शैलीकार यशवंतराव २७

पण ते खेडवळ राहिले नव्हते.  कराडमध्ये टिळक हायस्कूलला प्रवेश घेतल्यानंतर तेथे त्यांच्या मनोभूमीला चांगलेच खतपाणी मिळाले.  तेथे नामवंत असे शिक्षक त्यांना लाभले.  दत्तोपंत पाठक, शेणोलीकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक द्विवेदी इ. शिक्षक लाभले.  त्यांच्याकडून चांगले धडे मिळाले.  त्यामुळे त्यांची मनोभूमिका समृद्ध झाली.  यशवंतरावांबद्दल या गुरुजनांच्या मनात जिव्हाळा होता.  त्यावेळची टिळक हायस्कूलमधील मंडळी ध्येयवादी, आदर्शवादी व राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेली होती.  त्यांचा प्रभाव यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला होता.  यासंदर्भात यशवंतराव चव्हाण म्हणतात, ''या सुमाराला मी माझी मराठी सातवी इयत्ता पास करून कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये एका वर्षात तीन इयत्ता पास करण्याचा कोर्स पुरा करून हायस्कूलचा विद्यार्थी बनलो.  एक वेगळे क्षेत्र, वेगळी माणसे आणि एका वेगळ्या वातावरणात मी आलो.''  यशवंतरावांना तेथे वाचनाचा नाद लागला.  वाचनाने आणि विचाराने यशवंतरावांचे भाषाज्ञान सतर्क बनले.  टिळक हायस्कूलमध्ये त्यावेळी निबंध व वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घेतल्या जात असत.  टिळकांचे विचार आणि आयुष्य यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी असा या स्पर्धांचा हेतू होता.  यशवंतराव या स्पर्धांत भाग घेऊ लागले.  त्यामुळे यशवंतरावांना वक्तृत्व कलेची आवड निर्माण झाली.  लेखनाचाही छंद लागला.

महाराष्ट्राच्या सामाजिक मनाचे शिल्पकार गोपाळ गणेश आगरकर हे कराडजवळील टेंबू गावचे.  त्यांची त्यागबुद्धी आणि हरिभाऊ आपटे यांची विदग्ध साहित्यसृष्टी अंगिकारून यशवंतरावांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली.  त्याचबरोबर गोविंदाग्रजांच्या साहित्याचा यशवंतरावांच्या मनावर विद्यार्थी दशेत खूपच परिणाम झाला.  या लेखकांच्या पुस्तकांनी त्यांच्या भोवतीच्या परिस्थितीचा तसेच दुःखाचा अर्थ लावायला शिकवले.  सामाजिक प्रबोधनाचे एक साधन म्हणून साहित्याच्या शक्तीवर त्यांची श्रद्धा बसत गेली.  त्यावेळी काय वाचावे किंवा कसे वाचावे हा प्रश्न नव्हता.  कारण निवड करून वाचण्याची संधीच नव्हती.  मग मिळेल ते व मिळेल तेथून पुस्तके घेऊन वाचनाचा सपाटा त्यांनी सुरू ठेवला.  म्हणूनच पुढे ख्यातनाम वक्ते, प्रभावी व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध झाले.  ग्रामीण संस्कृतीचा साक्षात आणि सखोल संस्कार आणि त्याच्या जोडीला हे चौफेर वाचन यातून खेड्यातल्या एका तरुणाचे रूपांतर एका हुशार विद्यार्थ्यात झाले.  वाचनाने चांगले संस्कार मनावर झाले.  'विजयी मराठा', 'राष्ट्रवीर', 'मजूर', 'श्रद्धानंद' इ. वृत्तपत्रे आणि साप्ताहिक ते वाचत होते.  केळकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र', शि. म. परांजपे यांचे 'काळ' मधील निबंध, पंढरी पाटील यांचे 'म. ज्योतिराव फुले' हे चरित्र, टिळकांच्या संबंधित काही पुस्तके हायस्कूलमध्ये असताना वाचनात आली.  या दोन राष्ट्रपुरुषांबद्दल यशवंतराव लिहितात, ''स्वराज्याचा विचार टिळकांनी सांगितला आणि गरिबांची शिक्षणाने प्रगती झाली पाहिजे व समाजात समानता निर्माण झाली पाहिजे हा विचार म. ज्योतिराव फुल्यांनी सांगितला.  हे दोन्ही विचार महत्त्वाचे, म्हणून दोन्ही माणसे आपल्या दृष्टीने मोठीच आहेत, या निर्णयाला मी आलो.''  इ.स. १९३० च्या असहकार चळवळीत विद्यार्थी दशेत त्यांनी भाग घेतला.  त्यावेळी त्यांना तुरुंगात जावे लागले.  वयाच्या २१ व्या वर्षी ते मॅट्रिक पास झाले.  इ.स. १९३४ मध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण संपले.  जूनमध्ये परीक्षेचा निकाल आला व त्यांच्या पुढे आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला.  विचारांती कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

महाविद्यालयीन जीवन

यशवंतराव १९३४ मध्ये जून महिन्यातील तिसर्‍या आठवड्यात उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले.  कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील बाबुअण्णा कोठावळे यांच्या जागेतील दोन खोल्यांत ते राहू लागले.  पहिले वर्ष ते तिथेच राहिले.  कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजची आठवण सांगताना ते म्हणतात, ''शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या राजवाड्यात आमचे हे राजाराम कॉलेज होते.  उत्तम शिक्षक वर्ग, मोकळे वातावरण, समृद्ध लायब्ररी एवढा सर्व संच असल्यामुळे शिक्षणसंस्थेला महत्त्व का येणार नाही ?''  त्यावेळी राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण हे होते.  अत्यंत विद्वान, सुंदर वक्तृत्व व उत्तम प्रशासक या गुणांमुळे ते विद्यार्थ्यांत प्रिय तर होतेच शिवाय कोल्हापूर शहरातही त्यांना मान होता.  यशवंतराव या प्राचार्यांच्या बाबतीत आठवण सांगताना लिहितात, ''त्यांचा माझा हा जो गुरुशिष्य स्नेहाचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता.  तो पुढे चार वर्षे कायम राहिला.  मला अधून मधून जरूर पडेल, तेव्हा मी त्यांना भेटत असे, तेव्हा ते आपुलकीने चौकशी कशी करत आणि जरूर तेव्हा मार्गदर्शनही करत.''  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर अशा अनेक थोर माणसांच्या सहवासामुळे व मार्गदर्शनामुळे प्रभाव पडला.  त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व लोभस बनले.  इ.स. १९३४ ते ३९ पर्यंतचा काळ मोठा वैचारिक संघर्षाचा आणि धामधुमीचा काळ होता.  अनेक चांगल्या वाईट घटना या काळात घडल्या.