थोडक्यात म्हणजे, येथल्या जनतेवर आधारलेले सरदार, सेनापती उभे केल्याशिवाय राज्य चालविणे अवघड आहे, असे वातावरण त्या वेळी निर्माण झाले होते; आणि याच वातावरणातून, आपल्या शक्तीने जर आपण त्यांची राज्ये चालवितो आहोत, वाचवतो आहोत, तर त्याच शक्तीच्या जोरावर आपण आपलेही राज्य उभे करू शकतो, स्वातंत्र्य उभे करू शकतो, असे विचार करणारे शिवाजी महाराज पुढच्या काळामध्ये तयार झाले. अशीही एक मीमांसा शक्य आहे, आणि म्हणून शहाजीमहाराज आणि मालोजीराजे यांच्या काळातला हा इतिहास माझ्या समजुतीने अतिशय महत्त्वाचा असा इतिहास आहे. या विचाराचा अभ्यास होण्याची अद्यापिही गरज आहे; आणि बेन्द्रे यांचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांनी या दृष्टीने या इतिहासाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
मी जेव्हा बेन्द्रे यांना आग्रह करीत होतो, तेव्हाही आता ते जसे थकलेले दिसत आहेत, तसेच मला ते थकलेले वाटत होते. मी त्यांना सांगत असे की, त्यांनी मिळविलेले सर्व ऐतिहासिक ज्ञान, त्यांनी केलेली असंख्य टाचणे आणि नोंदी हे सर्व ग्रंथरूपाने प्रकाशित न झाल्यास त्यांच्यानंतर व्यर्थ जाणार आहे. ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे ईश्वराने काही दिले आहे, ते त्यांनी सगळ्यांना सांगितले पाहिजे. आपल्याजवळ सांगण्यासारखे असेल, ते सांगून सगळ्यांना शहाणे करावे, असे आमच्या महाराष्ट्रातल्या संतांनी आम्हांला शिकविले आहे. वाद घालणारे वाद घालणारच, आणि असे वाद झाले नाहीत, तर महाराष्ट्रात जीवन ते काय राहणार ? तेव्हा असे वाद झाले पाहिजेत. परंतु बेन्द्रे यांच्यासारख्या विद्वानाने त्यांच्या पाठीमागे राहील, असे काहीतरी लिहावे, असा माझा फार आग्रह होता; आणि मला अतिशय आनंद वाटतो की, त्यांनी या वयातही हा ग्रंथ लिहिला. आपल्याला काहीतरी सांगावयाचे आहे, ते मनात इतके अधिरेपणाने बसले आहे की, अक्षरांद्वारे ते कागदावर उतरविल्याशिवाय मोकळेच वाटणार नाही, अशी जेव्हा स्थिती होते, तेव्हाच माणूस लिहू शकतो. आजही श्री. बेन्द्रे यांची अशी स्थिती आहे.
अजूनही सांगण्यासारखे त्यांच्याजवळ पुष्कळ आहे. त्यांनी जसा मालोजी आणि शहाजी लिहिला, संभाजी लिहिला; शिवाजीमहाराजानंतरच्या काळाचा इतिहास लिहिला आणि त्यांच्या अगोदरच्या काळाचा इतिहास लिहिला, त्याचप्रमाणे, मी त्यांना प्रार्थना करीन की, शिवकालीन खरा पराक्रमाचा महाराष्ट्रातला जो काळ आहे, त्यासंबंधीही त्यांनी आता लिहावे, आणि तेसुद्धा शिवाजीमहाराजांच्या वैयक्तिक जीवनावर नुसते नव्हे. तशा प्रकारचे आतापर्यंत पुष्कळ लिहिले गेले आहे. परंतु माझ्या मते त्या काळाचा इतिहास ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की, या थोर माणसाचे जे जीवन आहे, ते जनतेच्या कर्तृत्वाचे प्रतीक असे जीवन आहे. माझी ती स्वतःची श्रद्धा आहे. मराठ्यांच्या सगळ्या इतिहासाचा सर्वांत मोठा पैलू जर कोणता असेल, तर तो जरूर शिवाजीमहाराजांचा काळ आहे. त्या काळात शिवाजीमहाराजांनी जे देदीप्यमान कर्तृत्व केले, ते प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय आहे, त्याच्या स्फूर्तीचा तो जिवंत झरा आहे.
मराठ्यांच्या इतिहासात असाच दुसरा एक अति स्फूर्तिदायक काळ आहे. त्या काळासंबंधीही मला जबरदस्त आकर्षण आहे, आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की, त्या काळासंबंधीसुद्धा मी म्हणतो, तसे लिहिले गेले पाहिजे. तो काळ म्हणजे संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतरचा जवळजवळ पंचवीस वर्षांचा काळ होय. लौकिक अर्थाने ज्यांना नेते म्हणतात, राज्यकर्ते म्हणतात, ते कोणीही नसताना या पंचवीस वर्षांच्या काळात सतत चालू असलेल्या आक्रमणाला मराठी जनतेने अफाट धैर्याने तोंड देऊन आपले सामर्थ्य उभे केले. तुम्ही त्या काळामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. शिवाजीमहाराज गेलेले, लोकांचे मन हटून जावे, अशा त-हेने संभाजीमहाराजांचा वध झालेला, संभाजीमहाराजांचा विच्छेद करून माळावर टाकलेले त्यांचे प्रेत शिवावयाचे कोणी, इतकी धास्ती लोकांच्या मनामध्ये भरलेली. असा विलक्षण काळ होता तो! छिन्नविछिन्न झालेला तो देह शिवण्यात स्वतःवर मोठी आपत्ती ओढवून घेण्यासारखी परिस्थिती असतानाही ज्या गावातल्या लोकांनी प्रथम जाऊन ते प्रेत शिवले, त्या गावातील लोकांनी त्या काळी तो मोठाच पराक्रम केला. त्या गावातील पाटलांनी हे काम केले,