विकासासाठी भांडवल - गुंतवणुकीची गरज असते. त्यामध्ये देशी, तसेच, परदेशी चलनाचा समावेश असतो. निर्यातीतून किंवा परदेशी कर्जातून परदेशी चलन मिळते. निर्यातीतून अधिक परदेशी चलन मिळविणे हा या दोहोंतील उत्तम मार्ग. कारण आपल्या स्वत:च्या प्रयत्नातूनच ते साध्य होते; एवढेच नव्हे, तर ह्या मार्गाने वर्तमान आणि भविष्यकाल अशी दुहेरी तरतूद होते. शिवाय, परदेशी कर्जापेक्षा हा मार्ग अधिक खात्रीलायक असतो. ज्या प्रमाणात आपले निर्यात-उत्पन्न वाढते, त्या प्रमाणातच आपण अधिक व ख-याखु-या अर्थाने स्वावलंबी बनत असतो. आपली निर्यात वाढावी, यासाठी आपण सर्व काही करणे अगत्याचे आहे.
अलीकडील काही वर्षांत निर्यातवाढीत आपण थोडी-फार प्रगती करू शकलो असतो, तरी किमतीच्या बाबतींत इतरांबरोबर आपण स्पर्धा करू शकलो नाही, ही मुख्य अडचण होती. निर्यातीला पोषक ठरतील, अशी उत्तेजने देऊन आपला माल स्पर्धेत टिकविण्याचे आम्ही प्रयत्न केले. परंतु ह्यापेक्षा कडक शक्तिवर्धकांची गरज असल्याचे आपल्याला प्रत्ययाला आले. किमती कमी करण्याचे दोन मार्ग आहेत. देशांतर्गत किमती उतरविणे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारातील किंमत बदलणे.
अंतर्गत किमतीत घट केल्याने प्राप्तीचा, रोजगाराचा संकोच होतो. आमची ध्येये आणि आमच्या आकांक्षा यांच्याशी हे अगदी विसंगत आहे. कारण गेल्या अठरा वर्षांप्रमाणेच, उत्पादकांनी आणि कामगारांनी अधिककाधिक कमाई करावी, अशी आमची इच्छा आहे; आणि रोजगारात वाढ होत जावी, असे आम्हांला वाटते. हुकुमशाही राजवटीत किमती आणि पगार कमी केल्याने किती दैन्यावस्था पसरते, याचा विचार न करता बहुधा देशांतर्गत किमती उतरविण्यात येतात. परंतु आमचे राष्ट्र हुकुमशाही नाही. अवमूलनामुळे देशातील किमती आणि उत्पन्न आहे तसेच राहते, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील आपल्या मालाच्या किमती मात्र उतरतात.
याचसाठी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की, अवमूलन ही एक आर्थिक बाब आहे. प्रतिष्ठेच्या कल्पना उराशी बाळगून व्यर्थ वादविवाद करण्यात काहीच अर्थ नाही. विनिमयाच्या अधिकृत दराकडे दुर्लक्ष करून एका डॉलरला दहा-बारा रुपये मोजण्यात अधिक मानहानी आहे. आपण काय करणार आहोत, ह्या आश्वासनापेक्षा आपण प्रत्यक्ष कृती काय करतो, यावरूनच जग आपली किंमत करते.
अलीकडेच रशिया, युगोस्लाव्हिया आणि फ्रान्स या देशांनी अवमूलन करून आपली आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली. आपल्याप्रमाणेच त्यांची प्रगती खुंटली होती. तेव्हा त्यांनी प्रगतीच्या मार्गातील अडचणी बाजूला सारल्या.
आपला निर्यात व्यापार वाढावा, या दृष्टीने आपण टाकलेले हे विश्वासपूर्ण पाऊल आपल्याला परकीय मदत मिळवून देण्याच्या बाबतीतही अत्यंत उपयुक्त ठरेल. आजची आपली आत्यंतिक गरज शेतकी आणि औद्योगिक क्षेत्रांत उत्पादनवाढ ही आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला अधिक आयातीची गरज आहे; आणि हा आयात-व्यापार आपल्याला परकीय मदतीनेच साध्य करता येईल.