माणूस कितीही दुःखीकष्टी असला तरी त्याला उत्तेजन आणि सहानुभूती यांचे खतपाणी मिळाले की त्याची कोमेजलेली जीवनवेल टवटवीत होते. यशवंतरावांच्या आईने अशी कोमेजलेली फुले टवटवीत करण्याचा सदैव प्रयत्न केला. यशवंतरावांना त्यांच्या प्रेमळ सहवासात आयुष्यातली काही संस्मरणीय वर्षे व्यतीत करण्याचे सदभाग्य लाभले. त्यांच्या अनेक थोर स्मृती यशवंतरावांच्या अंतःकरणात चिरकाल राहिल्या.
यशवंतरावांना आईच्या मनाचा मोठेपणा आणि अंतःकरणाचा दिलदारपणा, त्याचबरोबर सहानुभूतीचा प्रत्यय वारंवार येत होता. आईच्या स्वभावाविषयी ते म्हणतात, ''आयुष्यातली बरीच वर्षे दुःखाशी सोबत करूनही दिलदारपणा राहणे हे देणे देवाचे असावे लागते. माझ्या आईचे जीवन मला नेहमीच दीपज्योतीसारखे वाटले. दिवा जळत असतो, त्याच्या प्रकाशात माणसे वावरत असतात. पण आपण लोकांच्या उपयोगी पडत आहोत हे त्या ज्योतीला, त्या प्रकाशाला माहीत नसते. ते दीपज्योतीचेच जळणे आईचे होते.'' यशवंतरावांच्या या उद्गारांवरून त्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम त्यांच्या आईनेच केले आहे हे लक्षात येते. आईबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांची आई हीच त्यांची गुरू होती. आई मार्गदर्शक झाली. तिने आधार दिला. तिच्या जात्यावरच्या ओव्यांमधून त्यांना संदेश मिळाला होता. यशवंतरावांनी आपल्या निरक्षर, भोळ्या मातेचे ॠण अनेक प्रसंगी जाहीरपणे व्यक्त केले. नागपूर येथे एका सत्काराला उत्तर देताना एके ठिकाणी ते म्हणतात, ''त्या माझ्या म्हातार्या आईची आज मला आठवण येत आहे. तिची पुण्याई, तिचा साधेपणा, तिचे प्रेम, तिने शिकवलेले छोटे छोटे गुण हेच माझ्या जीवनामध्ये मला उपयोगी पडले आहेत.'' माता आणि माती यांच्याविषयी अधिक ओढा असलेला हा नेता आपल्या आईच्या प्रेमात किती एकरूप होतो ते पुढील काही ओळींवरून लक्षात येते. ते म्हणतात, ''तीर्थतुल्य मातेच्या दर्शनाने माझे अष्टसात्विक भाव जागे होतात. अंतर्मन निथळू लागते. पौर्णिमेच्या चंद्रातून अमृतबिंदू ठिबकावेत, तशी तिची प्रेमळ दृष्ट माझ्यावर वर्षाव करते आणि नकळत पायगत झालेल्या पापण्या, हृदयाच्या चौफाळ्यावरील पावले धुंडाळू लागतात.'' (कित्ता १२२) विठाईच्या व्यक्तिमत्त्वाने यशवंतरावांच्या जीवनाला कुठे ना कुठे सोनेरी स्पर्श झालेला आहे. आणि तो त्यांनी आपल्या हृदयाच्या पेटीत जपून ठेवला आहे. विठाईच्या व्यक्तिमत्त्वाने यशवंतराव प्रभावित तर झालेच; परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या अलौकिक गुणांनी दिपून जाऊन त्यांनी अनेक वेळा कौतुकाने आईचा उल्लेख केला आहे.
बंधूंचा प्रभाव
यशवंतरावांच्या बालपणी कौटुंबिक संस्कारांमध्ये जसा त्यांच्या आईचा मोठा वाटा आहे तसाच त्यांचे भाऊ गणपतराव यांचाही मोठा वाटा आहे. बंधू गणपतराव यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन त्यांना सदैव लाभले. यशवंतरावांचा पिंडच विचारी व विवेकी असल्याने त्यांच्यावर त्यांच्या भावांच्या विचारांचाही परिणाम झाला. जे मंगल, भव्य, दिव्य असेल ते घेण्याची त्यांची लहानपणापासूनची प्रवृत्ती होती. गणपतरावांना परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता आले नाही. पण यशवंतरावांनी खूप शिकावे असे त्यांना वाटत असे. त्यामुळे त्यांचे आपल्या धाकट्या भावाकडे अधिक लक्ष असे. गणपतराव व यशवंतराव यांच्या वयात तसे फार मोठे अंतर नव्हते. त्यामुळे ते गणपतरावांना नावाने हाक मारत. ते दोघेही बरोबरीच्या नात्यानेच वागत असत. गणपतराव तसे महत्त्वाकांक्षी होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. आपण आपल्या परिस्थितीवर मात केली पाहिजे असे ते सांगत. लहानपणी यशवंतरावांना ते तालमीत घेऊन जात असत. त्यांना कुस्त्यांची आवड निर्माण झाली. आर्थिक हलाखीमुळे हायस्कूलचे शिक्षण पुरे करता आले नाही. पण आपली अपूर्ण इच्छा त्यांनी यशवंतरावांच्या माध्यमातून पूर्ण केली. आधुनिक इंग्रजी शिक्षणाचा लाभ यशवंतरावांना केवळ गणपतरावांच्या दूरदृष्टीमुळे झाला. तसे ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. सत्यशोधकी विचार गणपतराव लहानपणीच यशवंतरावांना समजावून देत आणि त्याचे पडसाद त्यांच्या बालमनावर उमटत होते. महाराष्ट्रात जेधे बंधू, जवळकर, भास्करराव जाधव हे सत्यशोधक चळवळीचे कार्य करीत होते. कर्हाडमध्ये भाऊसाहेब कळंबे गुरुजी हे काम करीत होते. त्यांच्या 'विजयाश्रमात' सत्यशोधकी संस्कार करत होते. गणपतराव तेथे नियमितपणे जात होते. पुढे ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते बनले. नव्या इंग्रजी शिक्षणाचे रहस्य त्यांना उमगले होते. मोठ्या सामाजिक परिवर्तनाचा आदेश हे कार्यकर्ते देत असत. त्यातूनच सामाजिक क्रांतीचा मूळ विचार विकसित झाला. यशवंतराव लिहितात, ''नाही म्हटले, तरी सत्यशोधकीय व ब्राह्मणेतर चळवळीचे संस्कार मनावर नकळत होतच होते.'' यशवंतरावांवर त्यांचे बंधू गणपतराव यांच्यामुळे सामाजिक संस्कार झाले हे यशवंतरावांनी मान्य केले आहे.