शब्दाचे सामर्थ्य १०७

३०

तुळशीदास जाधव

श्री. तुळशीदासजी जाधव हे, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य-सैनिकांत अग्रगण्य मानले जावे, या तोलाचे कार्यकर्ते आहेत. १९३० साली सोलापूर येथे मार्शल लॉ पुकारला होता, त्या वेळी गांधीटोपी घालून रस्त्यावर येणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. हे धैर्य तुळशीदासांनी सोलापुरात दाखविले आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या बलिष्ठपणाचे आव्हान स्वीकारले. हे मी त्या वेळी माझ्या शाळकरी जीवनात वर्तमानपत्रात वाचले होते. तेव्हापासून या माणसाच्या धैर्य व देशभक्तीबाबत आदर व कुतूहल निर्माण झाले.

पुढे त्यांची माझी भेट १९३३ साली जेव्हा आम्हांला येरवडा कँप जेलमधून विसापूरला नेण्यात आले, तेव्हा तिथे झाली. जेलमध्ये राजकीय बंद्यांच्या काही रास्त मागण्या जेलचे अधिकारी मान्य करीत नव्हते. अशा काही प्रसंगांवरून तुळशीदासांनी अन्नसत्याग्रह सुरू केला होता. त्या वेळी एक सामान्य कार्यकर्ता राजबंदी म्हणून मी त्यांना त्यांच्या बरॅकमध्ये जाऊन भेटलो. ही माझी त्यांची पहिली भेट. उपोषणाने थकलेले, पण मनाने निर्धारी अशी त्यांची वृत्ती पाहून मी सादर परत आलो.

त्यानंतरच्या राजकीय जीवनात त्यांचे-माझे अनेक कारणांनी जवळ येण्याचे प्रसंग आले. कधी कधी मतभेदही झाले. टीका झाल्या. अर्थात मी कधीच प्रतिटीका करीत नाही, म्हणून त्या वेळीही केली नाही. त्यांचा माझा जाहीर वाद सुरू झाला. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेच्या वेळी श्री. तुळशीदासजी शेतकरी पक्षाच्या स्थापनेतील एक अग्रगण्य पुढारी होते आणि त्यांनी त्या वेळी आपल्या पक्षाचा प्रचार धूमधडाक्याने सुरू केला. तुळशीदासजी तसे जबरदस्त प्रचारक आहेत. लोकांना समजणा-या भाषेत तासन् तास ते बोलू शकतात. महाराष्ट्रात त्या वेळी सर्वश्री काकासाहेब वाघ, तात्यासाहेब जेधे, नाना पाटील, तुळशीदासजी, शंकरराव मोरे या मंडळींनी एक तुफान उभे केले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रकारचा धसका बसेल, असे वातावरण त्यांनी निर्माण केले होते. त्या वेळी मी आमच्या सहका-यांसह - विशेषतः, श्री.नाना कुंटे यांच्यासह महाराष्ट्राचा लांबलचक दौरा केला व शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचाराला आवर घालण्याचा प्रयत्‍न केला. तुळशीदासजींचे शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वामध्ये मतभेद झाल्यानंतर १९५५ साली त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळेपासून पुन्हा त्यांचे - माझे सहकार्य पुनश्च सुरू झाले. ते अलीकडे काँग्रेस दुभंगण्याच्या वेळेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात चालू आहे.

त्यांचे - माझे मतभेदांचे प्रसंग जरी आले असले, तरी त्यांचे स्वार्थत्यागी जीवन, रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी, लोकशिक्षण करण्याची हातोटी यांमुळे हा मनुष्य एका अर्थाने असामान्य वाटतो. पराभव हा शब्द त्यांना माहीत नाही. प्रवासाने ते कधी थकणार नाहीत. विचार मांडण्याचा कधी कंटाळा आला नाही. सर्वांना भेटून आपले विचार सांगण्याची टाळाटाळ नाही. त्यांच्या स्वभावातील हे महत्त्वाचे गुण आहेत.

श्री. तुळशीदासजी आपल्या राजकीय जीवनात मोठ्या अधिकार-पदावर पोहोचले नव्हते. तरी स्वातंत्र्य-चळवळीतील व त्यानंतरचे त्यांचे कार्य महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. आता उतारवयात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाना उभारून जे नवीन काम हाती घेतले व त्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले, ते पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल आदर व अभिमान वाटतो. साखर कारखान्याचे काम पूर्ण होऊन तो सुरू झाल्यामुळे त्यांच्या विधायक कार्याला यश मिळाले आहे व त्यामुळे त्यांच्या मनाला एक आनंद लाभला आहे.

मध्यंतरी दिल्लीत ते भेटले, तेव्हा कारखान्याच्या प्रगतीचा इतिहास सांगत होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतील विजयाचे तेज पाहून माझ्याही मनाला हुरूप आला.

आज त्यांचा गौरव करण्यासाठी ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. अशा वेळी माझ्या त्यांच्यासंबंधीच्या सद्‍भावना पाठवीत आहे व त्या पाठविताना आनंद वाटत आहे.

श्री. तुळशीदासजी शतायुषी होवोत !!