येरवडयाला एक वर्षं,
विसापूरला तीन महिने काढल्यावर,
’३३ सालच्या मे महिन्यात सुटलो.
माझ्यातली भावनाशीलता कमी करून
विचारांची खोली वाढवायचं काम
त्या तुरूंगवासनं केलं!
ते एक प्रकारे आमचं-
‘विद्यापीठीय जीवन’च होतं...
सुटायच्या अगोदर एक दिवस महाजना मला म्हणाले,
“वाचन पुष्कळ झालं!.
आता ‘गांधीवाद’ या विषयावर ३५-४० मिनिटं भाषण दे पाहू-“
चांगली तयारी करून मी भाषणात गांधीवादातली
‘साध्य-साधन शुचिता’ सांगितली!
वयाच्या १८ व्या वर्षाच्या मानानं,
चांगली मांडणी केल्याबद्दल
खुद्द महाजनी, निपाणीचे गांधीवादी पुढारी कटकोळ
या बुजुर्गांनी माझी पाठ थोपटली.
पण, तुम्हाला खरं सांगू? तुरूंगातनं सुटल्यावर,
घरचे कपडे घालताना मला चुकल्या-चुकल्यासारखं झालं!
माणूस सवयीचा किती गुलाम असतो नाही! घरी आलो,
तर इकडे थोरल्या बंधूंना मुलगा झालेला,
तिकडे आमचे जुने मित्र अहमद कच्छी-
मृत्यूशय्येवर तळमळत होते...
नव्या अंकुराकडे आनंदानं पहावं,
तोच, गळून पडणा-या पानाच्या छायेनं
मनात विषण्णता दाटून येई-
माणसांच जीवन असंच
सुख-दु:खाच्या लाटांवर हिंदोळत असतं!
मी शाळेत जाऊ लागलो.
शिक्षणाचं, ज्ञानाचं महत्व चळवळीतही आहे
हे मी तुरूंगातदेखील पाह्यलं होतं!
त्यामुळे मला आता मॅट्रिक व्हायची घाई झाली होती. वाटायचं:
‘आत्ताच्या आत्ता माझी परीक्षा कुणी घेत नाही!’
पण, मध्येच मॅट्रिकची परीक्षा कोण घेणार हो?
वर्षभर, लहान मुलांमध्ये बसणं भागच होचं!
मॅट्रिक झाल्यावर
एक दिवस कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना बोलवायला
पुण्याला गेलो- स्टेशनवरच्या नळानरच हातपाय धुतले.
अण्णा घरीच होते- मी आमंत्रण दिलं, तर ते म्हणाले:
“माझ्याबरोबर एखाद्या हरिजनालाही घरी जेवायला बोलावशील?”
(चटकन) “हो, बोलावीन की-“
“घरच्यांना विचारलं आहेस?”
(चटकन्) “आई नाही म्हणणार नाही!”
कर्मवीरांच्या संगतीतला तो एक दिवस,
म्हणजे, सार्वजनिक जीवनातला एक धडा होता, धडा!
त्यानंतर, मी महारवाडयात काढलेली शाळा,
दोनतीन महिन्यातच प्रौंढ विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडली.