शब्दाचे सामर्थ्य १२४

४१

किसन वीर

१९३०-३२ च्या चळवळीच्या वेळी 'किसन वीर' हे नाव मी प्रथम ऐकले. कराड शहर व आसपासच्या खेड्यांत स्वातंत्र्य-चळवळीत काम करणारा मी एक कार्यकर्ता होतो. या वेळी वाई भागात काम करणार्‍या या प्रमुख कार्यकर्त्याचे नाव मी साहजिकच ऐकत होतो. माझी त्यांची प्रत्यक्ष अशी भेट ३४-३५ च्या सुमारास झाली. उंच व बांधीव शरीर, मिशांचे आकडे आणि हसरा चेहरा ही त्यांची तीन वैशिष्ट्ये प्रथम मी जेव्हा पाहिली, तेव्हाच माझ्या मनात खिळून राहिली. हळूहळू आमच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊ लागले व १९४० ते ४२ च्या तीन वर्षांच्या काळात या ओळखीचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले.

सातारा जिल्ह्याच्या स्वातंत्र्य-चळवळीत १९३० पासून किंबहुना त्याही पूर्वीपासून, ते आजपर्यंतच्या पस्तीस-चाळीस वर्षांच्या काळात आबांनी फार मोठी कामगिरी केली आहे. आपल्या वैयक्तिक संसाराची हानी तर त्यांनी सहन केलीच, तसेच, त्यांचा चांगला चाललेला व्यापार-धंदा डबघाईस आला. खेळलेले, कसलेले शरीर दुबळे झाले. कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष देण्यास सवड सापडली नाही. एक ना अनेक गोष्टी. पण जनमनाची शक्ती मिळविण्याचे काम मात्र त्यांनी चांगले साधले, कवठ्याच्या आबांच्या त्या छोटेखानी घरात कधी कधी मी त्यांना न कळविताच गेलो आहे व जेव्हा जेव्हा मी गेलो, तेव्हा तेव्हा पाच-पंचवीस कार्यकर्त्यांच्या घोळक्यात आबा सापडले नाहीत, असे कधीच झाले नाही. या त्यांच्या लोकसंग्राहक वृत्तीमुळे स्वाभाविकच उभ्या सातारा जिल्ह्यात आणि आजतर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना असंख्य मित्र आहेत.

किसन वीरांचे व्यक्तिमत्त्व ख-या कसोटीस उतरले, ते १९४२ साली. ९ ऑगस्ट, १९४२ रोजी क्रांतीचा श्रीगणेशा भारतभर झाला. मी मुंबईहून जो परतलो, तो भूमिगत कार्यकर्ता म्हणून, आणि त्यानंतरच्या आठवड्यात मी कवठे, वाई भागात गेलो. आबांची - माझी पुष्कळ चर्चा झाली. ही चळवळ नव्या त-हेने कशी आखावी, त्यासंबंधी काही योजना झाल्या व भूमिगत राहण्याचा ठाम निर्णय घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मला आठवते, मी त्या भूमिगत अवस्थेत असतानाही आबांनी कवठ्यास जाहीर सभेत माझे भाषण करवलेच. निघण्यापूर्वी आबांनी मला सांगितले, की काही काळजी करू नका, मी सहजासहजी पोलिसांच्या हाती सापडत नाही. मीही पुढचे मोठे काम करण्याची आशा मनात ठेवून कवठ्याहून निघून गेलो.

त्यानंतर थोड्याच दिवसांत वार्ता ऐकली, की किसन वीरांना पोलिसांनी पकडले. माझी निराशा झाली व माझी खात्री आहे, की आबांचीही निराशा झाली असेल. आबा जेलमधून निरोप पाठवीत असत. 'भूमिगत कार्य करण्याची इच्छा अतृप्त राहिली आहे. संधीची वाट पाहत आहे.' स्वाभाविकच माझा प्रथम प्रथम या निरोपांवर विश्वास बसत नसे. नंतर काही महिन्यांनंतर मला वाळवे तालुक्यातील एका गावी असताना निरोप मिळाला, की आबा त्यांच्या इतर साथीदारांबरोबर येरवडा जेल फोडून बाहेर पडले आहेत. या रोमांचकारी घटनेची वार्ता ऐकून माझ्या मनाला नवा हुरूप आला.