साहेब यशवंतरावजी चव्हाण-१४

तुरूंगात गांधीवाद, समाजवाद आणि मार्क्सवादसुद्धा
समजावून घेतला. शेवटी मी ठरवलं:
‘’विचारांच्या क्षेत्रातला निर्णय आपला आपणच घेतला पाहिजे!”
रशियन राज्यक्रांतीविषयीचं:
‘द टेन् डेज् दॅट शुक द वर्ल्ड’
हे जॉन रीडचं पुस्तक वाचून काढलं-
व्हेरी इंटेस्टिंग!
हिंदुत्वनिष्ठ राजकारणावर तूटून पडणारे आचार्य
भागवत सावरकरांच्या ‘कमला’ आणि ‘गोमांतक’
या काव्यांवर बोलू लागले,
की त्यांची रसवंती तास न् तास वहात असे!
मी मनाशी म्हणालो,
“सावरकरांची कविता मी यापूर्वीच का वाचली नाही?”
‘कमला’ या काव्याची सुरूवातच ललितरम्य आहे:
‘फुलबाग किती शोभे लहान नटवी, करी
नटुनि थटुनि नाना नखरे वरचे वरी’

एकदा काय झालं:
चांगले वकील असलेले गृहस्थ आचार्यांना म्हणाले,
“ मी टागोरांची ‘गीतांजली’ वाचतोय् पण-
‘दाऊ’ म्हणजे काय? ‘हिम्’ म्हणजे कोणाला हो?”
आचार्य भागवत संतापानं लाल झाले, म्हणाले:
“गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांची नोबल पारितोषिक विजेती ‘गीतांजली’ तुम्ही वाचताय्- आणि
तुम्हाला ‘दाऊ’ आणि ‘हिम’ चा अर्थ कळत नाही!
(भडकून) वाचन बंद करा- बंद करा वाचन!!!”
फॅशन म्हणून अभिजीत ग्रंथ उघडून बसणारी माणंस त्या काळातही होती-
आजकालच्या फॅशनेबल बायका नाही का म्हणत:
“आज किनई कुमार गंधर्व ‘क्लासिकल् फोक् सादर करणार आहेत!”
त्यांना ‘क्लासिकल’ ही कळत नाही, आणि
‘फोकू’ मधंलही काही कळत नाही!
फोकांन झोडून काढलं पाहिजे!!

विनायकराव भुस्कुटे यांच्याकडून
‘कम्युनिस्ट मॅनिफॅस्टो’ समजावून घेतला.
इतिहासाच्या विकासाकडे पहायची एक ‘नवी नजर’
मार्क्सनं जगाला दिलीय्! मला वाटतं:
‘मार्क्सच्या विचारांकडे पाठ न फिरवता,
हिंदुस्थाननं आपले प्रश्न
आपल्या अनुभवातूनच सोडवले पाहिजेत!’
मार्क्सवादाच्या अंमलबजावणीत कुणी काही चुका केल्या असतील,
पण म्हणून मूळ मार्क्सवाद टाकाऊ कसा ठरतो? कारण,
खुद्द मार्क्सनं एके ठिकाणी म्हटलंय:
‘येस् येस्- थिअरी ईज ग्रीन,
बट्- लाईफ ईज एव्हरग्रीन!!’
काही ‘बडवे’ पोटभरू निघाले,
म्हणून ज्ञानेश्वरी टाकाऊ ठरते का?