साहेब यशवंतरावजी चव्हाण-१८

आम्ही ‘लोक-क्रांती’ नावाचं साप्ताहिक सुरू केलं.
‘लोकक्रांतीचा जीवनहेतू’ हा पहिला अग्रलेख मीच लिहिला होता!
पण,पुढं कायद्याच्या अभ्यासासाठी पुण्याला गेलो;
हे साप्ताहिक वर्षभर चाललं, नंतर बंद पडलं-
माझ्या मनातला वैचारिक त्रिकोण एव्हाना संपला होता:
‘जिथं गांधी-नेहरू, तिथं मी!’  असं स्वच्छ उत्तर होतं!
आत्माराम पाटील रॉयवाद्यांबरोबर गेले, मी कॉंग्रेसबरोबर राह्यलो.

पुण्याच्या लॉ-कॉलेजची इमारत पहाताच, मन प्रसन्न झालं!
हनुमान टेकडीच्या उतरणीवरून अर्ध पुणं दिसतं-
चांगली लायब्ररी, वाचनाची व्यवस्थित सोय,
उत्तम वातावरण-आणखी काय हवं?
‘सा विद्या, या विमुक्तये!’

त्या काळात पुण्यात ‘अभ्यास-मंडळां’ ची फॅशन होती-
Study  Circle !
म्हणजे, पालक म्हणायचे:
‘अभ्यासाचं वाट्टोळं!’
आणि ते खोट नव्हतं-
मी विष्णुपंत चितळयांकडून
मार्क्सवाद समजावून घ्यायचा प्रयत्न केला! परिणाम?
’३८ साली’ फर्स्ट एल्. एल्. बी. ला
मी नापास झालो!! 

’३९ सालच्या सप्टेंबरमध्ये,
इंग्लंड-फ्रान्स विरूध्द जर्मनी-
असं दुसरं महायुध्द पेटलं...
लोतशाही विरूध्द फॅसिझम्
या लढयात लोकशाहीचा विजय होणं इष्ट,
पण, गुलाम हिंदुस्थानला
या युद्धाशी काहीही कर्तव्य नाही,
अशी कॉग्रेसची भूमिका होती.
तर, साम्यवाद्यांच्या मते,
‘फॅसिझमविरूध्द लढायला उभ्या राहिलेल्या
ब्रिटिश सत्तेशी आपण तूर्त सहकार्य केलं पाहिजे!’
२२जून ४१ ला जर्मनीनं रशियावर हल्ला केला, आणि
कमुनिस्ट पक्षही या युद्धाला ‘लोकयुध्द’ म्हणू लागला...
मी अतिशय अस्वस्थ झालो- कारण,
कॉंग्रेस युध्दविरोधी कार्यक्रम देत नव्हती.
‘कम्युनिस्ट पक्षात जावं की काय?’
असा एक प्रबळ विचार माझ्या मनात येऊन गेला! पण,
जिल्ह्यातले मित्र म्हणाले:
“घाईघाईनं, एकांगी आणि चुकीचा निर्णय घेऊ नका.”
हे ठरलं, त्या दिवशी रात्री मी निवांत झोपलो!

युध्द संपल्यावर,
पुढं केव्हातरी ‘वसाहतीचं स्वराज्य’ देऊ,
-संपूर्ण स्वातंत्र्य नाहीच-
असा वायद्याचा सौदा इंग्रजांनी पुढं मांडला,
आणि देशात संतापाची लाट उसळली!
९ प्रांतातल्या कॉंग्रेस-सरकारांनी राजिमाने दिले,
आणि ‘प्रत्यक्ष कृती’ला सुरूवात केली.