साहेब यशवंतरावजी चव्हाण-११

१९३० सालच्या चळवळीत जेलमध्ये जाणं.
म्हणजे आमरण स्वातंत्र्याचं व्रत स्वीकारणं होतं.
स्वातंत्र्य- संग्राम अधिकाधिक लोकभिमुख
आणि शक्तिशाली होत होता,
तसतसे ब्रिटिश सत्ताधारी बेचैन होऊ लागले-

कराड नगरपालिकेनं, गो-या गव्हर्नरला मानपत्र द्यायचा बूट काढला!
तो आम्ही स्वातंत्र्य- सैनिकांनी बहिष्कार घालून उधळून लावला...
त्यावर्षी मी इंग्रजी ६ वी पास झालो.
माझी सर्वसामान्य बुद्धी आणि समज वाढली होती. मला आठवंत:
(आनंददायी सुरावट मंदपणे एकू येऊ लागते.)
पोस्टमन रोज माझ्यासाठी वर्तमानपत्र घेऊन येई.
मी आमराईत जात असे-
ओळींन उभ्या असलेल्या आंब्यांच्या झाडांच्या रांगा,
झाडांना लगडलेले आंबे,
त्यांचा हवा- हवासा वाटणारा सुगंध,
मोठं प्रसन्न वातावरण असे तिथं-
हरिभाऊ आपटयांच्या कादंब-या,
‘पण लक्षात कोण घेतो?’, ‘मी’, ‘उष:काल’;
केतकरांची ‘ब्राम्हणकन्या’- एकदा वाटलं,
की कालिदासांच ‘मेघदूत’ आपण मुखोदगत का करू नये?
(तंबो-याचा झंकार, संतूर आणि तबल्याचा तुकडा)
‘आषाढस्य प्रथम दिनी त्या, दिसे पर्वतावरी
नयनरम्य घन करी कडयावर, गज वा क्रीडांगण’

कराडला भरलेल्या जिल्हा राजकीय परिषदेत
माधवराव बागल यांनी उपसूचना म्हणून
आर्थिक मागण्या मांडल्या- ते सगळे शेतकरी समाजाचे
जिव्हाळयाचे प्रश्न होते, डॉक्टर- वकील अशा
पांढरपेशा शहरी पुढा-यांना त्यांचं काय?
त्या काळात ‘लाऊड स्पीकर’ नसूनही
माधवरावांनी शेतक-यांचा बुलंद आवाज उठविला!
त्यांची उपसूचना टाळयांच्या गजरात मंजूर झाली.
माझं राजकीय शिक्षण;
जीवनाच्या शाळेत, हे असं चालू होतं:
गरिबांचे कैवारी कोण, आणि विरोधक कोण-
हे लक्षात घेऊन स्वातंत्र्यांची चळवळ
आपण चालवली पाहिजे, असं मला वाटायचं!