शब्दाचे सामर्थ्य २३१

७५

अखिल भारतीय ४३ वे मराठी नाट्य संमेलन
(२५ मार्च, १९६१)

सन्माननयीय राष्ट्रपती,
उपस्थित पाहुणे आणि दिल्लीमध्ये जमलेल्या नाट्यरसिकांनो,

मराठी नाट्य परिषदेच्या या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी योजना करून आपण माझा जो गौरव केला, त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. वास्तविक हा अधिकार एखाद्या ख्यातनाम साहित्यिकाचा किंवा मान्यवर नाटककाराचा. निदानपक्षी ज्या गावी अशी संमेलने वा परिषदा भरविल्या जातात, तेथील एखाद्या मान्यवर कलावंताकडे हे मानाचे पान जावयास पाहिजे. परंतु या वर्षी महाराष्ट्राच्या बाहेर, पण भारताच्या राजधानीत हे अधिवेशन भरत आहे. एका नामवंत मराठी अभिनेत्रीच्या अध्यक्षतेखाली होणा-या या मराठी नाट्याच्या सोहळ्यास भारताचे राष्ट्रपती आशीर्वाद देण्यास उपस्थित आहेत. मराठी रसिक जीवनाला मिळणारे हे भारतीय आशिष नम्रपणे स्वीकारण्यासाठी मराठी जनतेचा प्रतिनिधी म्हणून स्वागताध्यक्षाच्या भूमिकेत आज मी येथे प्रवेश करीत आहे. दुस-याही एका नात्याने स्वागताचे हे कार्य पत्करले आहे. नाट्यक्षेत्रात नट व नाटककार यांचा सन्मान करण्याचा अधिकार रसिक प्रेक्षकांचा आहे. आज येथे महाराष्ट्राच्या अनेक शहरांतून व गावागावांतून पसरलेल्या असंख्य मराठी रसिक प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हां सर्वांचे, अध्यक्षांचे व राष्ट्रपतींचे मी मनःपूर्वक स्वागत करीत आहे.

राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे रसिक, गुणज्ञ व विद्वान महापुरुष या नाट्य संमेलनाचे उद्‍घाटन करण्यास लाभले आहेत, हे आपले व मराठी नाट्य परिषदेचे महद्‍भाग्य म्हटले पाहिजे.

हे नाट्य संमेलन भारताच्या राजधानीमध्ये भरत असल्यामुळे येथील समाजात सद्‍भावना व सदिच्छा निर्माण करण्याची संधी आपल्याकडे चालून आलेली आहे. तिचा आपण परिपूर्ण उपयोग करून घ्याल, असा मला विश्वास वाटतो. ह्या नाट्य परिषदेच्या निमित्ताने मराठी नाटके दिल्लीत सादर करण्यात येणार आहेत. त्यांचा रसास्वाद मराठी भाषक तर घेतीलच; पण अन्य भाषकांनाही त्यांचा लाभ घेता यावा, म्हणून प्रयोगाच्या आरंभी त्या त्या नाटकाची रूपरेखा इंग्रजीतूनही सांगण्याची व्यवस्था संमेलनाच्या आयोजकांनी केली आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.

ह्या नाट्य परिषदेच्या निमित्ताने 'राष्ट्राच्या उभारणीच्या कार्यात रंगभूमीचे स्थान' आणि 'नाट्य-शिक्षण' हे परिसंवाद व निबंधवाचन आणि चर्चा, इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम पाहिल्यानंतर व ऐकल्यानंतर राजधानीतील श्रोतृवर्गाला मराठी नाट्याची ओळख पटेल, त्याच्या प्रगतीची दिशा कळेल, त्याच्यापुढील समस्यांची जाणीव होईल आणि विचारमंथनाला साहाय्य होईल. ह्या विचारमंथनातूनच नाट्याचा विकास होणार आहे.

लोकरंजन आणि लोकाराधन या नात्याने नाट्याचे स्थान फार महत्त्वाचे आहे. 'नाट्यम् भिन्नरुचेः जनस्य बहुधा अपि एकं समाराधनम्' ही कालिदासाची उक्ती त्रिकालाबाधित आहे. त्यांतल्या त्यांत भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राजधानीत आपल्या नाट्यकलेचा गौरव व्हावा, तिने तेथील रसिकाचे मनोरंजन करावे, यातच आपल्या कलेचा सर्वोच्च सन्मान आहे, असे प्रत्येक राज्यातील साहित्यिकांना वाटणे स्वाभाविक आहे. सन १९५४ मध्ये दिल्ली येथे अखिल भारतीय नाट्य-महोत्सव झाला. त्या वेळी मराठी, बंगाली, मणिपुरी, पंजाबी, गुजराती, तामिळ, ओरिया आणि इंग्रजी नाटकांचे प्रयोग झाले. त्या वेळी पहिले पारितोषिक 'भाऊबंदकी' नाटकाने पटकाविले. मराठी रंगभूमीच्या थोर परंपरेचा असा गौरवपूर्वक बहुमान करून भारताच्या राजधानीतील श्रोतृवर्गाने आपल्या रसिकतेची साक्ष पटविली आहे. 'भाऊबंदकी' प्रमाणेच 'शारदा' नाटकानेही रसिक दिल्लीकरांच्या आनंदात भर टाकली. शिवाय, कविकुलगुरु कालिदासाच्या 'अभिज्ञानशाकुंतलम् ' ह्या जगन्मान्य संस्कृत नाटकाचाही प्रयोग दिल्लीतील ह्याच उत्सवात मुंबईच्या मराठी कलाकारांनी रसिकांपुढे सादर केला. गेल्याच वर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या शुभमुहूर्तावर आपण गडकरीदर्शनाच्या अभिनव प्रयोगाने एका थोर मराठी नाटककाराच्या काव्य-नाटकाचा परिचय दिल्लीच्या नागरिकांना करून दिला. उलट, 'कृष्णाकाठची कुंडले' स्वतःच दिल्लीच्या रंगभूमीवर आणून दिल्लीकरांनी आमच्यावर मात केली आहे, हे मी प्रांजळपणे कबूल करतो.