एक काळ असा होता, की राजकारणात फक्त वकील, शिक्षक, आदी पांढरपेशा वर्गच सक्रिय भाग घेत असे. संपन्न शेतकऱ्यांसंबंधी बोलायचे, तर या वर्गाने पुरोगामी राजकारण कधी हिरीरीने केले, असे मला तरी वाटत नाही. संपन्न शेतकऱ्यांचा वर्ग ब्रिटिश काळात ब्रिटिशांबरोबरच राहिला. कालांतराने सधन शेतकऱ्यांमधील सरंजामदार वर्ग शिंग मोडून राजकारणात शिरल्याचे आढळते, परंतु आजही हा वर्ग समाजवादाला पोषक कृती करण्यापासून काहीसा अलगपणा बाळगून आहे.
महाराष्ट्रातील लहान व मध्यम शेतकरी वर्गाचे विश्लेषण मात्र वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. स्वातंत्र्य-लढ्यात तो आघाडीवर होता आणि आजपर्यंत तरी त्याने पुरोगामी विचारांची वाटचाल केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र काँग्रेसलाच नव्हे, तर अखिल भारतीय काँग्रेस पक्षालाही संघटनेची बांधणी नव्याने करावी लागेल. ही नवी संघटना-वर्गसंघटना म्हटले, तरी चालेल. गरिबांच्या कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांची असेल. अशी नवी संघटना बांधण्यासाठी जुन्या-नव्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. शेतकरी, कामगार, व दलितांचे प्रश्न हाती घेऊन लढाऊ कार्यक्रमाच्या पायावर या वर्गाला संघटित करावे लागेल आणि ते सुद्धा जनशक्तीचा तेजोमय (dynamic) विचार नजरेसमोर ठेवून !
नवी पिढी म्हणजे आपण अद्ययावत तरुण पिढी म्हणतो. पण तसे कधी नसते. १९४२च्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीतलाही माझा हा अनुभव आहे. देशातली सर्वच्या सर्व नवी पिढी एखाद्या कामात स्वत:ला बांधून घेते, असे सहसा घडत नाही. महत्त्वाची आव्हाने येतात, त्यावेळी नवी पिढी कामासाठी पुढे सरसावते. तरुणांपुढे विधायक विचार, ध्येय, कार्यक्रम ठेवला, तर ते संघटितही होतात. मानवतावादी विचार त्यांच्या मनात रुजवला, तर तरुणवर्ग अन्यायाच्या विरुद्ध आणि दलितांच्या बाजूने उभा राहतो, असे आजही आढळते. आजच्या तरुणांच्या ठिकाणीही नैतिक मूल्यांची चांगली जाण आहे; हाच याचा अर्थ. नवी पिढी जागृत आणि प्रामाणिक आहे, तसेच ती राष्ट्रवादाचा विचार कमी महत्त्वाचा मानीत नाही. तरुण मनाला निराशेने ग्रासले आहे, असे म्हटले जाते. याचा मी जो अर्थ करतो, तो असा, की समाजवाद प्रस्थापित करणारा दुसरा पक्ष तयार होईल, की नाही, या शंकेने त्यांना ग्रासले आहे.
प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य वाढत आहे, हे तर खरेच; पण चिंतेची बाब ही, की हे प्रादेशिक पक्ष मूलत: प्रॉपर्टीवादी - खाजगी मालमत्तेचे पुरस्कर्ते - आणि जातीय परंपरा प्रशंसिणारे आहेत. अशा शक्ती आज समर्थपणे उभ्या राहात आहेत, हेही आढळून येते. उलटपक्षी, पुरोगामी व राष्ट्रिय दृष्टिकोण मांडणा-या शक्ती मात्र वाढल्याचे दिसत नाहीत आणि तरुण मनाच्या निराशेचा गैरफायदा अशा प्रतिगामी शक्ती वाढविण्यासाठी केला जात आहे, असाच गेल्या निवडणुकीमध्ये पडताळा आला.