शब्दाचे सामर्थ्य १५९

उच्च शिक्षणातील गुणवत्तेचे स्थान अर्थातच मी जाणतो. कोणत्याही परिस्थितीत त्याला धक्का लावावा, असे माझ्या मनातसुद्धा येत नाही. शास्त्रीय विषयांच्या अभ्यासातील त्याचे महत्त्व विसरणे म्हणजे आत्मघातच होय, याची मला जाणीव आहे. शिक्षणप्रसाराच्या उत्साहाने त्याकडे दुर्लक्ष केले, तर सर्व डोलारा एके दिवशी कोसळल्याशिवाय राहणार नाही.

शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासंबंधीच्या माझ्या काही कल्पना आहेत. मला असे वाटते, आपल्या माध्यमिक शिक्षणाची फार मोठ्या प्रमाणात पुनर्घटना केला पाहिजे. माध्यमिक शाळेतच विविध प्रकारची तंत्रज्ञाने शिकण्याची संधी आपण विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे अगतिकतेने उच्च शिक्षण-संस्थांत केली जाणारी गर्दी टळेल. अनेक सामाजिक प्रश्न या शिक्षणाशी संबंधित आहेत, असे थोडा विचार केला, तर दिसून येते. उच्च शिक्षणाच्या सोयी काही थोड्या ठिकाणी - म्हणजे मोठाल्या शहरांतून केंद्रित झालेल्या असल्या, म्हणजे विद्यार्थी त्या ठिकाणी येतात आणि तेथे शिक्षण घेताना त्यांचा दृष्टिकोन, आवडीनिवडी आणि विचारसरणी यांत बदल होतो. हा मुलगा कॉलेजातून गावी जाण्याची भाषाच बोलत नाही. या स्थितीचा सामाजिक दृष्टीने विचार केला पाहिजे. अशा या 'शहरी' विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व इतके बदलते, की तो आईवडिलांना पारखा होतो. आपल्या खेड्याच्या परिसराशी त्याचा संबंध तुटतो. सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने हा एक मोठा तोटा आहे. उच्च शिक्षणाच्या सोयींचे विकेन्द्रीकरण करून व माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना करून या प्रश्नावर तोड काढता येईल. या समस्येचा शिक्षणतज्ज्ञांनी अधिक विचार केला पाहिजे.

महाराष्ट्राचा औद्योगिक व आर्थिक विकास हा खरोखर तज्ज्ञांनी चर्चा करून ठरवावयाचा विषय आहे. पण राज्यकारभार करताना महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशाचे जेव्हा मी निरीक्षण करीत असे, तेव्हा मला एक गोष्ट वरचेवर खटके. ऊस, कापूस यांसारख्या पिकांपासून पक्का माल उत्पन्न करण्याचे कारखाने येथे निर्माण झाले, आणखीही होतील. पण आपल्या राज्यात पायाभूत भारी उद्योगधंदे (Basic Industries) सुरू झाले पाहिजेत, असे मला वाटते. रसायने, पोलाद यांसारखे औद्योगिक व संरक्षणविषयक दृष्टीनेही महत्त्वाचे उद्योग येथे निघण्याची शक्यता मला दिसते. भिलईसारखा कारखाना खरोखर नागपूरजवळ का निघाला नाही? यापुढे अशा कारखान्यात अधिक हिस्सा आपल्या राज्याकरिता मिळाला पाहिजे.

औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आणखी एक विचार माझ्या मनात येतो. तो म्हणजे, शहरे व खेडे यांतील विषमता नष्ट करण्यासंबंधीचा. एकंदरीने औद्योगिकीकरणामुळे या देशात आपल्या समाजजीवनात शहरे व खेडी यांच्यामध्ये जी खोल दरी पसरलेली आहे, तिच्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण होतात. माझ्या मनात असा विचार येतो की, ग्रामीण जीवनाचे नागरीकरण (Urbanisation of rural life)  करण्याच्या दृष्टीने आपल्या आर्थिक विकासाचे धोरण आखलेले असावे.