शब्दाचे सामर्थ्य १९६

बांधिलकी ही लादून घेण्याचा प्रश्न नाही, तर ती असण्याचा प्रश्न आहे, आतून येण्याचा प्रश्न आहे. बांधिलकी ही उत्स्फूर्त असावी लागते. उत्स्फूर्त वाङ्‌मयाच्या निर्मितीला जी प्रेरणा कारणीभूत होते, तीत बांधिलकीची बीजे असतातच. तेव्हा बांधिलकी ही 'कलम' करता येत नसते. प्रतिभेइतकीच ती उपजत असावी लागते. विशिष्ट राजकीय पक्ष, राजकीय विचार, धार्मिक निष्ठा यांच्या प्रेरणेतून होणारे लिखाण याला बांधिलकी म्हणता येणार नाही. संपूर्ण समाजजीवनाशी प्रामाणिक असण्याशी बांधिलकीचा पुष्कळ संबंध आहे. देशात धार्मिक, सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाची गरज आहे, या विचाराशी लेखकाची बांधिलकी आहे काय? हे महत्त्वाचे आहे. 'स्टेटस-को' स्थितीचे वर्णन शाब्दिक फुलो-याने करत राहणे म्हणजे चांगले साहित्य मानता येणार नाही. विचार बदलत असतात, स्थिती बदलत असते. जो थांबतो, तो विचार नव्हे व जी वाहत नाही, ती नदी नव्हे. तेव्हा बदलत्या समाजस्थितीचा, बदलत्या वास्तवाचा शोध लेखकाने घ्यायला हवा. बाकी बांधिलकी, की सामिलकी वगैरे हा शब्दच्छल झाला, तो मला महत्त्वाचा वाटत नाही.

उदाहरणार्थ, लेखकांनी मुंबईत दीर्घकाळ चाललेल्या गिरणी कामगारांच्या संपाला पाठिंबा द्यावा, की विरोध करावा, हा त्यांचा प्रश्न आहे. त्या अर्थाने त्यांनी बांधिलकी प्रकट करावी, असे मी म्हणत नाही. पण या संपामुळे कामगारांची परवड होत आहे, हाल होत आहेत, जीवनातील यातना-वेदना त्यातून प्रकट होत आहेत, केवळ पन्नास हजार कामगारच नव्हेत, तर त्यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून असणारे आणखी हजारो लोक आहेत, याची अभिव्यकी होणारे साहित्य कोणी लिहिलेले दिसत नाही. मराठी लेखक याबाबत अलिप्त असावा, असे दिसते.

अर्थात संप हे निमित्त झाले. अशा परिस्थितीतही जगण्याची जी प्रेरणा असते, ती शाश्वत असते. तेव्हा त्या प्रेरणेचा आविष्कार करणारे साहित्य तात्कालिक कसे ठरेल ?

मार्क्सवादाची बांधिलकी ही साहित्यिक बांधिलकी नव्हे, ती पक्षाची बांधिलकी आहे. माझ्या मनातला बांधिलकीचा अर्थ त्यापलीकडचा आहे, अधिक व्यापक आहे, अधिक मूलभूत आहे. नारायण सुर्वे हे मानवी दुःखाने व्यथित झालेले आहेत, त्यांच्या मनात त्वेष आहे.

मार्क्सवादी असूनही, प्रचारकी नसलेले साहित्य म्हणून मॅक्झिम गॉर्कीच्या 'मदर' या कादंबरीचे उदाहरण देता येईल. मार्क्सवादाच्या निष्ठेतून निर्माण झालेली ही एक उत्कृष्ट कांदबरी. तिच्यातून मार्क्सवादाचा अप्रत्यक्ष प्रचार होत असेलही. तरुणपणी मी ही कादंबरी वाचली. मला काही तसा त्यातून प्रचाराचा अनुभव आला नाही. साहित्यातले सारे गुण या कादंबरीत आहेत. टॉलस्टॉयच्या 'वॉर अँड पीस' या कादंबरीतून लेखकाच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे दर्शन घडते. रशियातील राजकीय जीवनाचे प्रामाणिक व वास्तव चित्रण त्यात असल्याने लेखकाची बांधिलकी स्पष्ट होते.

आपल्याकडे आणीबाणीच्या काळात काही लेखकांना वाटले, की लेखनस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य यांत व्यत्यय आलेला आहे. लेखनस्वातंत्र्याच्या कल्पनेशी बांधिलकी असलेले लेखक बंडाची भाषा करू लागले व सर्वांनी असेच करावे, अशी त्यांची अपेक्षा होती. व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य यांची बांधिलकी असण्यावर माझा विश्वास आहे. लेखनस्वातंत्र्याची कल्पना मला मान्य आहे. आणीबाणीच्या काळात सरकारावर टीका करणा-या साहित्य संमेलनाचा (कराड, अध्यक्ष, श्रीमती दुर्गा भागवत) मी स्वागताध्यक्ष होतो. लेखकांनी टीका केली नसती, तर मला आश्चर्यच वाटले असते! अर्थात त्या काळात अमुक चळवळ केली, तरच ती बांधिलकी होईल, असे जे सांगितले जात होते, ते देखील योग्य नव्हे. कारण तो मग फक्त प्रचार झाला.

मी स्वतः बांधिलकी मानणारा मनुष्य आहे. सामाजिक विषमता, वर्णाश्रमावर आधारित समाजपद्धती, जातीयवाद यांचे निमूर्लन करणे व समाजातील सर्व घटकांना प्रगतीच्या दिशेने वाव देणारी, संपूर्ण संधी असलेली समाजरचना निर्मिण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न करीत राहणे ही माझी वैयक्तिक जीवनातील बांधिलकी आहे. त्याकरिता राजकारण हे 'माध्यम' आहे, असे मी मानतो. मी राजकारणात पडलो, तो या वैयक्तिक संघर्षातून, सत्तेत मी जाईन, असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. मी सत्तेत गेलो व प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलो. या काळात मला माझ्या वैचारिक बांधिलकीची जाण, भान निखळ होते, असे मला प्रामाणिकपणे वाटते.