारे मराठी रंगभूमीवर स्वतःचे वैशिष्ट्य प्रस्थापित केले. नाटक मंडळ्यांचा संस्थानी कारभार, चित्रपटांचे बहुरंगी आकर्षण, समाजाची आर्थिक स्थिती यांमुळे मराठी रंगभूमीला अवकळा आली, तेव्हा तिला हातभार लावून जगविणा-या साहित्यिकांत श्री. अत्रे यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. विडंबन आणि अतिशयोक्ती यांवर आधारलेल्या प्रसन्न विनोदाचे आवाहन हा त्यांच्या भात्यातील रामबाण! 'घराबाहेर' व 'उद्याचा संसार' ही सामाजिक समस्येला हात घालणारी त्यांची गंभीर नाटकेही खास उल्लेखनीय आहेत. 'सरलादेवी' कर्ते श्री. भोळे, कै. वर्तक आणि १९४० ते १९५० या दशकात मराठी रंगभूमीची एकनिष्ठेने सेवा करणारे श्री. मो. ग. रांगणेकर यांचा निर्देश इथे करावा लागेल. श्री. वर्तक यांची 'आंधळ्याची शाळा' आणि श्री. रांगणेकर यांचे 'कुलवधू' ही नाटके तर फारच लोकप्रिय झाली. या संदर्भात ज्योत्स्नाबाई भोळे या अभिनेत्रीचाही उल्लेख करणे अवश्य आहे. बदलत्या काळाबरोबर सामाजिक समस्याही बदलत जातात, याची तीव्र जाणीव वरील नाटककारांच्या नाटकांत आढळते. रंगभूमीच्या पडत्या काळात इब्सेनचे नवे नाट्यतंत्र मराठीत आणून श्री. भोळे, कै. वर्तक आणि श्री. रांगणेकर यांनी रंगभूमीची फार मोठी सेवा केली आहे.

मामासाहेब वरेरकर हे आणखी एक थोर सामाजिक नाटककार! हुंड्यापासून धर्मान्तरापर्यंतचे विषय आणि गिरणीतल्या मजुरापासून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडल्या गेलेल्या, पण टांग्याच्या भाड्याला महाग असलेल्या प्रामाणिक साहित्यिकापर्यंतची निरनिराळ्या थरांतील पात्रे त्यांनी कुशलतेने हाताळली. ताजे विषय, चुरचुरीत टीका आणि खुसखुशीत संवाद हे त्यांच्या लेखणीचे प्रमुख विशेष. मामासाहेब वरेरकर वृद्ध झाले, तरी 'प्रौढत्वी निज शैशवास जपणे' हा त्यांचा बाणा आहे. त्यांची कला चिरतरुण आहे, हे सिद्ध करण्यास 'भूमिकन्या सीता' या नाटकाचा उल्लेख पुरेसा होईल. अगदी अलीकडच्या काळात श्री. पु. ल. देशपांडे यांची 'तुझं आहे तुझपाशी' व 'सुंदर मी होणार', श्री. बाळ कोल्हटकर यांचे 'दुरिताचे तिमिर जावो', श्री. मराठे यांचे 'होनाजी बाळा', श्री. विद्याधर गोखले यांचे 'पंडितराज जगन्नाथ', श्री. पुरषोत्तम दारव्हेकर यांचे 'चंद्र नभीचा ढळला' इत्यादी नाटकांनी विलक्षण लोकप्रियता मिळविली. या प्रकारच्या नाट्यकृतींमुळे मराठी रंगभूमीवर एक नवीन पर्वकाळ येऊ पाहत आहे, त्याचे आपण स्वागत करू या. या ओझरत्या दर्शनावरून महाराष्ट्राचे जीवननाट्य त्यांच्या नाट्यजीवनात कसे प्रकट झाले, हे सहज स्पष्ट होईल.

स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, इत्यादी सामाजिक चळवळी, वेळोवेळी झालेली राजकीय आंदोलने, श्रमजीवी वर्गाची संघटना यांपासून मराठी रंगभूमी अलिप्त राहू शकली नाही. कितीतरी मराठी नाटककार व नाटक मंडळ्या या आंदोलनाच्या झपाट्यात सापडल्या, दडपल्या गेल्या, वरवंट्याखाली रगडल्या गेल्या. महाड येथे तर एक नाटक मंडळीच्या मंडळीच चतुर्भुज केली गेली होती.