साहेब यशवंतरावजी चव्हाण-८

एकदा टिळक हायस्कूलच्या शेणोलीकर गुरूजींनी
वर्गात प्रत्येकाला एकेक चिठ्ठी दिली; म्हणाले,
“तुला मोठेपणी काय व्हायचंय, ते या चिठ्ठीवर लिही!”
मी लिहिलं:
“मी यशवंतराव चव्हाण होणार!”
मास्तर म्हणाले, “तू चांगलाच अहंकारी दिसतोस-“
(फक्त खांदे उडविण्याची कृती)
पाठक हेडमास्तरांनी मला या प्रकाराबद्दल विचारलं;
मी सगळं खरं खरं सांगितलं-
तर, ते म्हणाले:
“यात गैर काय आहे? शेणोलीकर काहीही म्हणाले असले,
तरी तू तिकडं लक्ष देऊ नकोस!”
त्यांच्या या बोलण्यानं मला मोठाच धीर आला,
आणि माझ्या नावामागची आजीनं सांगितलेली कथा
मला आठवली; आजी म्हणाली:
“तुज्या जल्माच्या येळी,
आक्काला लई तरास जाला- ती बेसुद जाली...
माज्या जिवाला घोर लागला (सुस्कारा), खेडयात कुटलं रं
दवापानी? आखरीला सागरोबाला साकड घातलं-
देवाला काकुळतीनं इनिवलं; म्हनलं:
“आक्काला जगिवन्यात येश दे
प्वाराचं नाव येशवंता ठिवीन!
सागरोबानं आयकलं, म्हून तुजं नाव येशवंता ठिवलं!”
मग, मला माझ्या नावाचा सार्थ अभिमान का नसावा?

वाईच्या प्राज्ञ पाठशालेचे करूण विव्दान
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
यांची ८-१० भाषणं या काळात मी ऐकली.
त्यांनी आम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला:
“ही शेवटची लढाई आहे.
तीत आपण सर्वस्वाचा होम केला पाहिजे!”
(टाळयांचा कडकडाट)
काकासाहेब गाडगीळांची पण भाषणं मला आवडायची...
त्यात देशभक्ती, नर्मविनोद, खटयाळ उपरोध असायचा!
डावा खांदा उडवून बोलायची काकांची लकब होती.
तर्कतीर्थ आणखी एक भाषणात म्हणाले,
“तुम्ही बसला आहात तो घाट जसा गरम झाला आहे,
तशी तुमची बुद्धी आणि मनं झाली पाहिजेत...
देशाची तुमच्याकडे ही मागणी आहे!”

आता स्वातंत्र्याची चळवळ खेडयापर्यंत पोचत होती.
आम्ही कार्यकर्ते यथाशक्ती, यथाबुद्धी श्रोत्यांना माहिती देत असू.
सभेत मी ब-यापैकी बोलत असे, असं लोक म्हणत!
“ग्रामीण विकास” या विषयावर भाषण करून
मी पुण्याच्या वक्तृत्व सभेत पहिलं बक्षीस मिळवलं होतं.
त्यावेळी वेगवेगळे विचार प्रचलित होते:
“रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?”
“तलवारीशिवाय स्वराज्य मिळणार कसं?”
उत्तर होतं: जनतेचं आंदोलन उभारून!...
लोकांनी सहकार्याचा हात काढून घेतला,
की सरकार कोलमडू शकतं-
हाच गांधीजींच्या असहकाराचा मूलमंत्र होता!
(आवेशाने) तो प्रयोग जनतेनं सातारा जिल्ह्यात
बिळाशीला केला.
इंग्रजांनी ते बंड ठरवलं!