शब्दाचे सामर्थ्य २२६

जनतेच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी आणि भारतीय जनतेच्या महान महत्त्वाकांक्षा साकार करण्यासाठी संतांची वाणी, शिवाजीची ललकार, तसेच, आगरकर, चिपळूणकर आणि टिळक अशा विचारवंत देशभक्तांचे विचार मराठी भाषेला न मिळते, तर आज मराठी साहित्य इतक्या उन्नत स्थितीत आढळले असते का ? आपण फ्रेंच भाषेचेच उदाहरण घेऊ या. फ्रेंच भाषा पूर्वीपासूनच उत्कृष्ट होती, हे एक सत्य आहे. असे असले, तरी जर फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली नसती, तर फ्रेंच भाषेत लालित्य आले नसते आणि तेथील साहित्याचा, आज दिसतो, तसा विकास झाला नसता.

बुद्ध आणि महावीर ह्यांच्या वाणीने एक प्रकारे लोकभाषांना पंखच दिले, असे म्हणावयास हरकत नाही. संस्कृत भाषेचा विशाल तट ओलांडून प्राकृत आणि पाली ह्या भाषा जैन आणि बौद्ध भिक्षुकांच्या मदतीने सर्व देशभर पसरल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संतांच्या वाणीचा प्रवाह केवळ महाराष्ट्राच्या सीमेतच मर्यादित राहिला नाही. ह्याचा पुरावा पण आपणांस आढळतो, शीखांच्या गुरु ग्रंथसाहेबात नामदेवाचे पासष्ट अभंग आढळतात. अशाच प्रकारे नवे विचारप्रवाह भाषेच्या मदतीने देश, काळ आणि नैसर्गिक सीमेची बंधने पार करीत असतात.

कोणत्याही भाषेच्या माध्यमाने जे विचार प्रगट होत असतात, त्या विचारप्रवाहांवरच तिची प्रगती अवलंबून असते. कशीही परिस्थिती असो, जर त्या विचारप्रवाहात प्राण असेल आणि गती असेल, तर असले विचारप्रवाह जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. म्हणूनच लोकजीवनातूनच साहित्य निर्माण होते, असे मानण्यात येते. लोकजीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे साहित्यावर पडत असते व त्यावर पुन्हा साहित्याचा लोकजीवनावर परिणाम होतो. आवाजाच्या प्रतिध्वनीप्रमाणे ही क्रिया चालत असते. लोकजीवनाचा स्वर साहित्यात उमटतो आणि साहित्यात त्या स्वराचा असा प्रतिध्वनी निर्माण होतो, की जो पुन्हा लोकजीवनात जाऊन मिसळतो. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम वगैरे संतांच्या जीवनाचा व साहित्याचा प्रतिध्वनी आजही आमच्या लोकजीवनात उमटलेला आढळतो. ह्या संतांनी लिहिलेली गीते, अभंग आणि भजनांत लोकजीवनाचे प्रतिबिंब आढळते आणि ह्या साहित्याच्या योगे सर्वसामान्य लोकांना मनःशांती मिळते. मानवी जीवन वैयक्तिक असो वा सामाजिक असो, त्यांच्या कोणत्याही पैलूची, भाषेच्या मदतीने केलेली अभिव्यक्ती साहित्याचे स्वरूप घेते. खरे म्हणजे, असल्या साहित्यात, मानव आणि मानवोपयोगी प्रवृत्ती ह्यांची अभिव्यक्ती झाली पाहिजे. ज्या साहित्यामुळे अमंगलाचा नाश होतो आणि मंगलाची स्थापना होते, असे साहित्य उदात्त गुणांची प्रेरणा देऊ शकते. अशा प्रकारे साहित्य जनतेच्या उदात्त भावनांना प्रेरणा देऊन प्रगतीच्या दिशेने समाजाला गतिमान करते. साहित्याचा समाजजीवनासाठी आरशासारखा उपयोग होतो. कारण ह्या साहित्यात सर्वसाधारण लोकांच्या सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक प्रवृत्तींचे प्रतिबिंब सापडते. ह्यातच साहित्याच्या उत्पत्तीचे व जनतेच्या अभिव्यक्तीचे रहस्य दडलेले आहे. हे असे सत्य आहे की, ज्याला समस्त मानवेतिहासाचा पुरावा देता येईल.

भारतीय संस्कार आणि भाव यांचा अफाट सागर भारतीय जनजीवनात साहित्याच्या रूपाने उसळत आहे. मराठी साहित्य या विशाल सागराचा एक महत्त्वपूर्ण अंश आहे, हे आम्ही विसरता कामा नये. ह्या सागरातील लाटा निराळ्या तटांवर आदळून एका तटाचा विशेष संदेश दुसर्‍या तटाला नेऊन पोहोचवितात. ह्या लाटांचा उठणारा ध्वनी केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा प्रतिध्वनी सार्‍या देशात उठतो आणि हा प्रतिध्वनी भारतीय साहित्यसागरातही उठलेला आढळतो. आजच्या स्वतंत्र भारतात, भारतीय भाषा त्या लाटांप्रमाणे आहेत, ज्या भारताच्या एकतारूपी विशाल सागरात नेहमीच उठत असतात. प्रत्येक लाटेचे सौंदर्य आगळेच आहे आणि तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. पण या सर्व लाटांचा समावेश शेवटी त्या महासागरातच आहे. ह्या लाटा स्वैरसंचार करीत साहित्याला नवीन स्वर देत असतात व त्यातून भारतीय साहित्याचे मधुर संगीत निर्माण होते.

आजच्या युगात, आम्हांला अशा संगीताची आवश्यकता आहे, जे एकतेच्या तालावर आम्हांला निरनिराळ्या स्वरांत गाता येईल. भाषांच्या ह्या स्वरांत एक नवे चैतन्य असेल, एक नवे आवाहन असेल आणि एक नवा संदेश असेल. त्यातून आम्हांला नवी शक्ती, नवी प्रेरणा आणि नवी स्फूर्ती मिळेल. असे झाल्यास जीवनात नवे चैतन्य निर्माण होईल आणि भारतातील प्रत्येक भाषा सजीव राहील.