शैलीकार यशवंतराव २२

देवराष्ट्राचे संस्कार

यशवंतरावांचे मामा दाजी घाडगे हे यशवंतरावांना लहानशा पण सुसंस्कृत वातावरण असलेल्या खेडेगावात घेऊन गेले.  त्यांचे आजोळचे घर हे गावातल्या एका सामान्य शेतकर्‍याचे घर होते.  या कुटुंबास त्यांचे पालनपोषण करण्याइतकीही जमीन नव्हती.  त्यामुळे इतर एखाद्या जोडधंद्याशिवाय गत्यंतर नव्हते.  असे असूनही चव्हाण कुटुंबियांना जेवढी मदत करता येईल तेवढी मामांनी केली.  यशवंतरावांसंबंधी त्या काळातील आठवण सांगताना लेखक रामभाऊ जोशी लिहितात, ''यशवंतरावांचा जन्म देवराष्ट्रात झाला होता, आणि आता पाच वर्षांनी जगण्यासाठी यावं लागलं तेही आजोळीच.  जन्म आणि बालपण (सागरोबाच्या) सोनहिर्‍याच्या संगतीत घडावं असाच जणू संकेत असावा.  यशवंत देवराष्ट्राला पोहोचला आणि दाजीबाने मग त्याला तिथल्या प्राथमिक शाळेत दाखल केलं.''  यशवंतरावांना लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीची उत्सुकता होती.  प्रत्येक बाब जाणून घेण्याची त्यांना सवय होती.  लहानपणापासून देवराष्ट्राशी सतत संबंध आल्याने तेथील सामाजिक परिस्थिती, माणसे, आलेले अनुभव हे त्यांच्या जीवनाचाच एक अपरिहार्य भाग बनले.  तेथे त्यांना लाभलेली सर्व स्तरांतील लोकांची संगत आणि निकटचा सहवास यामुळे त्यांच्या मनात समाजाविषयी कामची आपुलकी निर्माण झाली.  

यशवंतराव चव्हाण आपल्या आजोळच्या काही आठवणी सांगतात त्यांच्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली याबद्दल म्हणतात ..... ''माझी पहिली शाळा देवराष्ट्राची आहे.  पश्चिमेला उंचशा पठारावर एका तळ्याच्या काठी असलेली दोन-तीन खोल्यांची शाळा मला आजही प्यारी वाटते.  पहिला श्रीगणेशा मी तेथे शिकलो.  ते शिकवणारे माझे पहिले शिक्षक बंडू गोवंडे यांना मी आजही स्मरतो.''  यशवंतरावांचे बालपण देवराष्ट्र येथेच गेले व तिथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.  शाळेत त्यांचा रुबाब पहिलवानी थाटाचा होता.  अभ्यासातही तसे तल्लख म्हणून त्यांना ओळखले जात होते.  तसे ते हुशार होते; पण घरची संस्कृती अशिक्षित होती.  लहानपणी ते गणपतरावांप्रमाणेच धोतर, सदरा व फेटा बांधत असत.  सर्वसाधारणपणे खेड्यातून एखादा माणूस शहरात आला की, त्यांना पटकेवाला समोर नकोसा होतो.  परंतु यशवंतरावांची गोष्ट मात्र वेगळी होती.  पुढे साहेबांचा पोषाख बदलत गेला.  तशी साहेबांची शरीरयष्टी फार उंच नव्हती आणि धिप्पाडही नव्हती.  त्यांच्या शेवटच्या काळात पोट थोडे मोठे झालेले जाणवत होते.  बांधा मध्यम स्वरूपाचा होता.  रंग सावळा, रुंद चेहरेपट्टी, भव्य कपाळ आणि जबडा मोठा, नाक काहीसे मोठे, पांढरेशुभ्र दात, भुवईच्या खाली लखलखणारे चमकदार टपोरे डोळे, पांढरेशुभ्र धोतर, सैलसा पांढरा अंगरखा आणि पांढरीशुभ्र अणकुचीदार टोपी.  कधीमधी जॅकेट वापरत.  हाच त्यांचा पोशाख पुढे कायम राहिला.  त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाने अनेकांना लळा लावला.  

यशवंतरावांना शालेय जीवनापासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.  तशी कोणतीही गोष्ट वडिलोपार्जित म्हणून मिळालेली नव्हती.  सर्व काही स्वकष्टार्जित होते.  साहित्यिक, पुढारी होण्यासाठी जे वातावरण, पैसा वगैरे गोष्टी पोषक ठरतात ते काही यशवंतरावांच्या वाट्याला त्याकाळी आले नाही.  त्यांनी परिश्रमपूर्वक व हेतुपूर्वक आपल्या व्यक्तिमत्त्वाची उभारणी केली.  चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण देवराष्ट्रास पूर्ण करून १९२७ मध्ये यशवंतराव कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये दाखल झाले.  यशवंतराव देवराष्ट्रसारख्या खेड्यातून आले होते.  पण कराडला आल्यानंतर ते खेडवळ राहिले नव्हते.  अभ्यासाव्यतिरिक्त अन्य वाचन यात ते गढलेले असत.  त्यावेळी टिळक हायस्कूलचे द्विवेदी नावाचे शिक्षक होते.  ते राष्ट्रीय वृत्तीचे होते.  यशवंतरावांचे वाचन वाढत होते.  कृष्णा-कोयनेच्या संगमावर त्यावेळी होणार्‍या सभा विद्यार्थी दशेत ते ऐकत होते.  सभेत व्यक्त होणारे विचार समजावून घेत होते.  त्या विचारांवर चिंतनही करत होते.  वाचनाला आणि विचाराला अनुभवाचं कोंदण लाभलं होतं.  ज्ञानार्जन हाच शिक्षणामागचा हेतू होय हे त्यांनी ओळखले होते.  तसे यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व हळवे आणि सुजाण होते.