शैलीकार यशवंतराव १७

यशवंतरावांना मार्क्सवादी विचारांच्या प्रभावाची जाणीव होती.  समाजपरिवर्तनासाठी त्यांना त्याची आवश्यकता वाटे.  पण मार्क्सची कडवी बांधिलकी त्यांनी स्वीकारली नाही.  समाजवादानेही ते विशेष प्रभावित झाले नाहीत.  साम्यवाद, समाजवाद आणि पुढे आलेला गांधीवाद या विचारप्रवाहांचा यशवंतरावांच्यावर प्रभाव पडल्यामुळे त्यांनी नकळत या सर्व मतमतांतरांचा तुलनात्मक विचारही केला आहे.  व्यक्तिविकासासाठी त्यांना गांधीवाद सुसंगत वाटतो.  गांधीवादाचे महत्त्व व ममत्व वाटते.  फ्रॉइड बाबतही असाच विचार केला आहे.  पण गांधीजींच्या विचारांचे ते अनुयायी झाले.  यशवंतरावांच्या वैचारिक भूमिकांचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते की ते कोणत्याही वैचारिक भूमिकेचे चिकित्सेने सर्वांगीण निरीक्षण करतात आणि त्यात काय नाही यापेक्षा काय आहे आणि त्याचा मानवी जीवनाला कोणता उपयोग होईल या दृष्टीने विचार करतात.  यामुळे त्यांच्या विचारात कुठेही एकांगीपणा दिसत नाही.  तद्‍वतच ते सर्व पातळीवरून विचार करतात.  जीवनाचा, समाज-जीवनाचा आणि देश, काल, परिस्थितीचा विचार तेथे अपरिहार्य ठरतो.

यशवंतरावांचे कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन आणि त्यांचे राजकीय जीवन हे परस्परांत मिळून गेले आहे.  अनेक संकटांना पार करीत अविचल निष्ठेने संघर्ष करीत त्यांनी महाराष्ट्राचे पुरवठा मंत्री म्हणून सुरूवातीस पदभार स्वीकारला.  पुढे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ते भारताच्या उपपंतप्रधानापर्यंत मजल मारली.  त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचे चढउतार आणि त्यांच्या जीवनातील निवडक आठवणी यांतून चव्हाणांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा परिचय करून घेणे आवश्यक होते.  कारण त्यांच्या लेखनाला आणि भाषणाला जी सामुग्री मिळाली त्याची पाळेमुळे त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यात रुतलेली आहेत.  राजकारण आणि साहित्य यांचे नाते कसे जवळचे आहे ते दाखविण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्‍न केले.  साहित्यिकांच्या मतांचा आदर केला व आपले साहित्यिक मनही जपले.  साहित्यप्रेमी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली.

ललित लेखन हा यशवंतरावांचा आवडता वाङ्‌मयप्रकार आहे.  हा वाङ्‌मयप्रकार आत्मनिष्ठ स्वरूपाचा असतो.  ललित लेखनया वाङ्‌मयप्रकारात त्यांनी आत्मलेखनात्मक, प्रवासवर्णनपर, स्फुट, व्यक्तिचित्रणात्मक आठवणी, स्फुट चरित्रात्मक लेख, वैचारिक लेखन, पत्रात्मक वाङ्‌मय इ. स्वरूपातील लेखन केले आहे.  त्यांच्या 'कृष्णाकाठ', 'ॠणानुबंध', 'युगांतर', 'भूमिका', 'शिवनेरीचे नौबती', 'विचारधारा', 'विदेशदर्शन, 'यशवंतराव चव्हाण - शब्दाचे सामर्थ्य', 'सह्याद्रीचे वारे' इ. ग्रंथातून त्यांच्या ललित प्रकृतीचा आपल्याला परिचय होतो.  त्यांचे ललित लेखन हे वृत्तपत्रे, नियतकालिके पुरवण्या, दिवाळी अंक, विशेषांक, स्मरणिका, अभिनंदनपर ग्रंथ, इत्यादीतून प्रसिद्ध झालेले दिसते.  यशवंतरावांनी ललित लेखनात साचेबद्ध स्वरूप न ठेवता मुक्तपणे लेखन केले आहे.  त्यात विविधता आहे.  त्यांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तीवरील त्यांचे लेख आस्वाद्य आहेत.  त्या व्यक्तीच्या निमित्ताने एखादा विचार, एखादे तत्वही ते सांगतात.  यशवंतरावांचा जनसंपर्कही किती मोठा होता हे या निमित्ताने कळते.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुक्त आविष्कार हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य आहे. हीच त्यांची भूमिका आहे.  त्यांच्या ललित लेखनाला भावनेची डूब असल्यामुळे ते लेखन काव्यात्मकतेकडे झुकले आहे.  त्यात लालित्य आहे.  जीवनावरील प्रेम आहे.  डोळसपणे सर्व अनुभवाला सामोरे जाणे, स्वतःविषयी प्रांजळपणे व मोकळपणाने बोलण्याची वृत्ती इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्या ललित लेखनात आहेत.  त्यांच्या व्यक्तिमतत्वातील चिंतनशीलता, काव्यात्मकता, निखळ सौंदर्यदृष्टी, अंतर्मुखता इत्यादी गुण ललित लेखनात उतरले आहेत.  मात्र 'सागरतट', 'यमुनाकाठ' हे त्यांचे सकल्पित आत्मचरित्राचे खंड मात्र अपूर्ण राहिले.  'कृष्णाकाठ' ने त्यांचे बालजीवनापासून ते प्रौढजीवनापर्यंतचा पट साकारला आहे.  आत्मचरित्र निर्मितीसाठी प्रतिभाशक्तीची, स्मरणशक्तीचा, कल्पकतेचा व संवेदनशील शक्तीचा परिपूर्ण वापर केला आहे.  जीवनातील विविध प्रसंग अचूक आणि मार्मिक शब्दात शब्दांकित केले आहे.  त्यामुळे ते प्रसंग, घटना जिवंत साकारलेल्या आहेत.  आत्मनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा, वस्तुनिष्ठा, विचारचिंतन याचे स्थान, व्याप्‍ती त्यांनी आपल्या 'कृष्णाकाठ' मध्ये जागोजागी निश्चित करून त्यासंबंधी तारतम्य ठेवलेले आहे.  यातील लेखनाची शैली यशवंतरावांच्या लालित्य व नम्रता या गुणांनी समृद्ध आहे.