श्री. वसंतरावजी जसे एक राजकारणी पुरुष आहेत, तसेच, ते आपल्या वैयक्तिक जीवनात एक प्रेमळ पिता, सहृदय मित्र व चोखंदळ रसिक आहेत. वसंतरावजींच्या आजच्या लोकप्रियतेत व यशात त्यांच्या सुविद्य, प्रेमळ व कर्तबगार पत्नी सौ. वत्सलाबाई यांचा मोठा वाटा आहे.
राज्यकर्ता या नात्याने त्यांनी विविध प्रसंगी, विविध परिस्थितींत व विविध थरांतील जनतेसमोर वेळोवेळी आपल्या भाषणात व लेखनात जे विचार प्रकट केले, त्या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे महाराष्ट्रीय माणूस हाच आहे. त्याच्यातील आत्मविश्वास, कर्तृत्व, स्वाभिमान, जिद्द जागृत करून, त्याला कार्यप्रवृत्त करावयाचे व तसे करताना सर्व थरांतील जनतेमध्ये स्नेहभाव व बंधुभाव कसा जागा होईल, हे पाहावयाचे, सामाजिक सत्तेच्या प्रस्थापनेला त्याला प्रवृत्त करावयाचे, हे उद्दिष्ट वसंतरावांनी आपल्यासमोर सदैव ठेवलेले होते. त्यांचे विचार अगदी स्पष्ट आहेत व ते तितक्याच रोखठोकपणे, परंतु कोणाला न दुखविता व्यक्त करतात. आडवळणाने बोलणे त्यांना जमतच नाही. कारण त्यांच्या स्वभावातील सरळपणा, कोणालाही हेवा वाटावा, अशी ॠजुता ! महाराष्ट्रातील जनता सुविचारी, सुसंस्कृत, संपन्न कशी होईल आणि महाराष्ट्र अवघ्या देशालाच कसा मार्गदर्शक होऊन राहील, याचाच निदिध्यास वसंतरावांनी सदैव बाळगला आहे. जनतेच्या भौतिक कल्याणाच्या विविध बाजूंचे त्यांनी सदैव चिंतन आणि मनन केले आहे. महाराष्ट्र संपन्न आणि सुखी करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आराखडाच जणू त्यांच्या मनश्चक्षूंसमोर सदैव तरळत आहे, असे दिसते.
१९७१ ते १९७३ या तीन वर्षांतील निरनिराळ्या प्रसंगी श्री. वसंतराव नाईक यांनी केलेली भाषणे आणि लेख संगृहीत केलेले 'समृद्धीच्या वाटा' हे पुस्तक माझ्या वाचनात आले. महाराष्ट्र राज्याचे सूत्रधार या नात्याने वसंतरावांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा किती बारकाईने आणि आत्मीयतेने विचार केला आहे, हे या भाषणांवरून दिसून येते. ही भाषणे विविध प्रसंगी केलेली असल्यामुळे त्या त्या काळच्या विशिष्ट परिस्थितीचा संदर्भ अर्थातच त्यांना लाभला असला, तरी त्यांतून व्यक्त झालेले विचार केवळ प्रासंगिक महत्त्वाचे नसून, वसंतरावांच्या प्रगल्भ मनाचा आणि चिंतनशीलतेचा परीसस्पर्श लाभलेले ते सुवर्णकण आहेत.
'समृद्धीच्या वाटा' वसंतरावांनी आपल्यापरी दाखविल्या आहेत. आता त्यांचा मागोवा घेऊन, त्यांत अधिक भर घालण्याचे काम जनतेचे आहे आणि या जनतेवर वसंतरावांप्रमाणेच माझाही संपूर्ण विश्वास आहे.