साहित्यकार आपल्या अभिव्यक्तीसाठी वेगवेगळी माध्यमे शोधत असतो. आणि या माध्यमांमध्ये शब्दचित्र किंवा व्यक्तिचित्र हे एक प्रभावी माध्यम आहे. १९४० नंतर मराठीमध्ये हा वाङ्मयप्रकार प्रचलित झालेला दिसतो. शब्दचित्र, व्यक्तिचित्र, स्वभावचित्र इ. पर्यायी शब्द प्रचलित आहेत. हा वाङ्मयप्रकार प्रभावशाली व सांकेतिक आहे. कारण त्याच्यामध्ये थोड्याशा शब्दांत पुष्कळ काही सांगण्याची शक्ती असते. शब्दचित्र हे प्रथम शब्दांनी काढलेले चित्र असते. व्यक्तिचित्र आणि आठवणी यांचा संबंध अत्यंत निकटचा आहे. जीवनातील एखाद्या प्रसंगावर किंवा घटनेवर व्यक्तिचित्र लिहिले जाऊ शकते. मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यकारांनी या वाङ्मयप्रकारात मोठ्या कौशल्याने भर घातली आहे. त्यांच्या प्रतिभेचा मनोज्ञ आविष्कार त्यांनी रंगवलेल्या व्यक्तिचित्रणामधून झालेला आढळतो. यशवंतरावांनी व्यक्तिचित्रणामध्ये जी माणसे चित्रित केली आहेत. ती जीवनाच्या विविध क्षेत्रांतील आहेत. त्यामध्ये साहित्यिक, प्रकाशक, नाटककार, समाजसुधारक यांचा समावेश आहे. राजकीय नेते, इतिहासातील काही व्यक्ती आहेत. महाराष्ट्रास चिरपरिचित असलेल्या अनेक थोरा-मोठ्यांची व्यक्तिचित्रे यशवंतरावांनी रेखाटली आहेत. यशवंतरावांनी रंगवलेल्या व्यक्तिचित्रणामध्ये सर्वाधिक प्रभावी असलेले व्यक्तिचित्रण म्हणजे त्यांची आई विठाई आणि पत्नी वेणूताई. ज्यांची व्यक्तिचित्रे यशवंतरावांनी रेखाटली ती अखेर माणसेच होती. याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्या व्यक्तींच्या गुणांबरोबरच त्यांचे दोष किंवा त्यांच्या मर्यादा ओळखून ते तितक्याच स्पष्टपणे सांगतात. माणसे समजून घेण्यासाठी हवा असणारा मनाचा मोठेपणा आणि हळुवारपणा साहेबांच्या जवळ होता. बाह्य सौंदर्यसोबत व्यक्तीच्या अंतरंगाचे सौंदर्य न्याहाळून, संवेदनशील व चिंतनशील वृत्तीने ही शब्दचित्रे साकारली आहेत. कधी गौरवाने, कधी मित्रत्वाच्या प्रेमाने तर कधी त्या व्यक्तीच्या अलौकिक गुणांनी दिपून जाऊन तर कधी कौतुकाने ही व्यक्तिचित्रे साकारली आहेत.
यशवंतरावांनी गांधी, नेहरू, राधाकृष्णन, काकासाहेब गाडगीळ, धनंजयराव गाडगीळ इ. समकालनांविषयी लिहिले आहे. साहित्यिकांमध्ये खाडीलकर, केळकर, खांडेकर, माडखोलकर, यांच्याबद्दलच्या आठवणी लिहिल्या आहेत. या राष्ट्रीय पुरुषांबद्दल यशवंतरावांनी मोजक्या शब्दात चरित्र लेखन केली. छत्रपती शिवाजी, लोकमान्य टिळक, रविंद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे इ. विषयी प्रसंगानुरूप त्यांनी लेखन केले आहे. कांही कार्यक्रमांतून त्यांनी जी व्याख्याने दिली आहेत. त्यातून या थोर विभूतींवर प्रकाश टाकला आहे. विविध क्षेत्रांशी संबधित अशा लोकांचे त्यांचे म्हणून असे एक सखोल सर्वस्पर्शी मत यशवंतरावांनी प्रकट केले आहे.
यशवंतरावांच्या समाजजीवनावरच विविध विचार प्रवाहांचा आणि व्यक्तींचा प्रभाव पडला आहे. यशवंतरावांच्या वाङ्मयीन प्रकृतीची जडणघडण विविध लेखक कवींच्या वाङ्मयीन वैशिष्ट्यातून झाली असली तरी काही राजकीय व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झालेला दिसतो. यामध्ये म. गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, यतिंद्रनाथ दास यांच्यासारख्या देशप्रेमी व्यक्तींचा, आई विठाबाईचा व आजोळची माणसे यांच्या संस्काराचा आणि विचारांचा फार मोठा वाटा आहे. यशवंतरावांचा जन्मच ग्रामीण कुटुंबात झाल्यामुळे त्यांच्यावर धार्मिक-सांस्कृतिक संस्कार झालेले आहेत. भजन, कीर्तन, पोथ्या, पुराण इ. चे श्रवण त्यांनी बालवयातच केले आहे. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. खेड्यात जन्मलेल्या यशवंतरावांनी ग्रामीण जीवनाच्या प्रगतीचा विचार सातत्याने पुढे मांडला. ग्रामीण जीवन, तेथील माणसे, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती, रीतिरिवाज व परंपरा यांच्या सदैव निरीक्षणातून समर्थ विचार देत राहिले. बालपणातील हे संस्कार आणि सातत्याने केलेले वाचन यातून त्यांचा पिंड घडला. मराठी संत परंपरा, थोर पुरुषांची चरित्रे, सुधारकांच्या परंपरा, लोककलेच्या परंपरेचा वारसा यांसारख्या अनेक गोष्टी यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाला पोषक ठरल्या. यशवंतरावांच्या पुढील वाटचालीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, एम. एन. रॉय, विठ्ठल रामजी शिंदे, आचार्य भागवत, राम मनोहर लोलिया, प्रा. ना. सी. फडके, ह. रा. महाजनी, प्राचार्य बाळकृष्ण यांच्या सहवासाचा त्यांना फार मोठा लाभ झाला. त्यातून त्यांचा वैचारिक पिंड घडला. हा कालखंड यशवंतरावांच्या उमेदीचा कालखंड होता. तर राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्यवळवळीचा होता. साहित्यिक दृष्ट्या फडके, खांडेकर व रविकिरण मंडळ यांचा कालखंड होता. हाच कालखंड त्यांच्यावर सामाजिक व साहित्यिक संस्कार होण्यास प्रेरणादायी ठरला. अभिजात रसिकवृत्ती निर्माण होण्यास योग्य ठरला. याच काळात त्यांचा नाट्य, संगीत, विविध कला यांच्याशी संबंध आला. स्वातंत्र्य चळवळ त्यांच्या जाज्वल्य देशनिष्ठेला उपकारक ठरली व 'बहुआयामी' असे व्यक्तिमत्त्व तयार झाले. बहुशृत, धुरंदर, अभ्यासू राजकारणी, मितभाषी, प्रभावी वक्ता अशा सर्व प्रांतात त्यांनी लौकिक मिळवला.