जतींद्रनाथ दासांच्या मृत्यूने मी किती हादरून गेलो होतो. माझ्या आईने प्रत्यक्ष पाहिले होते. ज्या दिवशी जतींद्रनाथ वारले, तो सबंध दिवस मी जेवलो नाही. रात्री झोपलो नाही. हे तिने पाहिले होते. माझ्या मनाचा अंदाज तिला लागला नाही. तिला वाटे, आपल्या मुलाला काहीतरी लागीर झाले आहे. म्हणून ती चार मंडळींत त्याच्या उपाययोजनेची चौकशी करू लागली.
मी आईला सांगितले,
‘मला काही झालेले नाही, तू काही काळजी करू नकोस.’
पुढे तिला माझे म्हणणे पटले. तिने माझी चिंता करायचे सोडून दिले. ती म्हणे,‘बाबा तू वाचतोस, हिंडतोस, फिरतोस, हे सगळे चांगले आहे, पण कधी वाइटाच्या नादाला लागू नकोस. आपण गरीब असलो, तरी आपल्या घराची श्रीमंती आपल्या वागण्या-बोलण्यांत आहे. रीतिरिवाजांत आहे, ती कायम ठेव.
‘तुला कुणाची नोकरी-चाकरी करायची नसली, तरी माझी हरकत नाही. मी कष्ट करून तुझे शिक्षण पुरे करीन; पण ह्या शिक्षणामधे हयगय होईल, असे करू नकोस. तुम्ही शिकलात, तुमचे दैव मोठे होईल.’
आईने एका अर्थाने आम्हांला तिच्या विचाराने जीवनाचे एक तत्त्वज्ञानच दिले होते. प्रपंच तीच चालवीत होती. त्यामुळे त्यातल्या अडचणी तिला माहीत होत्या.
माझी आई सुसंस्कृत होती, हे तिच्या वागण्या-बोलण्यावरून दिसतच असे. आमच्या गरिबीच्या घरात का होईना, कोणी आले-गेले, तर आपल्या शक्तीप्रमाणे त्यांचा योग्य तो पाहुणचार करण्यास ती कधीच चुकली नाही. कधी कधी नात्याची आणि देवराष्ट्राची आठ-आठ, दहा-दहा मंडळी आमच्या घरी पाहुणे म्हणून येत असत. त्या सर्वांचे तिने केले. ती म्हणत असे, ‘आपण अर्धपोटी राहावे; पण आलेल्या-गेलेल्यांना पोटभर जेवू घालावे.’
देवधर्मावर तिची श्रध्दा होती. रामायणाच्या कथेबद्दल तिला फार आदरभाव असे. कराडच्या एका मंदिरात रामायणाची कथा चाले. तिथे जाऊन ती महिनोगणती ऐकत असे. अधून-मधून ती मलाही घेऊन जात असे. तिच्याबरोबर जाऊन ऐकत असल्याने रामकथेत मलाही रस निर्माण झाला. आईला रामायणाची सगळी प्रसंगांसहित माहिती असे. मी तिला उलटे-सुलटे प्रश्न विचारीत असे. ती म्हणे, ‘तू शिकला आहेस. ते वाचून पाहा. मी जे ऐकले आहे, ते भक्ति-भावनेने खरे मानते.’
आई माझ्याकडून अधून-मधून साखरेबुवांची सार्थ ज्ञानेश्वरी वाचून घेत असे. ज्ञानेश्वरी समजायला जरा अवघडच. जुनी भाषा असल्यामुळे त्यातला अर्थ मलाही जसा समजायला पाहिजे होता, तसा समजत नव्हता; पण मी वाचीत असे, ते ती भक्तिपूर्वक ऐकत असे.
एका आठवड्यात मी तिला दोन अध्याय वाचून दाखविले. मी तिला विचारले,‘आई, तू हे सगळे ऐकून घेतलेस. त्याचा सारांश तुझ्या मनाशी काय आला ?’