प्रकरण २-नात्यातील जिव्हाळा
ज्या ठिकाणी भव्य व दिव्य घडते अशाच ठिकाणी आदरणीय व वंदनीय महापुरुष जन्माला येतात. तशी या महाराष्ट्राला संतपुरूषांची आणि वीरपुरूषांची परंपरा आहे. या भूमीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय जनतेस स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन घडविले. याच महाराष्ट्राच्या भूमीत मराठी वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन नवा इतिहास घडविला. याच भूमीत म. ज्योतिराव फुले यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध सर्वांगीण सुधारणेचे रणशिंग फुंकले. सत्यशोधकी विचार गोरगरिबांपर्यंत आणि सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी या भूमीत केले. ''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच...!'' हा मंत्रही लो. टिळकांनी याच भूमीत दिला. शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे. हे कृतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सिद्ध करून दाखविले. अशा या कर्मभूमीतच अत्यंत संयमी पण कणखर छाती असलेले, अभ्यासू व विचारी वृत्ती असणारे, अतिशय शालीन व स्वभावात गोडवा असलेले, काळ, वेळ व परिस्थिती पाहूनच वागण्याची कसोटी असलेले, शासन दरबारी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची प्रवृत्ती बाळगणारे, स्वतःच्या चारित्र्याला जपणारे, सुसंस्कृत मनाचे, कलाविषयी आवड असणारे व कलावंताविषयी आदर व प्रेम बाळगणारे, नीरक्षीर विवेक असलेले, सत्तेचा ताळा न बाळगणारे असे अभ्यासू वृत्तीचे, शांत स्वभावाचे, व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतरावजी चव्हाण होय !
पूर्वीच्या सातारा व आजच्या सांगली जिल्ह्यातील तत्कालीन खानापूर व सध्या नवीन झालेल्या पलूस तालुक्यात यशवंतरावांचा जन्म झाला. यशवंतरावांच्या जन्मतारखेबाबत त्यांच्या चरित्रकारांनी दोन वेगवेगळ्या नोंदी केलेल्या दिसतात. ''यशवंतराव चव्हाण'' या चरित्रपर ग्रंथात लेखक अनंतराव पाटील यांनी यशवंतरावांचा जन्म त्यांच्या आजोळी देवराष्ट्र येथे १२ मार्च १९१३ रोजी झाला असे नमूद केले आहे. तर ''यशवंतराव चव्हाण चरित्र दर्शन'' या ग्रंथामध्ये लेखक डॉ. पंजाबराव जाधव यांनी त्यांच्या जन्मतारखेची नोंद पुढीलप्रमाणे केलेली आहे....
''बळवंतराव यांना ज्ञानदेव, गणपतराव व यशवंतराव असे तीन मुलगे व राधाबाई ही एक मुलगी होती. यशवंतरावांचा जन्म ता. १२ मार्च १९१३ साली देवराष्ट्र या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे मामा दाजी घाडगे हे तेथे शेती करून उपजीविका करीत असत. त्यांच्या प्रेमळ छायेतच यशवंतरावांचे बालपण गेले.'' या जन्मनोंदीला आणखी दुजोरा देणारे मत ''यशवंतराव - राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व'' संपादक - भा. कृ. केळकर या संपादित ग्रंथात तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी यांनी सातारा जिल्ह्यातील मागासलेल्या ग्रामीण भागात म्हणजेच देवराष्ट्र या लहानशा गावात १२ मार्च १९१३ ला, अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात श्री. यशवंतराव चव्हाणांचा जन्म झाल्याचे नमूद केले आहे. 'यशवंतराव चव्हाण' या चरित्र ग्रंथात लेखक बाबूराव काळे यांनी उपरोक्त मताला छेद देणारी, त्यांच्या जन्मतारखेची नोंद केली आहे. ती पुढीलप्रमाणे .... ''विट्यास तीन चार वर्षे नोकरी झाल्यावर बळवंतरावांची बदली कराड कोर्टात झाली. त्यांना ज्ञानोबा व गणपतराव हे दोन मुलगे व राधाबाई ही मुलगी. अशी तीन खेळती मुले होती. यशवंतराव हे सर्वात लहान, फार तर वर्ष-दीड वर्षाचे असतील. यशवंतरावांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी त्यांच्या आजोळी देवराष्ट्र या गावी झाला. असं हे पाच-सहा माणसांचं लहान मुलांनी गजबजलेले कुटुंब कराडला येऊन स्थिरस्थावर होते न होते तोच प्लेगची मोठी साथ सुरू झाली व त्या रोगानेच बळवंतरावांची आहुती घेतली.'' 'इतिहासाचे एक पान' या राम जोशी लिखित चरित्र ग्रंथांमध्ये .... सूर्यास्ताची वेळ, अजून कडूसं पडलं नव्हतं. सागरोबाच्या मंदिरातील घंटा मधूनमधून घणाणत होती. शिरस्त्याप्रमाणे सायंकाळच्या दर्शनासाठी सागरोबाच्या - शंभु महादेवाच्या मंदिरात लोक यायचे. ॐ नमोः शिवाय'' चा नाद अशा वेळी मंदिराच्या गाभार्यातून दर्याखोर्यात पसरू लागायचा. त्या लहरी मग गावापर्यंत पोहचत, गावाच्या पलीकडे झुळझुळणारा सोनहिरा ओलांडून त्या लहरी पलीकडे जात. रानात चरायला गेलेली जनावरे सोनहिर्याच्या वाळवंटात हुंदडत असायची. गुराख्याच्या हातातल्या काठीवरील घुंगरांचा आवाज ऐकला की, मग वाळवंट सोडून गावातल्या गोठ्याकडे जाताना रस्त्यावर त्यांची गर्दी होऊ लागे. अशाच एका संध्याकाळी 'यशवंतराव' या बालकाचा देवराष्ट्र या गावात जन्म झाला. ता. १२ मार्च १९१४ या दिवशी !'' 'कृष्णाकाठ' या आत्मचरित्रात लेखक यशवंतराव चव्हाण यांनी स्वतःच्या जन्मनोंदीचा उल्लेख पुढील शब्दात केला आहे. ''माझा जन्म १९१३ च्या १२ मार्च रोजी झाला. शाळेचे सर्टिफिकेट एवढाच त्याचा पुरावा आहे. मी माझ्या आईचे पाचवे किंवा सहावे अपत्य असल्यामुळे माझ्या जन्माची नोंद कोणी ठेवण्याची काळजी घेतली नाही.'' अशा विविध मतांचा परामर्ष घेतल्यानंतर आपणास असा निष्कर्ष काढता येईल की, यशवंतरावांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजीच झाला. यास सबळ पुरावा म्हणून मी प्रत्यक्ष ते ज्या टिळक हायस्कूल कराड येथे शिकत होते तेथे जावून हजेरीपट नोंदवही पाहिली असता त्यांची जन्मतारीख १२ मार्च १९१३ हीच आहे. यास आणखी पुरावा द्यायचा तर कराड नगरपालिका व कराड तहसील कार्यालय येथेही हीच नोंद आढळते. यावरून त्यांच्या जन्म-तारखेच्या विवादावर पडदा टाकायला हरकत नाही. कारण बाबूराव काळे, राम जोशी यांच्या यशवंतरावांच्या जन्मनोंदीच्या मताला फारसा दुजोरा मिळत नाही. शिवाय लेखक यशवंतराव चव्हाण यांनी ''कृष्णाकाठ'' मध्ये .... स्वतःच्या जन्मनोंदीबाबत उल्लेख केलेलाच आहे.