शैलीकार यशवंतराव २६

प्रकरण ३ - चिरा चिरा हा घडवावा.....

यशवंतराव आईच्या प्रेमळ, संजीवनी छत्राखाली वाढत होते.  घडत होते.  विठाई तशी अत्यंत सोशिल, काटकसरी स्वभावाची, शांत, गंभीर माऊली होती.  तिने पतीच्या निधनाच्या दुःखातून स्वतःला सावले.  आपले दुःख विसरून मुलांना दिलासा दिला.  इतकेच नव्हे तर स्वतः कष्ट करून चार-सहा महिने तिने मुलांना धीर दिला आणि जगविले.  पण अशी परिस्थिती येऊनसुद्धा ती माहेरी फार दिवस राहिली नाही.  अडचणीच्या काळातही तिने मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यासच घेतला होता.  शिक्षण ही एक शक्ती आहे असे समजून तिची धडपड चालू होती.  पुढे यशवंत मोठा होऊ लागला तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला.  एकीकडून चव्हाण कुटुंबाचे जीवन कष्टमय धडपडीतून जात असताना परिस्थितीचे दाहक चटकेही त्यांना बसत होते.  आर्थिक विवंचनेचा एक काळा ढग त्यांच्या डोक्यावर तरंगत असे.  पण एवढ्या लहान वयात व अशा परिस्थितीतही यशवंतराव कधी दुःखी, नाराज झालेले दिसत नाहीत.  उलट भोवतालच्या लोकजीवनाचे निरीक्षण करण्यात आणि त्या लोकजीवनात समरस होण्यात त्यांना आनंद होता.

यशवंतराव चव्हाणांचे आजोळ देवराष्ट्र.  देवराष्ट्रामध्येच त्यांचे बालपण गेले.  बळवंतरावांच्या मृत्यूनंतर विठाईने यशवंतरावांना आपला भाऊ दाजी घाडगे यांच्याकडे पाठविले.  ते शेती करून आपली उपजीविका करत असत.  त्यांच्या प्रेमळ छायेतच यशवंतरावांचे बालपण गेले.  यशवंतरावांचे मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण देवराष्ट्र येथील प्राथमिक शाळेत झाले.  तसे हे गाव त्यावेळी सुमारे ८० वर्षांपूर्वी आधुनिक नागरी सांस्कृतीपासून दुरावले होते.  अशा गावी त्यांचे बालपण गेले.  चव्हाण कुटुंबाला जी काही थोडी फार मदत करता येईल ती घाडग्यांनी केली.  गुरुंनी लहान वयात दिलेले प्रेम आणि त्यांनी लावलेली शिस्त ही त्यांना त्यांच्या जीवनात कामी आली.  म्हणूनच त्यांना या देवराष्ट्राच्या शाळेबद्दल व गुरुजींबद्दल एक वेगळा जिव्हाळा होता.  या गावाबद्दल आपल्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणतात, ''सज्जनांचा जिव्हाळा आणि सरस्वतीचे सौंदर्य या भूमीला जसे लाभले आहे, तसे तिच्या सद्‍गुणाला चांगुलपणाचे तेज आहे.  भव्यत्व आणि दिव्यत्व यांनी इथे परिसीमा गाठली आहे.''  अशा प्रकारे यशवंतरावांनी बालवयातील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत.  सध्या सांगली जिल्ह्यातील खानापूर, वाळवा व तासगावच्या सीमेवरील आताच्या नवीन पलूस तालुक्यातील देवराष्ट्र छोटेस गाव.  सोनहिर्‍याच्या काठावर वसलेले.  मेघराजावर अवलंबून असणारे कृषिजीवन असलेले गाव.  बालपणी यशवंतरावांना 'सोनहिरा' या ओढ्याचे विलक्षण वेड होते.  अमृताच्या स्पर्शाने मातीतून सोने पिकवणारा हा 'सोनहिरा' आणि त्याच्या काठावरील माणसेही तशीच, अशी त्यांची श्रद्धा.  ते आजोळी असताना या ओढ्यात पोहायला जात.  काठावर खेळ मांडत असत.  बागेतल्या चिंचा, आवळे तोडून बालपणाचा आनंद लुटत असत.  रस्ता शाळेचा पण सहवास मात्र मिळे 'सोनहिर्‍याचा'.  यशवंतराव देवराष्ट्र व सोनहिर्‍याच्या आठवणी अनेक ठिकाणी सांगतात.  तेथील माणसांच्याबद्दल ते म्हणतात, ''उत्तम जमिनीत बी पेरले म्हणजे चांगले फोफावते, तशी इथली माणसे आणि मने !  त्यांच्यात द्वेषाची धग नाही.''  अशा बालपणीच्या आठवणी यशवंतरावांनी पुन्हा पुन्हा आळविल्या आहेत.  त्यांच्या बालपणातील हे स्वच्छंदी दिवस त्यांच्यातील निर्व्याज, साहित्यिक संस्कारास कारणीभूत ठरले.  ते थोडे दिवसच तेथील प्राथमिक शाळेत शिकले पण तेवढ्या अल्पकालावधीतील सुंदर आठवणी त्यांच्या 'कृष्णाकाठ' व 'ॠणानुबंध' या आत्मकथनपर पुस्तकातून सांगितल्या आहेत.  त्यातून यशवंतरावांच्या कोवळ्या बालमनाचे सुंदर दर्शन घडते.

राजकारण, समाजकारण, धर्मकारण यातील मतमतांतराच्या गलबल्याचा हा कालखंड होता.  असहकार, सत्याग्रह, कायदेभंग, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विचारांना हादरून सोडणार्‍या तोफा समाजाच्या अवतीभोवती गडगडत होत्या.  या कालखंडामध्ये साहित्यात कारागिरीलाच अधिक महत्त्व दिले जात होते.  तरी नव्या लेखकाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा असाच तो काळ होता.  अशा कालखंडात यशवंतरावांसारख्या तरुण विद्यार्थ्याने देवराष्ट्रातून कराडसारख्या नागरी जीवन असलेल्या टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.  यशवंतराव चव्हाण खेड्यातून आलेले होते.