साहित्याच्या विविध अंगांचा वेध घेणारे लेखन त्यांनी केले आहे. त्या काळात त्यांचा ग्रामीण जीवनाशी आलेला निकटचा संबंध, पाहिलेल्या लोकविलक्षण व्यक्ती आणि घटना, संवेदनशील काव्यात्मक वृत्तीने घेतलेले अनुभव, मानवी स्वभावाच्या बर्यावाईट स्वरूपाबाबतचे उत्कट कुतूहल, सर्वसमावेशक स्वभाव अशा अनेक बाबींमध्ये त्यांची साहित्याची बीजे रुजलेली असावीत. त्याचबरोबर बालपणापासून जोपासलेला वाचनाचा छंद आणि भरमसाठ वाचनामुळे तयार होत गेलेली वाङ्मयप्रेमी रसिकवृत्ती यांचाही यशवंतरावांमधल्या भावी लेखकाला संस्कारित करण्यास उपयोग झाला. अशा साहित्यिकाचा मूल्य विचार आणि त्यांच्या साहित्य विचाराचे (सांगोपांग) यथार्थ आणि अभ्यासपूर्ण विवेचन करणे महत्त्वाचे वाटते.
यशवंतरावांनी साहित्याकडे केवळ रंजनवादी भूमिकेतून पाहिलेले नाही. उलट साहित्यिकाने वास्तवाचा डोळसपणे अभ्यास करावा. देश-काल-स्थितीचे त्याने चिंतन करावे. लेखकाने जीवनातल्या अंतिम सत्याचा शोध घेत राहणे आणि त्या शोधात आपणाला जे जे उत्कटतेने व अपूर्वाईने जाणवले ते सुंदरतेने व्यक्त करणे या हेतूनेच त्यांनी लेखन केले. जीवनाचे अंतिम सत्य म्हणजेच मानवतेचे मूल्य त्यांनी महत्त्वाचे मानले आहे. म्हणजेच रंजनवादापेक्षा त्यांनी जीवनवाद महत्त्वाचा मानला. त्यांच्या समग्र साहित्याचा विचार करताना केवळ रंजनात्मक मूल्य असलेले लेखन त्यांनी केले नाही. त्याचे कारण त्यांची वाङ्मयीन शुद्ध होती. ती वाचन-मननाने संस्कारीत झाली होती.
यशवंतरावांचे साहित्य हे रंजनप्रधान, सौंदर्यवादी अजिबात नाही. फडके, खांडेकर यांच्या रंजनप्रधान साहित्याचा त्यांच्या लेखनावर कोठेही प्रभाव दिसत नाही. परंतु त्यांचे साहित्य आस्वादक व रसिक वाटते. या काळात निर्माण झालेले बरेच साहित्य हे स्वप्नरंजनात्मक होते. अद्भुत वातावरण निर्माण करणारे होते. केवळ स्वप्नरंजन हाच या साहित्याचा हेतू होतो. असे असतानाही यशवंतरावांतील साहित्यिक सौंदर्यवादी कथा, कादंबरी, नाटकासारख्या रंजक स्वरूपाच्या कलाकृती निर्माण करण्यासाठी पुढे सरसावला नाही. तो प्रांत त्यांनी वर्ज्य मानला. स्त्रीपुरुष संबंध, प्रणय यावर आधारित लेखन त्यांनी केले नाही. हौस, मौज, शृंगार, मनमोकळे वागणे, कलासक्त जीवन, सुखलालसा, हास्यविलास यांसारखे वर्णन करणारे कथात्मक साहित्य त्यांनी निर्माण केले नाही. त्यांच्या कालखंडात कलावाद आणि जीवनवाद म्हणजे 'कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला' असे वाद निर्माण झाले होते. या वादात प्रा. फडके, वा.म.जोशी, डॉ.केतकर, वि.स.खांडेकर, साने गुरुजी, प्र.के.अत्रे, ग.त्र्यं. माडखोलकर यांसारखे मातब्बर लेखक सहभागी झाले होते. पण अशा वादातही ते गेले नाहीत. मनोरंजनप्रधान अथवा स्वप्नाळू ध्येयवादाचे चित्रण करणारे लेखन चव्हाणांनी केले नाही. तो प्रांत त्यांना आवडला नाही. अस्सल जीवनानुभव अतिशय भेदकपणे आणि दाहकपणे व्यक्त करण्यासाठी त्यांनी वैचारिक साहित्य निर्माण केले. यामध्ये माणसाच्या अथांग मनाच्या तळाचा, तिथल्या भावना, विचार कल्पनांचा त्यांनी वेध घेतला. राष्ट्रीय अथवा जागतिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनाचे चित्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्वातंत्र्योत्तर काळात स्फुरलेल्या नव्या उर्मी आशा-आकांक्षा पूर्ण झाल्या की नाही हे पाहणे असे चिंतनपर लेख त्यांनी लिहिले. गांधी वधानंतर निर्माण झालेले जातीयतेचे व जाळपोळीचे प्रसंग, त्यावेळच्या जीवनातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विषमतेमुळे निर्माण झालेले प्रश्न, प्रादेशिक तत्त्वावर भाषावाद प्रांताची मागणी अशा कितीतरी प्रश्नांचा ऊहापोह यशवंतरावांनी त्यांच्या ललित लेखनातून केला. कोणतीही घटना किंवा विचार शेवटी मानवतावादी भूमिकेला नेऊन भिडवण्याची प्रवृत्ती हे यशवंतरावांच्या ललित साहित्याचे तंत्र होते.
''ललित साहित्याने समाजकारण केले पाहिजे असे जे म्हटले जाते त्याचा अर्थ एवढाच की सामाजिक वास्तवाशी अधिक डोळसपणे, अधिक व्यापकतेने, अधिक जिज्ञासेने आणि जिव्हाळ्याने एकरूप होऊन ललित साहित्य निर्माण झाले पाहिजे.'' अशाच स्वरूपाच्या बांधीलकीतून यशवंतरावांचे ललित साहित्य निर्माण झाले आहे. त्यांनी त्यांच्या ललित साहित्यात वैचारिक व गंभीर लेखनास जास्त भर दिला आहे. त्यांच्या लेखनामध्ये त्यावेळचे समकालीन प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे यशवंतरावांनी वास्तवाचे भान ठेवूनच साहित्यकृतीमध्ये प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे समकालीन वास्तवच चित्रित केले आहे. वास्तवातील मूलतत्त्वे घेऊन नवनिर्मिती करण्यास ते यशस्वी झाले आहेत. जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे जीवनाला डोळस करण्याचे कार्य असे साहित्य करू शकते. असा त्यांचा ठाम विश्वास होता. साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसते. अथवा विरंगुळ्यासाठी नसते. साहित्याची प्रत्यक्षा-प्रत्यक्षपणे अनेक बाबतीत उपयुक्तता असते. ''साहित्यात माणूस, माणसाची जाणीव, माणसाचे अनुभव व्यक्त होतात.