शैलीकार यशवंतराव ६२

यशवंतरावांसारखा ललित लेखक आपल्या अनुभव सृष्टीचे सूचक दर्शन त्यांच्या साहित्यातून घडवित असतो.  मानवी मनातील भावना ज्यावेळी शब्दांवाटे लिखित स्वरूपात कागदावर उतरतात त्यावेळी साहित्य निर्मिती होते.  प्रत्येक साहित्यकृती ही स्वतःचा असा एक आकृतीबंध साधत असते.  साहित्य आपला अनुभव भाषेच्या माध्यमातून व्यक्त करत असते.  साहित्य हे शब्दांच्या साहाय्याने साधलेले विविध अनुभवांचे सर्जन असते.  यशवंतरावांचे साहित्य म्हणजे एका अनन्यसाधारण अनुभवाने साधलेले स्वयंलेखन नसून ते एका व्यक्तिमत्त्वाने शब्दांच्या साहाय्याने घेतलेला आपल्या एका असाधारण अनुभवाचा शोध आहे.  हा शोध शब्दांच्या साहाय्याने साक्षात करण्याचे काम यशवंतरावांसारखा निर्मितीक्षम व्यक्तिमत्त्व असलेला लेखकच करू शकतो.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा साहित्याच्या भाषेवर उमटलेला दिसतो. प्रत्यक्ष जीवनातील विविध अनुभवांचे चिंतन व ज्या चिंतनाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष अनुभव जसे रूप घेईल तसेच रूप साहित्यात उपरविण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला आहे.  थोडक्यात मनातील भावना ज्यावेळी शब्दांवाटे लिखित स्वरूपात कागदावर उतरतात त्यावेळी यशवंतरावांसारख्या लेखकाची साहित्यनिर्मिती होते.  यशवंतरावांसारख्या एखाद्या राजकीय नेत्यास प्रत्यक्ष जीवन जगत असताना जे अनुभव आले त्या अनुभवांच्या आधारे त्यांनी 'ललित लेखन' केले.  या लेखनामध्ये लघुनिबंध, ललित निबंध, प्रसंगचित्रे, व्यक्तिचित्रे, भाषाचित्रे, प्रवासवर्णने, आत्मनिष्ठपर लेखन, वैचारिक लेखन इ. प्रकारांना सामावून घेणारी वाङ्‌मयनिर्मिती त्यांनी केली.  या विविध साहित्य प्रकारांतील निवडक वाङ्‌मयाचा आढावा, त्याचे स्वरूप, त्याचा विकास या बाबतचा विस्तृत अभ्यास आणि त्या प्रत्येकाची वैशिष्ट्ये विस्ताराने समजावून घेणे महत्त्वाचे आहे.  तसेच त्यातल्या विविध प्रकृती वैशिष्ट्यांची, त्यामागील भिन्न भिन्न प्रेरणांचा तपास करून ठळक लेखनाचा उल्लेख करणे इतकेच काय ते त्या लेखनाच्या मर्यादेत बसू शकेल.  हे ध्यानात घेऊनच पुढील विवेचनाकडे वळले पाहिजे.

