शब्दाचे सामर्थ्य १५६

म्हणून लोक त्यांना आजही शिवले पाटील म्हणतात. असा हा क्रूर अमानुष वध झाला होता.. राजपत्‍नी येसूबाईसाहेब यांना छोट्या शाहूमहाराजांसह अटक करून दिल्लीला नेण्यात आले होते. महाराष्ट्रात राहणे अशक्य, म्हणून राजारामहाराज उठून जिंजीला गेले होते. राज्यकर्ता पुरुषच नाहीसा झाला, अशी विचित्र परिस्थिती त्या काळात महाराष्ट्रात निर्माण झाली होती. महाराष्ट्रातल्या या अति बिकट काळामध्ये भागाभागांतून अनेक व्यक्तींनी विलक्षण पराक्रमी नेतृत्व केले. कोणी धनाजी झाला, तर कोणी संताजी झाला. पण हे लोकांतून उठलेले नेतृत्व होते. ते जुळवून तयार केलेले नेतृत्व नव्हते. जनमनामध्ये जे सामर्थ्य निर्माण झाले होते, त्यातून ठिकठिकाणी अनेक सुभेदार, सरदार आणि सेनापती निर्माण झाले, आणि अशा या जनतेच्या नेत्यांनी सतत पंचवीस वर्षे परकीयांशी निकराने लढा दिला.

महाराष्ट्राच्या सगळ्या इतिहासामध्ये महाराष्ट्रावर एवढे जबरदस्त आक्रमण कधी झाले नव्हते. स्वतः दिल्लीचा पातशहा औरंगजेब आपल्या सर्व सैन्यनिशी पंचवीस वर्षे महाराष्ट्रात तळ देऊन बसला होता. पण याला धडाडीने तोंड देणारे कर्तृत्व निर्माण करण्याचे काम या छोट्याछोट्या नेत्यांनी केले, अणि या नेत्यांना निर्माण करण्याचे काम जनतेने केले. जनमनामध्ये अशी तयारी व्हावी लागते, परिस्थितीतून जनतेचे असे सामर्थ्य उभे राहावे लागते, तेव्हाच असा हा प्रचंड पराक्रम घडून येतो, जनतेतून असे नेते निर्माण होतात.

जनता आणि नेते यांचे असे हे माता आणि पुत्र यांचे नाते आहे. जनता हीच शेवटी माता. तिच्या आशीर्वादातून, तिच्या सर्वस्वातून, तिच्या भावनेतून, तिच्या परंपरेतून नेतृत्व उभे राहते. जनता व नेतृत्व यांचे हे नाते निर्माण होण्याचे काम इतिहासकाळात घडावे लागते. हे सर्व समजून घेणे हा इतिहास समजण्याचा एक उद्देश असला पाहिजे. हे काम महाराष्ट्रात कोणीतरी जिद्दीने करावयास पाहिजे होते. इतिहाससंशोधक हे काम करीत नाहीत, असे मला सुचवावयाचे नाही. पुण्यातली, नागपुरातली व इतर ठिकठिकाणची पुष्कळ मंडळी हे काम आपापल्यापरीने करीत आहेत. परंतु अगदी एकाकी परिस्थितीत, ज्या त-हेने बेन्द्रे यांनी हे काम आज अनेक वर्षे केलेले आहे, त्याचे नुसते कौतुकच नव्हे, तर त्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार महाराष्ट्राकडून व्हावयास पाहिजे.

या ग्रंथाच्या निर्मितीसंबंधी बेन्द्रे यांच्याबरोबर मी अनेक वेळा बोललो होतो, असे मी सुरुवातीस सांगितले. पण अधिकारावर असणारा मनुष्य जेव्हा बोलतो, तेव्हा त्याचा थोडासा तरी परिणाम घडून येतो, ही गोष्ट मला आज समजली! सरकारतर्फे मागण्याची माझी सवय असली, तरी मी त्यांच्याशी सरकार म्हणून बोललो नव्हतो. कारण इतिहास हा माझा वैयक्तिक आवडीचा विषय आहे. परंतु सहज बोललेल्या शब्दांतूनही मोठे काम घडू शकते, असा आज मला अनुभव आला. श्रम त्यांचे, माझे फक्त बोलणे होते. पण त्या बोलण्यातून हे काम घडले, यात मला अतिशय आनंद आहे. त्यांच्या गुणांचे व कर्तृत्वाचे चीज महाराष्ट्र शासन करील आणि अशाच त-हेची कामे महाराष्ट्रात चालू राहतील, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि श्री. बेन्द्रे यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांचा प्रत्येक क्षण या कामाकरिता मिळो, अशी मी प्रार्थना करतो.