आत्मचरित्र हा वाङ्मयप्रकार अव्वल इंग्रजी कालखंडात निर्माण झाला. हा वाङ्मयप्रकार कादंबरीइतकाच लोकप्रिय आणि महत्त्वाचा असा आहे. हा वाङ्मयप्रकार चरित्रापेक्षाही मोठा चैतन्यमय, चित्तवेधक आहे. या वाङ्मयप्रकारात आत्माविष्काराला अधिक वाव असतो. आयुष्यातील घटनांचे आविष्करण वास्तवाच्या पातळीवरून अभिव्यक्त करण्याच्या पद्धतीतून आत्मचरित्र या वाङ्मयाची निर्मिती होते. लेखकाने आपल्या व्यक्तिगत जीवनाची स्वतःचच शब्दात सांगितलेली कहाणी म्हणजे आत्मचरित्र असे स्थूलपणे म्हटले जाते. आत्मचरित्रामध्ये लेखक स्वतःची कहाणी स्वतःच सांगत असतो. त्यामुळे या वाङ्मयप्रकारात मानवी स्वभावाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न असतो. कारण त्याचे जीवनाचे अनुभव स्वतःच घेतलेले असतात. त्यामुळे माणसाला आपले दुःख, आपले सुख कुणालातरी सांगण्याची इच्छा होते. अंतर्मनाच्या गाभार्यात कुठल्यातरी कप्पयात खदखदत असणारे, उन्मळून, उचंबळून येणारे, बाहेर पडण्यास आतुर असलेले आपले सुखदुःख सांगितले पाहिजे असे वाटते. याचा व्यापक अर्थाने विचार करावयाचा झाल्यास कुणाच्याही जीवनाचा आणि अनुभवांचा स्वलिखित वृत्तांत आत्मचरित्र या सदरात बसू शकेल. त्यामुळे अनुभवाची तीव्रता इतर कोणत्याही वाङ्मयप्रकारापेक्षा आत्मचरित्राने अधिक असते. ''व्यक्तीच्या जीवनाचा, व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा त्याने स्वतःच लिहिलेला इतिहास म्हणजे आत्मचरित्र.'' म्हणजेच आत्मचरित्रकारात सिंहावलोकनाच्या भूमिकेने जीवनातील विशिष्ट अशा कालखंडाचे किंवा कधी कधी संपूर्ण जीवनाचे निवेदन करावे लागते. जीवनानुभवाचे जिवंत दर्शनही आत्मचरित्रातून प्रकट झालेले असते. आपली जीवनानुभूती कलाकृतीमधून कलावंत प्रांजळपणे व्यक्त करतो.
लेखकाचे घर, त्याच्या कुटुंबातील मंडळी, सभोवतालचे वातावरण, परिसर, शाळा, शिक्षक मित्रमंडळी याचा कळत नकळत असा परिणाम लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर होत असतो. प्रत्येक मानवी कृतीचा जन्म माणसाच्या आत्मविषयक जाणिवेतून होत असतो. या जाणिवेला आणि स्वतःला विसरून स्वतःकडेच तटस्थपणे पाहत गतजीवनातील स्मृती, आठवणी आणि त्याचवेळी त्यांचे कलात्मक लेखनही करणे महत्त्वाचे आहे. हे लेखन तटस्थ आणि आत्मप्रदर्शनपर होत असल्याने त्याला कलाकृतीचा घाट प्राप्त होतो. यातून वर्तमानाचे साद पडसादही व्यक्त होतात. म्हणून एखाद्या कालखंडाची साक्ष म्हणूनही आत्मवृत्त उपयोगी ठरू शकते. शिवाय मानवी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी आत्मचरित्राचा विविधांगी उपयोग होऊ शकतो. शिवाय हे वाङ्मय त्याच्या समाजाचे, संस्कृतीचे प्रतिबिंब असते. आत्मचरित्रातून एखाद्या साहित्यिकाच्या साहित्यकृतीचा अन्वय आणि आकलन अधिक सुलभ होऊ शकते. म्हणून यशवंतरावांसारख्या एखाद्या राजकीय नेत्याचे 'कृष्णाकठ' सारखे आत्मचरित्र वाचताना त्याचा सखोल अभ्यास व्हावा अशी अपेक्षा आहे. यशवंतरावांसारख्या एखाद्या नेत्याने वास्तव जीवन जगलेल्या आपल्यासारख्या हाडामांसाच्या माणसाची त्याने स्वतः सांगितलेली ती जीवनकथा असते. ती अस्सल असते, त्याला काल्पनिकतेचा स्पर्शही नसतो. त्यामुळे आत्मचरित्र वाचनातून मानवी स्वभाव आणि अनुभव यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नवा अनुभव वाचकाला मिळत असतो.
