शब्दाचे सामर्थ्य १०१

२६

दादासाहेब कन्नमवार

दादासाहेब कन्नमवारजींनी आपल्या या महाराष्ट्रातील जनतेची जी अहोरात्र निष्ठेने सेवा केली, तिच्याबद्दल माझ्याच काय, पण सर्वांच्या मनांत अशी कृतज्ञतेची भावना आहे. या लहानशा लेखाच्या रूपाने आपली ही भावना आपण अल्पशा प्रमाणात व्यक्त करीत आहोत, असे मी म्हणेन.

कन्नमवारजीचे नाव जरी मी अनेक वर्षांपासून ऐकत होतो, तरी त्यांचा व माझा प्रत्यक्ष असा संबंध तसा अलीकडील काही वर्षांतच आला. तथापि, या संबंधाचे गाढ स्नेहात रूपांतर होण्यास वेळ लागला नाही आणि त्याचे श्रेय मी कन्नवारजींच्या ॠजू व मनमिळाऊ स्वभावास देतो. महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी व मी सहकारी म्हणून काम केले. त्यांच्याबरोबर काम करण्याची मला ही जी संधी मिळाली, ते मी खरोखरीच माझे भाग्य समजतो. कारण सर्वार्थाने एक लोकनेता कसा वागतो, कसे काम करतो, हे पाहण्याचा योग त्यामुळे मला आला. अतिशय शांतपणे, अबोलपणे आणि कामाची थोडीसुद्धा जाहिरात न करता काम करण्याची कन्नमवारजींनी जी विलक्षण हातोटी साधली होती, ती खरोखर अनुकरणीय अशीच होती. गांधीजींवर त्यांची असीम निष्ठा होती आणि गाजावाजा न करता सेवाभावाने काम करीत राहण्याची ही वृत्ती गांधीजींच्या उदाहरणानेच त्यांनी आपल्या अंगी बाणवली होती.

कन्नमवारजींच्या ठिकाणी जे अनेक गुण होते, त्यांत त्यांची लोकसंग्राहक वृत्ती हा विशेष ठळक असा गुण होता, असे मी म्हणेन. मुंगी जशी साखरेचा एक एक कण गोळा करते, तसे कन्नमवारजी अत्यंत गुणी व सेवाभावी माणसे गोळा करीत आणि अशा माणसांची एक मालिकाच त्यांनी जमविली होती. विदर्भामध्ये त्यांच्याबरोबर गेलो असताना हा अनुभव मला प्रकर्षाने आला. कार्यकर्त्या मंडळींचा गराडा त्यांच्याभोवती नेहमी पडलेला असायचा. तसेच, ते लोकांत अगदी मनमोकळेपणाने मिसळत असत आणि लोकही त्यांच्यापाशी आपली सुखदुःखे हलकी करीत. कारण लोकांच्या कल्याणाविषयी त्यांच्या अंतःकरणात अपार कळकळ होती. त्यांचे अश्रू पुसण्यात त्यांचा हात नेहमीच पुढे असे.

महाराष्ट्र राज्य झाले आणि मार्गालाही लागले. या महाराष्ट्र राज्याच्या उभारणीत ज्यांनी फार महत्त्वाचा वाटा उचलला, त्यांच्यामध्ये मी कन्नमवारजींचा प्रामुख्याने समावेश करतो. महाराष्ट्र याबद्दल त्यांचा सदैव ॠणीच राहील. अगदी गरिबीच्या व हलाखीच्या परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. त्यांनी निष्ठा व सेवावृत्ती यांच्या जोरावर राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली, हे आमच्या तरुणांना खात्रीनेच उद्‍बोधक व मार्गदर्शक वाटेल, असा मला भरवसा वाटतो.