शब्दाचे सामर्थ्य १९४

६३

बांधिलकी कलम करता येत नाही

मला बांधिलकी हा शब्द तसा फारसा पसंत नाही. या शब्दाला बांधून घेणे मला रुचत नाही. इंग्रजीतील 'कमिटमेंट' ला 'बांधिलकी' हा शब्द वापरला जातो. राजकीय क्षेत्रात मी 'कमिटमेंट' ला 'वचनबद्धतेचं राजकारण' असा शब्दप्रयोग वापरतो. राजकारणात तुम्ही काही आश्वासने देता, किंवा देऊ इच्छिता. त्यांच्याशी तुम्ही प्रामाणिक आहात का? त्यांप्रमाणे वागता का? एकदा सत्तेत गेल्यावर ही कसोटी अधिक कसोशीने लावावी लागते. 'बांधिलकी' हा शब्द आशयाला रोखतो, 'रिस्ट्रिक्ट' करतो. वचनबद्धतेची कल्पना त्यात व्यक्त होत नाही. तुम्ही काहीतरी स्वीकारलेले आहे, ते तुमचे आहे, तुम्ही मानलेले आहे; पण 'बांधिलकी' शब्दात बांधून घेण्याची जी कल्पना आहे, ती आशयाला मर्यादित करते.

अर्थात शब्दांशी मला भांडण करायचे नाही, प्रश्न असा आहे की, साहित्यिकाने बांधिलकी मानावी काय? तर ती मानावी, असे मी म्हणेन. लेखकाला लिहिताना माणसांच्या प्रश्नांचे भान, जाण आहे, की नाही; समाजातील जे शोषित, दलित, उपेक्षित वर्ग आहेत, त्यांच्या भवितव्याबद्दल लेखकाला ओढ आहे का? त्यांच्यावरील अन्यायाची चीड आहे, की नाही, हे पाहिले पाहिजे. मी तरी साहित्य वाचताना ही कसोटी लावतो. आपल्या देशात विषमतेचे, दारिद्र्याचे प्रश्न आहेत, शतकानुशतक उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे. या परिस्थितीच्या निर्मूलनाची प्रतिज्ञा लिखाणामागे आहे, की नाही, ही मी मूलभूत कसोटी मानतो. ज्याला समाजाचे, सामान्य माणसाचे प्रेम आहे, अशा लेखकाच्या साहित्यातून समाज येणारच. खरा साहित्यिक समाजापासून दूर असू शकत नाही, असे मला वाटते.

'कलेसाठी कला', की 'जीवनासाठी कला' हाही वाद पूर्वी फार गाजलेला आहे. मराठी साहित्यात अजूनही त्याचे पडसाद अधून मधून उमटत असतात. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर माझा कल 'जीवनासाठी कला' या तत्त्वाकडे झुकलेला आहे. केवळ शब्दलालित्य आणि प्रतिमांचे सौंदर्य हीच चांगल्या साहित्याची कसोटी आहे, असा 'कलेसाठी कला' याचा अर्थ असला, तर ही स्वतःची फसवणूक करून घेणे होय. अर्थात शक्तिशाली, सुंदर शब्दांची निवड व वापर हे साहित्याचे महत्त्वाचे अंग आहे, याची मला जाणीव आहे. सुंदर प्रतिमांशिवाय असे शब्द वाया जातात. याचाही मला अनुभव आहे. तेव्हा शब्दलालित्य व प्रतिमांचे सौंदर्य यांची गरज असली, तरी हे शब्द व प्रतिमा यांच्या पाठीशी असलेल्या प्रेरणा या जीवनाच्या अनुभवांवर अधिष्ठित आहेत, की नाहीत, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी ज्या अर्थाने बांधिलकी म्हणतो, ती 'ही' आहे.

मराठी साहित्यात अधूनमधून मला अशी बांधिलकी दिसते. शंकरराव खरात यांचे वाङ्‌मय हे याचे एक ठळक उदाहरण. सर्वच दलित साहित्याबद्दल मी हे बोलत नाही. खरातांच्या पुस्तकांत ही बांधिलकी मला दिसते. भालचंद्र नेमाडे हे बांधिलकी मानतात, की नाही, हे मला ठाऊक नाही, परंतु त्यांच्या कादंब-यांतून मला ही बांधिलकी मोठ्या प्रमाणावर जाणवली. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंब-यांतूनही अशी बांधिलकी मला आढळली. काही वर्षांपूर्वी दिवंगत झालेले अप्रसिद्ध लेखक प्रभुदेसाई यांची 'नायक' ही छोटेखानी कादंबरी अलीकडेच मी वाचली. लेखक दलितेतर लेखक असूनही कोकणच्या पार्श्वभूमीवरील दलित जीवनाचे प्रभावी चित्रण फार थोड्या पृष्ठांत त्यांनी केले आहे. मी याला उत्कृष्ट वाङ्‌मय म्हणतो.