यशवंतराव चव्हाण हे चिंतनशील लेखक असल्यामुळे तत्कालीन वैचारिक प्रवाहाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम झालेला होता.  १९२० ते १९४५ हा कालखंड राजकीय, सामाजिक, वैचारिक आंदोलनाचा होता.  भारताच्या राजकीय, सामाजिक स्थित्यांतराचा एक महत्त्वाचा कालखंड होता.  साहित्य आणि कला या दृष्टीनेही हा काळ महत्त्वाचा आहे.  भारताच्या स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासातले हे गांधीयुग होते.  गांधीजींच्या जीवनाविषयीची विचारसरणी आणि त्यांची शांततामय असहकाराची कृती, अहिंसेवर त्यांनी दिलेला भर या विविध गोष्टींचा प्रभाव यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर होत होता.  याचबरोबर समाजवाद, नवमतवाद, मार्क्सवाद, जीवनवाद असे विविधवाद त्या काळात निर्माण झाले.  विशेषतः १९३० च्या पुढे पंधरा वीस वर्षे मराठी साहित्यसृष्टीवर पुरोगामी साहित्याच्या वादाची छाया पडली.  त्याचीच परिणती म्हणून कलावाद, जीवनवाद, नवनीतीवाद, नवमतवाद अशी नवीन रूपे वादाचा विषय ठरली.  यामध्ये ना. सी. फडके, आचार्य शं.द. जावडेकर, वि.स.खांडेकर, प्र.के.अत्रे, ल.रा.पांगारकर, ग.त्र्यं.माडखोलकर यांसारख्या मातब्बर लेखकांनी भाग घेतला.  त्यामुळे मार्क्सचा साम्यवाद व फ्रॉईडचे तत्त्वज्ञान यांचाही परिचय व प्रसार या निमित्ताने झाला.  या विविध वादांच्या निमित्ताने साहित्यक्षेत्रात पुष्कळ चर्चाचर्वण झाले.  त्यात साहित्याचे प्रयोजन काय, साहित्याचे स्वरूप काय, साहित्यिक साहित्य निर्माण का करतो, कसे करतो, रसिक साहित्य का वाचतो, सत्य, शिव, सौंदर्य यांचा संबंध काय, जीवन आणि साहित्य यांचा संदर्भ काय यांसारख्या असंख्य प्रश्नांवर चर्चा झाल्या.  याशिवाय असहकाराची चळवळ, अहिंसावाद, सत्याग्रह, मजूर चळवळ, दलितांचा उद्धार, स्त्रीस्वातंत्र्य, अस्पृश्यता निवारण असे अनेक प्रश्न समाजात निर्माण झाले होते.  महाराष्ट्रात गांधीजींचे राजकारण खेड्यापाड्यातील ब्राह्मणेत्तर बहुजन समाज आणि स्त्रीवर्गांपर्यंत जाऊन पोहोचले.  सूतकताई, प्रभात फेरी, सत्याग्रह यांनी कृतीशील राजकारणात सुलभता आणली.  महाराष्ट्रात बहुजन समाजातील ज्या लोकांनी गांधीवादापासून प्रेरणा घेतली त्यामध्ये यशवंतराव होते.  परिणामतः यशवंतरावांच्या वैचारिक आणि साहित्यिक जडणघडणीमध्ये या सर्व घटनांचा परिणाम झालेला दिसतो.  साहित्यापासून राजकारणापर्यंत त्यांनी केलेले स्फुटलेखन हे वैचारिक आणि गंभीर स्वरूपाचे आहे.  

साहित्य क्षेत्रातील यशवंतरावांचे कर्तृत्व सामान्य नाही.  एक सर्जनशील कलावंत व उत्तम समीक्षक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल.  ललित लेख, वाङ्‌मयीन समीक्षा, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन, वाङ्‌मयीन रसग्रहण, पत्रात्मक लेखन व आत्मचरित्र अशा अनेक गद्य साहित्य स्वरूपात त्यांनी लेखन केले आहे.  हे त्यांचे वाङ्‌मय वैविध्याने आणि गुणवत्तेनेही समृद्ध आहे.  'कृष्णाकाठ', 'भूमिका', 'युगांतर', 'ॠणानुबंध', 'विदेश दर्शन', 'शिवनेरीचे नौबती', 'शब्दांचे सामर्थ्य', 'सह्याद्रीचे वारे' विचारधारा यासारख्या कलाकृतीने यशवंतरावांनी साहित्यक्षेत्रात आपली नाममुद्रा ठळकपणे उमटवली आहे.  तसा त्यांनी केवळ एखादाच वाङ्‌मयप्रकार हाताळला आहे असे नाही.  याच्या जोडीला विविध पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना म्हणजे त्या पुस्तकांची समीक्षाच म्हणावी लागेल.