४ जानेवारी १९६६ रोजी शास्त्री-अयुबखान बोलणी ताश्कंदमध्ये सुरू झाली. यशवंतराव चव्हाणही त्यांच्याबरोबर होते. ताश्कंद करारावर सही केल्यानंतर दुसर्या दिवशी ११ जानेवारी १९६६ रोजी हृदयविकाराने शास्त्रीजींचा मृत्यू झाला आणि पुन्हा पंतप्रधानपदाचा प्रश्न निर्माण झाला. जीवनामध्ये आणखी कसोटीचा क्षण आला. काही प्रसंगी त्यांच्या कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्वाने ती-ती कसोटी पार पाडली तर काही प्रसंगी त्यांचे अंदाज चुकले. त्यावेळी पंतप्रधानपदासाठी यशवंतरावांचे नाव पुढे आले. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांचे नाव सुचवले. परंतु चव्हाणांनी स्वतःच इंदिरा गांधींना सांगून टाकले, ''आपण प्रधानमंत्रीपदासाठी निवडणूक लढवणार असाल तर माझा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे. या पाठिंब्यामुळे चव्हाण स्पर्धेतून दूर झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. यशवंतरावांनी आयुष्यातील एक चांगली संधी नाकारली. यशवंतरावांनी संघटनात्मक राजकारण ज्या भूमिका स्वीकारल्या त्याबद्दल दुर्दैवाने काही ठिकाणी गैरसमज निर्माण झाले. त्यांच्यावर गुंडगिरी, संधीसाधू वृत्ती आणि दुटप्पी धोरणांनी वावरणारा नेता म्हणून आरोप केले. पण त्यात फारसे तथ्य नाही. त्यांची प्रतिमा नेहमीच वादळातून तयार होत गेली हे मात्र उघड सत्य आहे.
अखेरच्या काळात त्यांना मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या. यशवंतरावांच्या अनुयायांच्याही मनात संभ्रम निर्माण झाला. त्या प्रसंगीही आपली भूमिका स्पष्ट अशा शब्दांत मांडण्याचे नीतीधैर्य दाखवून यशवंतरावांनी आपले नेतेपद सिद्ध केले. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनामुळे सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली. पण श्रीमती गांधींचा याला विरोध होता. त्यांनी अचानक जगजीवनराम यांचे नाव पुढे केले. परंतु रेड्डी बहुमतांनी निवडून आले. यशवंतरावांनी रेड्डींना पाठिंबा दिला होता. श्रीमती गांधी या बंगलोर अधिवेशनाच्या अगोदर हैद्राबादेत झालेल्या अधिवेशनापासूनच यशवंतरावांवर नाराज होत्या. त्यात आणखी भर पडली. त्यामुळे संघटना काँग्रेस आणि सत्तारुढ काँग्रेस असे दोन गट पडले. या सर्व घटनात यशवंतरावांची परिस्थिती दोलायमान व धरसोडीची राहिली आणि या प्रसंगात इंदिरा गांधी व यशवंतराव यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि १९७८ मध्ये संजीव रेड्डी काँग्रेसमध्ये दाखल झाले. चरणसिंगांच्या जनता पक्षीय राजवटीत १९७९ मध्ये ते उपपंतप्रधान झाले. पण ते सरकार अल्पावधीत कोसळले. नव्याने निवडणुका झाल्या. यशवंतरावांना पंतप्रधानपद मिळ द्यायचे नाही या दृष्टीने इंदिराजींनी हालचाली केल्या. चरणसिंग आणि यशवंतराव यांच्या मंत्रिमंडळातील काही लोकांनी एकाच वेळी दगा दिला.
१९८० च्या निवडणुकीला इंदिरा गांधींचा पक्ष प्रचंड बहुमतांनी विजयी झाला. त्यांनी आपले मंत्रिमंडळ बनवले. तथापि या मंत्रिमंडळात त्यांचा मंत्री म्हणून समावेश केला नाही. परंतु १९८२ मध्ये इंदिरा गांधीनी काँग्रेसमध्ये परतल्यावर त्यांना आठव्या वित्तआयोगाचे अध्यक्ष केले. या काळात त्यांच्यावर चारही बाजूंनी संकटे येत होती. राजकारणात शेवटी ते एकाकी पडले. गैरसमजांचे हलाहल त्यांनी पचवले. मर्मभेदक टीकेचा प्रहार त्यांना सहन करावा लागला. संकटांचे आघात सोसावे लागले. तरी कधीही त्यांनी आपला समतोल कधी ढळू दिला नाही. त्यांनी राग, लोभ गिळला होता. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. आरोप केले. दगडफेकही केली. तरीही त्यांनी मनाची शांतता व संयम ढळू दिला नाही.
यशवंतरावांवर या काळात कौटुंबिक संकटे कोसळली. १९८१ पासून १९८४ नोव्हेंबरपर्यंत यशवंतरावांच्या मनाची कुचंबणा, स्वतःची परवड झाली. याच काळात वेणूताई गेल्या. या घटनेचा उल्लेख करताना ते म्हणतात, ''माझ्या अंतःकरणातल्या पवित्र नंदीदीपाची ज्योत कायमची निमाली आणि हातात उरली ती फक्त चिमूटभर राख.... जीव कासावीस करणारी काजळी.'' या घटनेमुळे पहाडासारखा असणारा हा माणूस अंर्तबाह्य कोसळला. ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिराजींची निर्घृण हत्या झाली. यावेळीही त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली. यावरून यशवंतराव किती मृदू मनाचे होते हे दिसून येते. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांनी पण इहलोकीची यात्रा संपवली. ज्या अवस्थेत मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली ती अवस्था त्यांच्यासारख्या जुन्या, जाणत्या नेत्यावर यावी हा दैवदुर्विलास होय. यशवंतरावांचा आजार एकाएकी वाढला आणि दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये योग्य आणि तातडीच्या उपचाराअभावी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
यशवंतरावांच्या आयुष्याचा अखेरचा कालखंड निराशा आणि दुःख यांनी भरलेला दिसतो. अपयशामागून अपयश येत गेले. कौटुंबिक जीवनातही एका पाठीमागून एक अशा आपत्ती आल्या. पण या प्रतिकूल परिस्थितीच्या खाचखळग्यात न कोलमडता, स्वतःच्या मनोधैर्याच्या बळावर त्यांनी आपले जीवन सावरण्याचा प्रयत्न केला. आत्मविश्वासाची नवी संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. संकटकाळात भावनावेगात वाहून न जाता विचारपूर्वक घेतलेल्या भूमिकेवर दृढ राहून शत्रू-मित्रांनी केलेली जीवघेणी टिंगलटवाळीही निर्धाराने सहन केली. त्यांच्या आयुष्यातील शेवटची ५-१० वर्षे वादग्रस्त आणि महत्त्वपूर्ण प्रसंगांनी युक्त अशीच गेली. तरीही संस्कारक्षम नीतीमत्तेमुळे ते कधी विचलित झाले नाहीत. आलेल्या प्रसंगांमुळे कधीही तापट वृत्तीने वागले नाहीत. त्यांच्या जडणघडणीतील काही स्फूर्तिदायक प्रसंग नव्या पिढीस निश्चितच स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहेत.