शब्दाचे सामर्थ्य १२७

४२

वसंतरावदादा पाटील

श्री. वसंतरावदादांच्या वयाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या वेळी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहत आहेत. या निमित्ताने दादांना द्यावयाच्या शुभेच्छा एका अर्थाने महाराष्ट्राला द्यावयाच्या शुभेच्छा ठरणार आहेत. हा आनंदाचा सोहळा दिवाळीला जोडून येत आहे, हा सुद्धा मंगल योगायोग नाही का? दादांना या महत्त्वाच्या क्षणी मी माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा देतो.

मी वसंतरावदादा यांच्यासंबंधाने लिहावयास बसलो, तेव्हापासून मी विचार करीत होतो, की त्यांची माझी पहिली गाठ कधी पडली ही मैत्री इतकी दाट व इतकी जुनी आहे, की मला पहिल्या भेटीचा प्रसंग स्पष्टपणे आठवत नाही. पण केव्हातरी १९३७ नंतर व ४० च्या दरम्यान तासगाव तालुक्यातील या मनस्वी तरुणाची ओळख झाली आणि ती पुढे पुढे हळूहळू वाढत गेली.

१९४२ च्या लढ्यात दादांनी आपला स्वतःचा एक संच बनविला व धडाडीची कामे आपल्या नेतृत्वाखाली सुरू केली. त्यामुळे त्यांचा लौकिक जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही पोहोचला. सांगली जेलमधून हत्यारे घेऊन किल्ल्याच्या भिंतीवरून केलेले उड्डाण हा दादांच्या कर्तृत्वाचा श्रीगणेशा होता. किंबहुना त्यांच्या सर्व जीवनाचे व पुढे घडलेल्या सर्व कर्तृत्वाचे ते एक प्रतीक होते, असे म्हटले, तरी चालेल. १९४२ च्या संग्रामानंतर १९४६ साली काँग्रेस पक्षाची सरकारे सर्व राज्यांत प्रस्थापित झाली आणि संघटनेला कार्यक्षम रूप देण्याचे काम सुरू करून, नव्या दिशेने कामाची बांधणी करण्याचे प्रयत्‍न सुरू केले, त्या वेळी त्या वेळच्या सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ज्यात हल्लीच्या सातारा व सांगली जिल्ह्यांचा समावेश होता) चिटणीस म्हणून श्री. आबासाहेब वीर व दादा या दोघांनी ही कामगिरी आपल्या हाती घेतली, या चिटणीस-द्वयामुळे सातारा जिल्हा काँग्रेसच्या कर्तृत्वाला त्या वेळी एक प्रकारचे उधाण आले होते. ते दिवस आज आठवले, म्हणजे मन मोहरून जाते. मी नुकताच पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मुंबई मंत्रिमंडळात दाखल झालो होतो. हा काळ दादांच्या व माझ्या स्नेहसंबंधांच्या बांधणीचा महत्त्वाचा काळ मी मानतो. आमचे काही समज-गैरसमज होते. परंतु विधायक कार्याच्या प्रवाहात ते धुऊन निघाले. विकास कार्याचे निखळ प्रेम व मित्रभाव या दोन गोष्टी असे संबंध जडण्या-वाढण्याला महत्त्वाचे ठरतात; आणि हे दोन गुण दादांमध्ये विपुल प्रमाणात आहेत. त्यामुळे आमचे संबंध वाढत गेले आणि एकमेकांकडे आम्ही आकर्षित होत गेलो.

सामान्य माणसाच्या उत्थानाला प्रथमतः साथ द्यायची, त्यासाठी जिवाची पाखड करून काम करायचे, हा दादांच्या स्वभावाचा स्थायिभाव आहे. ग्रामीण जीवनाला आधुनिक रूप प्राप्त झाले पाहिजे. त्यामध्ये समानतेच्या आधुनिक संस्कृतीची भर पडली पाहिजे, आणि जे आपल्याला मिळू शकले नाही, त्याची कमतरता नव्या पिढीला असता कामा नये, हे दादांच्या प्रेरणचे प्रमुख सूत्र आहे. दादांनी त्यांच्या कर्तेपणाच्या काळात अनेक विधायक कामांची साखळी गुंफली आहे. त्यासाठी अनंत कष्ट घेतले आहेत; असंख्य कार्यकर्त्यांचा संच आपल्या अवतीभोवती उभा केला आहे.