प्राणांपेक्षा ज्याच्यावर प्रेम केले, त्या काँग्रेस पक्षाचा मी वर उल्लेख केला आहे, त्यासंबंधी दोन शब्द. महाराष्ट्रातील काही शहाण्यासुरत्या व जाणत्या माणसांनाही आमची ही पक्षनिष्ठा कधी कधी समजत नाही. आमच्या पक्षनिष्ठेला ते 'सत्तेचे राजकारण' म्हणून नाके मुरडीत असतात. हीन समजतात. हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्यात सामील झालेल्यांपैकी आम्ही नव्हेत, हे त्यांच्या ध्यानी येत नाही.
सत्ता येण्याची अपेक्षाही नव्हती, त्या काळात ओळीने दहा-वीस वर्षे त्या पक्षात राहून अनंत कष्ट उपसलेल्या त्या पिढीचे आम्ही प्रतिनिधी आहोत, आणि आज सत्ता गेल्यानंतरही त्या पक्षातील दोष दूर करून पूर्ववत त्याला जनमानसात स्थान मिळावे, त्यासाठी प्रयत्नशील आहोत. ज्यांनी कशावरच कधी निष्ठा ठेवल्या नाहीत; स्वतःखेरीज इतरांसाठी ज्यांनी कधी कशाचा विचारच केला नाही, त्यांना या निष्ठांचा अर्थ समजणार कसा? अहंकाराच्या पोटी - मग तो बुद्धीचा, जन्माचा, किंवा आणखीन कशाचा असो, इतरांकडे तुच्छतेने पाहण्याची सवय झाल्यानंतर दुसरे घडणार काय? पक्षापेक्षाही देश मोठा असतो, हे आम्ही जाणतो. काही मूल्ये इतकी महत्त्वाची असतात, की त्यांसाठी प्रसंगी त्या पक्षालाही गौण मानावे लागते. पण हे उठल्या बसल्या, सकाळ-संध्याकाळी, मर्जीनुरूप, लहरीखातर करता येत नाही. त्यात वर्षानुवर्षाचे हजारो कार्यकर्त्या मित्रांचे स्नेहभाव गुंतलेले असतात. एकमेकांसाठी कष्ट घेतलेले असतात. राग, लोभ सांभाळलेले असतात. हे ज्यांनी अनुभवलेय, त्यांना ही पक्षनिष्ठा समजते. पण ज्यांनी निष्ठेने कधी कुठल्याच पक्षात वा कसलेच काम केलेले नसते किंवा जे दर पाच-दहा वर्षांनी एक नवा पक्ष शोधीत वा स्थापीत असतात, त्यांना ही गोष्ट कशी समजणार? त्यांच्या आवाक्याबाहेरचे हे काम आहे. श्री. वसंतदादासारख्यांना समजावून घ्यावयाचे असेल, तर हेही प्रथम ध्यानात घ्यावे लागेल.
श्री. वसंतरावदादा पाटील हा शहाणा कर्ता पुरुष आज महाराष्ट्राच्या जनतेचे नेतृत्व करीत आहे. महाराष्ट्राचे भविष्य त्यांच्या हाती सुरक्षित आहे. त्यांच्या नेतृत्वाला साथ देऊन, त्यांचा पाठपुरावा करण्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेची सार्थ परीक्षा होणार आहे. माझा असा विश्वास आहे, की आजपर्यंत ज्या सहजतेने आणि कुशलतेने अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये दादांनी यशस्वीपणे मार्ग काढला, तसे, आजच्या बिकट काळात महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र काँग्रेसला ते यशस्वी नेतृत्व देतील. महाराष्ट्रातील जनताही तितक्याच निर्मळ मनाने त्यांना साथ देईल, त्यासंबंधी माझ्या मनात शंका नाही.