शब्दाचे सामर्थ्य १०९

याच संदर्भात एक मजेदार गोष्ट मला आठवते. ती म्हणजे, जेव्हा त्यांच्या कारखान्याची तयारी पूर्ण होऊन त्यांचे मॅनेजमेंट बोर्ड तयार करण्याच्या स्तरापर्यंत काम आले, तेव्हा एका रात्री मला निरोप आला, की श्री. तात्यासाहेब कोरे व रत्‍नाप्पाअण्णा कुंभार मला भेटू इच्छितात. रात्र बरीच झाली होती. त्यामुळे मला काहीसे आश्यर्च वाटले. तरीपण मी त्यांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी मला खरोखरच आश्चर्यचकित करणारी गोष्ट सुचविली. ते म्हणाले, या दोन्ही कारखान्यांच्या चेअरमनशिपसाठी मी मान्यता द्यावी. अर्थात त्या वेळी मी पुरवठा मंत्री म्हणून काम करीत होतो व सहकारी चळवळीच्या भविष्यासंबंधी काळजी वाहणारा होतो. त्यामुळे मी त्यांच्याशी याबाबत बारकाईने चर्चा केली. या कारखान्यांना मंत्री या नात्याने माझ्याकडून मी इतर सहकार्य देईन, परंतु कारखान्याच्या दैनंदिन कामात कोण्या मंत्र्याने सामील व्हावे, हे मला मंजूर नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यांची समजूत काढताना मला फार श्रम घ्यावे लागले. परंतु शेवटी त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. आज तीस वर्षांनंतर या गोष्टीची आठवण येते, जेव्हा ही चळवळ सुरू झाली, तेव्हा तिच्या पाठीमागचा उद्देश हा सत्ता-संपादनाचा नव्हता, तर सेवेचा होता, हे लक्षात येते. हा जुन्या काळचा अनुभव पाहिला, म्हणजे आता काळ किती बदलला आहे, हे लक्षात येते.

श्री.रत्‍नाप्पाअण्णांनी आपला कारखाना गेली अनेक वर्षे आपल्या मार्गदर्शनाखाली ठेवला आहे, ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. आजही ते अनेक विधायक कार्ये करीत आहेत. राजकारणात ते एक महत्त्वाचे नेते म्हणूनही अजून मानले जातात. ते आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (आय्) चे उपाध्यक्ष आहेत. ते विधान सभेचे सदस्य राहिले आहेत, संसद सदस्य राहिले आहेत. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. पुष्कळदा ते जिंकले आहेत, कधी हारले आहेत. पण पराजयामुळे ते कधी नाउमेद झाले नाहीत. तसेच, आपला विधायक कार्याचा ध्येयवादी मार्ग सोडला नाही. संपूर्ण जीवन त्यागाने व काही निश्चित कामासाठी वाहून घेणा-या महाराष्ट्रातील जुन्या कार्यकर्त्यांत श्री. रत्‍नाप्पाअण्णा हे महत्त्वाचे गृहस्थ आहेत.

श्री. रत्‍नाप्पाअण्णा यांचा व माझा फार जुना स्नेह आहे. अधून-मधून मतभेद होतात, परंतु त्याचा वैयक्तिक स्नेहावर परिणाम झाला नाही. हा रत्‍नाप्पांचा मोठेपणा आहे. ७५ व्या वर्षात प्रवेश करणे ही आयुष्यातील अमृतयोगाची गोष्ट आहे आणि तरी रत्‍नाप्पा आजही क्रियाशील आहेत, हे महत्त्वाचे आहे. त्यांचे कार्य सुफलित होवो, हीच एका त्यांच्या मित्राची प्रार्थना इथे नोंद करू इच्छितो.