शैलीकार यशवंतराव ६८

सामाजिक, राजकीय किंवा अशाच स्वरूपाच्या कार्यास स्वतःला वाहून घेणार्‍या व्यक्तींनी आत्मचरित्रे लिहिली आहेत.  त्यामध्ये 'मी एस.एम.' मध्ये एस.एम. जोशी, 'माझी जीवनगाथा' मध्ये प्रबोधकार ठाकरे, न.वि. गाडगीळ तथा काकासाहेब गाडगीळ यांचे 'पथिक', 'हे गीत जीवनाचे', सुमतीबाई शाह, मृणालिनी देसाई यांचे 'निशीगंध', ना. ग. गोरे 'कारागृहाच्या भिंती', आचार्य अत्रे यांचे 'कर्‍हेचे पाणी', कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचे 'माझ्या आठवणी आणि अनुभव', तसेच गंगाधर देशपांडे यांचे 'माझी जीवनगाथा' इत्यादी व यासारख्या आत्मचरित्रातून आपल्या राजकीय, सामाजिक, प्रशासकीय जीवनातील भल्याबुर्‍या अनुभवांचे चित्रण आले आहे.  तसेच या आत्मवृत्तातून टिळक-गांधीजींच्या नेतृत्वाचे चित्रण आणि समकालीन राजकीय व्यक्तींची चित्रे व सामाजिक परिस्थितीचे धावते चित्र रेखाटले आहे.

या राजकीय नेत्यांच्या आत्मवृत्तांमध्ये प्रामुख्याने पारतंत्र्याचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ आला आहे.  त्यातही स्वातंत्र्यपूर्व काळ हा एक झंझावाताचा काळ होता.  व स्वातंत्र्यप्राप्‍तीनंतरचा काळ हा देश बांधणीचा काळ होता.  अशा या काळातील तपशील आणि वर्णने राजकीय आत्मचरित्रांत आलेली आहेत.  आपल्याकडे राजकीय इतिहास तसा फारसा लिहिला गेला नाही.  तसेच राजकीय व्यक्तीची चरित्रेही फारशी लिहिली गेली नाहीत.  त्यादृष्टीने आपण अजून अंधारातच चाचपडत आहोत असे म्हटले तरी चालेल.  भारताच्या या स्वातंत्र्यलढ्यात जे मोठमोठाले कृतिवीर आणि नेते होऊन गेले त्यांची आत्मचरित्रे तर नाहीतच.  त्यामुळे जी राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे आहेत त्यामधून प्रामुख्याने त्या व्यक्तींच्या जीवनाचा इतिहास आणि आपल्या जीवनामधून ती व्यक्ती जो इतिहास घडवित असते त्या आधारे समाजाचा संदर्भ प्रकट झालेला आहे.  राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांमधून जीवनविकास आणि सभोवतालची परिस्थिती यांचे चित्र अधिक स्पष्ट होते.  अशा आत्मचरित्रांमधून लेखकाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते.  त्यामुळे अशा प्रकारच्या आत्मचरित्रात साहित्याला जे एक रूप यावे लागते त्या रूपाचे प्रत्ययकारी दर्शनही वाचकाला सहजपणे घडते.  अशा आत्मचरित्रांमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्राचा समावेश करता येईल.