यशवंतराव चव्हाणांनी जो विदेशी प्रवास केला तो जेव्हा ते केंद्रीय मंत्री होते तेव्हा केला. (१९६३ ते १९७८) या प्रवासामध्ये विदेशातून त्यांनी जी पत्रे सौ. वेणूताईंना लिहिली त्या पत्रांचा संग्रह वाचल्यानंतर यशवंतरावांचे समृद्ध व्यक्तिमत्त्व लक्षात येते. त्यांचे व्यक्तिमत्त्व राजकीय जीवनात मुरलेले होते. त्यामुळे राजकीय जीवनाच्या क्षेत्रात घडलेले अनेक प्रसंग, घटना, अनेक अनुभव त्यांनी पत्ररूपाने सौ. वेणूताईंना सांगितले आहेत. अनेक मोठ्या व्यक्तींचे घनिष्ठ सान्निध्य त्यांना लाभले होते. त्यांच्याशी ते बरोबरीच्या पातळीवर वागलेही. त्यांनी अनेक राजकीय अनुभव घेतले. आपणास आलेल्या अनुभवांकडे मिस्किलपणे, तटस्थपणाने, भावगर्भतेने, गंभीरपणे पाहण्याची त्यांची वृत्ती कशी होती हे या पत्रसंग्रहावरून लक्षात येते. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि अन्य छोट्या देशांना दिलेली भेटी, स्थळे, प्रसंग, घटना यांच्या नोंदी तर येतातच पण या विदेश यात्रांमध्ये राजकारणाबरोबरच त्यांची तत्त्वचिंतनशीलताही दिसून येते. त्याचबरोबर त्या पत्रांना साहित्यिक मूल्यही प्राप्त झाले आहे. त्यात साहित्य विलासही दिसतो. साहित्यनिर्मितीही साधली आहे. तसेच त्यांची जवळ जवळ सर्वच प्रवास वर्णने छोट्या काव्यात्म प्रवास लेखांनी बहरलेली आहेत. त्यात एक प्रकारची विविधता दिसून येते. एक प्रवासलेख दुसर्या प्रवास लेखासारखा असेल असे नाही. त्यामुळे त्यांच्या या प्रवास लेखाची गोडी वाढत जाते. त्यांचे हे प्रवासलेखन मराठी वाङ्मय प्रकारच्या वाटचालीतील एक मोठा 'दीपस्तंभ' आहे असे गौरवाने म्हणावेसे वाटते. यशवंतराव चव्हाणांच्या प्रवास लेखामध्ये तेथील जीवन, माणूस, त्याचा धर्म, कला, निसर्ग यावर ते सहज भाष्य करतात. त्यामुळे त्याच्या रंगरूपाला एक विशेष आगळेपण येते. सर्वच विषयांवर भाष्य करण्यासाठी असा वाव मिळणे किंवा संधी सापडणे ही बाब याच वाङ्मयप्रकारात घडू शकते. दुसर्या साहित्यप्रकारातून त्याची संभाव्यता कमी असते. कारण लेखकाने कमी वेळेत हे सर्व पाहिलेले असते. त्यात अनुभव विश्वाचा आगळेपणा असतो आणि हा आगळेपणा त्याला एक वेगळे वाङ्मयीन रूप देण्यास कारणीभूत होतो.