शैलीकार यशवंतराव ६७

कलाकारांनी सुद्धा आपल्या कलेशी व जीवनाशी संबंधित काही आठवणी व अनुभव शब्दबद्ध केले आहेत.  गोविंदराव टेंबे यांचे 'माझा संगीत व्यवसाय', गणपतराव बोडस यांचे 'माझी भूमिका', शांताराम देसाई यांचे 'मखमली पडदा', मामासाहेब वरेरकर यांचे 'माझा नाटकी संसार', चिंतामणराव कोल्हटकर यांचे 'बहुरूपी', नानासाहेब फाटक यांचे 'मुखवट्यांचे जग' अशा काही नामवंत व्यक्तींची आत्मचरित्रे ह्या काळात लिहिली गेली.  'धाकटी पाती' हे सूर्यकांत मांडरे व 'तिसरी घंटा' मधुकर तोरडमल या व यांसारख्या चित्रपट, नाटक, नट, दिग्दर्शक, संगीतकार यांनी आपल्या आयुष्यातील घटनांचा वेध आत्मचरित्रातून घेतला आहे.  

विविध साहित्यिक व दलित साहित्यिक यांनीही या वाङ्‌मयात मोलाची भर घातली.  त्यातील काही निवडक साहित्यिकांचा उल्लेख वानगीदाखल करता येईल.  यामध्ये ग. त्र्यं. माडखोलकर यांचे 'माझे जीवन एक कादंबरी', काकासाहेब कालेलकर यांचे 'स्मरणयात्रा', प्रा. श्री.म.माटे यांचे 'चित्रपट', प्रा. कृ.पां.कुलकर्णी यांचे 'कृष्णाकाठची माती', श्री.विठ्ठलराव घाटे यांचे 'दिवस असे होते', आचार्य अत्रे यांचे 'कर्‍हेचे पाणी', व 'मी कसा झालो ?', गो.नी.दांडेकरांचे 'स्मरणगाथा', विश्राम बेडेकर यांचे 'एक झाड दोन पक्षी', वामन चोरघडे यांचे 'जडणघडण', 'तसबीर आणि तकदीर', श्री.के.क्षीरसागर यांचे 'मातीची चूल' आनंद साधले यासारख्या काही कवी, नाट्यकलावंत, संगीत तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार यांनी आत्मचरित्रे लिहिली.  ही आत्मचरित्रे या वाङ्‌मयप्रकारातील परंपरेला समृद्ध करणारी उल्लेखनीय अशी आहेत.

गेल्या काही वर्षांपासून दलित साहित्यिकांनी आपल्या अभिव्यक्तीसाठी 'आत्मकथन' हा प्रकार अतिशय समर्थपणे वापरला आहे.  आपण जे भोगले, सोसले आणि जे जीवन जगले तेच अनुभव अभिव्यक्त करण्यासाठी या वाङ्‌मयाचा उपयोग केला गेला.  त्यांची दुःखे, त्यांचे शोषण वगैरेचे आविष्कारण दलित आत्मकथनामधून झाले आहे.  या संदर्भात 'उपरा' - लक्ष्मण माने, 'बलुतं' - दया पवार, 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' -माधव कोंडविलकर, 'आठवणींचे पक्षी' -प्र.ई.सोनकांबळे, 'उचल्या' -लक्ष्मण गायकवाड, 'तराळ-अंतराळ'-शंकरराव खरात, 'गावकी' -रुस्तूम अचलखांब, 'अक्करमाशी'-शरणकुमार लिंबाळे, 'गबाळं'-दादासाहेब मोरे, 'काट्यावरची पोट' -उत्तम बंडू तुपे, 'हाडकीहाडोळ' -नामदेव ढसाळ, 'कोल्ह्याट्याचं पोर' -किशोर काळे, 'आभरान' -पार्थ पोकळे इत्यादी सारख्या आत्मचरित्रांतून विविध उपेक्षित जमातीतील मंडळींनी आपली दुःखे मांडली आहेत.  बहुतेकांची दुःखे सारखी आहेत.  म्हणून दुःख, दारिद्रय आणि यातून आलेल्या वेदना यांचे अनुभव सांगत त्यांची आत्मकथने येतात.  दलित साहित्यिकांनी शोषित आणि वंचित जीवनाचे अनुभव दलित आत्मकथनातून प्रभावीपणे मांडले आहेत.

राजकीय व सामाजिक नेत्यांची आत्मचरित्रे

आत्मचरित्र हा व्यक्तीच्या जीवनाचा इतिहास असतो.  हे खरे असले तरी ज्या समाजव्यवस्थेत, वातावरणात ती व्यक्ती वावरते त्याचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनविषयक जाणिवांवर फार मोठा परिणाम होत असतो.  त्या लेखकाच्या मनावर कळत नकळत भोवतालच्या समाजजीवनाचे पडसाद आलेले असतात.  एवढेच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनात सामाजिकतेचाही एक पदर गुंफलेला असतो.  अशी आत्मचरित्रे मुख्यतः सामाजिक कार्यकर्त्यांची व राजकीय नेत्यांची दिसतात.  राजकीय, सामाजिक क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्‍या अशा व्यक्तींना जीवनात विविध अनुभव येतात.  त्यामुळे अशा व्यक्ती आत्मचरित्रलेखनास प्रवृत्त होतात.  त्या व्यक्तींचे कार्य आणि जीवन नेहमीच समाजासमोर असते.  आहिताग्नी राजवाडे, नानासाहेब चाफेकर, केशवराव भवळकर, शंकरराव देव, ही समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणारी नामवंत व्यक्तिमत्त्वे आपल्या जीवनाचे चित्र रेखाटताना आपापल्या संसाराचे दिग्दर्शन तर करतातच पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी वैविध्यपूर्ण होती हेही लक्षात आल्यावाचून राहात नाही.  माणूस समाजात आणि निसर्गात राहत असला आणि त्यांच्याशी घडोघडी संबंध येत असले तरी माणसाचे स्वतःशीच घनिष्ठ संबंध असतात.